Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हज यात्रा: कोरोनामुळे हज यात्रेची परनवानगी फक्त सौदी अरेबियांच्याच लोकांना

हज यात्रा: कोरोनामुळे हज यात्रेची परनवानगी फक्त सौदी अरेबियांच्याच लोकांना
, मंगळवार, 23 जून 2020 (15:58 IST)
जगभर कोरोना व्हायरसनं थैमान घातलंय. या आरोग्य संकटातही सौदी अरेबियाकडून हज यात्रेचं आयोजन केलं जाणार आहे. मात्र, यंदा केवळ सौदी अरेबियात राहणाऱ्यांनाच हज यात्रेला जाता येणार आहे.
 
सौदी अरेबियाचे हज आणि उमरा विषयक मंत्रालयानं सोमवारी यासंदर्भात एक पत्रक जारी केलं. त्यानुसार, कोरोनाचं संकट असल्यानं मर्यादित लोकांनाच हज यात्र करण्याची परवानगी दिली जाईल.
 
हज यात्रेसाठी जगभरातून लाखो लोक येत असतात. मात्र, यंदा सौदी अरेबियाच्या बाहेरील कुणालाही परवानगी दिली जाणार नाहीय.
 
कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सोशल डिस्टन्सिंग किंवा इतर खबरदारीचे उपाय करण्यात आलेत. त्यानुसार हा निर्णय सौदी अरेबियानं घेतलाय.
 
सौदी अरेबियातले जे लोक हजसाठी येतील, त्यांच्या आरोग्य सुरक्षेसाठीही सर्व उपाययोजना केल्या जातील.
 
इस्लामिक कॅलेंडर चंद्रानुसार बदलत राहतं. हज बकरी ईदच्या काळात असते. मात्र यंदा हजचं आयोजन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होतंय.
 
इस्लामच्या पाच मूलभूत स्तंभांपैकी शेवटचा स्तंभ हज मानला जातो. शारीरिक आणि आर्थिक रुपानं सक्षम असलेले मुस्लीम नागरिक आयुष्यात एकदा तरी हजची यात्रा करण्याची इच्छा बाळगून असतात.
 
त्यामुळेच दरवर्षी जगभरातून 20 लाखांहून अधिक मुसलमान हज यात्रेसाठी मक्केत पोहोचतात. यंदा मात्र इतर देशातील भाविक हजला जाऊ शकणार नाहीत.
 
कोरोनाचं आरोग्य संकट पाहता, यंदा हज यात्रा रद्दच होते की काय, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, सौदी अरेबियानं यात मध्यम मार्ग काढत, आरोग्य सुरक्षेची खबरदारी घेऊन केवळ सौदी अरेबियातील भाविकांनाच हजला येण्याची परवानगी दिली.
 
एप्रिल महिन्यातच सौदी अरेबियातील हजसंबंधी मंत्री मोहम्मद सालेह बंतेन यांनी जगभरातील भाविकांना सांगितलं होतं की, हजला येणाऱ्यांच्या आरोग्याची सौदी अरेबियाला काळजी आहे. त्यामुळे कुणीही हजला येण्यासाठी बुकिंग करण्याची घाई करू नये.
 
सौदी अरेबियात आजच्या घडीला कोरोनाचे एकूण एक लाख 61 हजारहून अधिक रुग्ण आहेत. 307 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्याच आठवड्यात सौदी अरेबियानं लॉकडाऊन हटवलंय.
 
हज यात्रा का करतात?
इस्लामच्या एकूण पाच स्तंभांपैकी हज हा पाचवा स्तंभ आहे. स्वस्थ आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम मुसलमानांकडून एक अपेक्षा असते की, जीवनात एकदा तरी त्यांनी हज यात्रा केली पाहिजे. हज यात्रेकडे भूतकाळातली पापं मिटवण्यासाठीचं योग्य स्थान म्हणून पाहिलं जातं.
 
असं मानलं जातं की, हज यात्रेनंतर एखाद्या व्यक्तीचे सगळे पाप माफ केले जातात आणि तो आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करू शकते.
 
आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करावी, अशी बहुतांश मुसलमानांची इच्छा असते. जे हज यात्रेचा खर्च करू शकत नाहीत, त्यांचा खर्च धार्मिक नेते आणि संघटना करतात. काही मुसलमान असेही आहेत जे आपली जन्मभराची कमाई हज यात्रेसाठी वाचवून ठेवतात. जगातल्या काही भागातले मुसलमान हजारो किलोमीटर चालून काही महिन्यांमध्ये मक्का गाठतात.
 
मुसलमानांसाठी इस्लामचे पाच स्तंभ खूप महत्त्वाचे आहेत, जे पाच संकल्पांप्रमाणे आहेत.
 
हे आहेत इस्लामचे 5 स्तंभ
 
तौहीद - एक अल्लाह असून मोहम्मद हे त्याने पाठवलेले प्रेषित आहेत. यावर प्रत्येक मुसलमानाचा विश्वास असणं आवश्यक आहे
 
नमाज - दिवसातून पाच वेळा नियमानुसार नमाज पढणं गरजेचं आहे
 
रोजा - रमजानच्या काळात उपास ठेवावा
 
जकात - गरीब आणि गरजूंना दान करणं
 
हज - मक्केला जाऊन येणं
 
हज यात्रेचा इतिहास काय आहे?
जवळजवळ चार हजार वर्षांपूर्वी मक्केचं मैदान पूर्णतः निर्जन होतं. मुसलमान असं मानतात की, अल्लाहने प्रेषित पैगंबर अब्राहम (ज्यांना मुसलमान इब्राहिम म्हणतात) यांना आदेश दिला की, त्यांनी त्यांची पत्नी हाजरा आणि मुलगा इस्माईल यांना पॅलेस्टाईनमधून सौदी अरेबियामध्ये आणावं, जेणेकरून त्यांची पहिली पत्नी सारा हिच्या ईर्ष्येपासून त्या दोघांना (हाजरा आणि इस्माईल) वाचवता येईल.
 
मुसलमान असंही मानतात की, अल्लाहने पैगंबर अब्राहम यांना त्या दोघांना आपल्या नशिबावर सोडून द्यायला सांगितलं होतं. त्यांना खाण्याच्या काही गोष्टी आणि थोडं पाणी देण्यात आलं होतं.
 
काही दिवसांतच हे सामान संपून गेलं होतं. भूक आणि तहानेने हाजरा आणि इस्माईल व्याकूळ झाले होते.
 
मुसलमानांचं म्हणणं आहे की, हतबल हाजरा मक्का इथल्या सफा आणि मरवाच्या डोंगराळ भागातून मदतीसाठी खाली उतरली. भुकेने व्याकूळ आणि थकलेली हाजरा खाली कोसळली आणि संकटातून मुक्त करण्यासाठी तिने अल्लाहला साद घातली.
 
यावेळी इस्माईलने जमिनीवर पाय आपटला तर आतून पाण्याचा झरा फुटून बाहेर आला आणि दोघांचा जीव वाचला.
 
हाजरा यांनी हे पाणी सुरक्षित केलं आणि खाण्याचं सामान मिळवण्यासाठी या पाण्याचा व्यापार सुरू केला. या पाण्याला आब-ए-जमजम म्हणजेच जमजम विहिरीचं पाणी म्हटलं जातं. मुसलमान याला सगळ्यांत पवित्र पाणी मानतात. हज यात्रेनंतर यात्रेकरू या पवित्र पाण्याला आपल्या घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.
 
जेव्हा पैगंबर पॅलेस्टाईनहून आले तेव्हा त्यांनी पाहिलं की त्यांचं कुटुंब एक चांगलं आयुष्य जगत आहे. त्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. याच दरम्यान पैगंबर अब्राहम यांना अल्लाहने एका तीर्थस्थळाची निर्मिती करण्यास सांगितली. पैगंबर अब्राहम आणि अल्लाह यांनी एक छोटी चौकोनी इमारत निर्माण केली. यालाच काबा म्हटलं जातं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विधान परिषदेसाठी आनंद शिंदेंना राष्ट्रवादीची पसंती