Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ट्रिपल तलाकविरोधात पहिला मोर्चा काढणारा समाजसुधारक: हमीद दलवाई

ट्रिपल तलाकविरोधात पहिला मोर्चा काढणारा समाजसुधारक: हमीद दलवाई
, शुक्रवार, 26 जुलै 2019 (09:15 IST)
सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांच्याशी बीबीसी मराठीने केलेल्या चर्चेवर आधारित.
 
लोकसभेत 303 विरुद्ध 78 इतक्या मतांनी मुस्लीम महिला विवाह हक्क संरक्षण विधेयक मंजूर झालं. या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होण्यासाठी अजून दोन टप्पे पार पडणं आवश्यक आहेत. या विधेयकाला राज्यसभेची मंजुरी हवी आणि त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी हवी. त्यानंतर तिहेरी तलाक रद्द होऊ शकतो.
 
तिहेरी तलाक रद्द व्हावं यासाठी सर्वांत आधी प्रयत्न केले ते म्हणजे समाजसुधारक हमीद दलवाई यांनी.
 
मुस्लीम समाजातले विवाह आणि घटस्फोट हे कायद्याच्याच चौकटीत व्हावे असा त्यांचा आग्रह होता. इतकंच नव्हे तर बहुपत्नीत्व आणि हलालासारख्या प्रथाही बंद व्हाव्यात असं त्यांना वाटत असे. 1960 च्या दशकात त्यांनी तिहेरी तलाकविरोधातली आपली भूमिका मुस्लीम समाजाला सांगण्यास सुरुवात केली.
 
18 एप्रिल 1966 रोजी हमीद दलवाईंनी अवघ्या सात मुस्लीम महिलांसह विधानभवनावर मोर्चा काढला होता. तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडे त्यांनी निवदेन सादर केलं. तिहेरी तलाक रद्द व्हावा यासाठी दलवाई यांनी आंदोलन उभं केलं होतं. हे आंदोलन अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी 22 मार्च 1970 रोजी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
 
अवघ्या सात बायकांना घेऊन निघलेला हा 'मोर्चा' कसा असावा याची आज आपल्याला कल्पना येणं कठीण आहे. हा मोर्चा छोटा होता पण त्यामागे विचार मोठा होता. या मोर्चामध्ये त्यांच्या घरातीलच तीन महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांची बहिण फातिमाबी, त्यांची पत्नी मेहरून्निसा आणि त्यांची वहिनी या मोर्चात सामील झाल्या होत्या. इतिहासात पहिल्यांदाच शरियाविरोधात कुणी रस्त्यावर आलं होतं.
 
दलवाईंचं बालपण
हमीद दलवाई यांचा जन्म कोकणात मिरजोली येथे 29 सप्टेंबर 1932 मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांनी एकूण 4 लग्न केली होती. बहुपत्नीत्वाचे प्रश्न काय असतात आणि त्याचा कुटुंबावर काय परिणाम होतो याची जाणीव त्यांना बालवयातच झाली होती. वयाच्या 14 व्या वर्षीच त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश घेतला होता.
 
तेव्हापासूनच महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि राजा राम मोहन रॉय यांच्या विचारांचा प्रभाव पडू लागला. हिंदू धर्मातल्या बालविवाह आणि सतीप्रथेचा विरोध राजा राम मोहन रॉय यांनी केला होता. तसेच आगरकर हे समाजसुधारकांचे अर्ध्वयू बनले होते.
 
त्यांचा अभ्यास केल्यावर दलवाई यांच्या लक्षात आलं की समाजसुधारणा या फक्त एखाद्या धर्मापुरत्याच मर्यादित असता कामा नयेत. ज्या प्रमाणे हिंदू धर्मातील प्रथांविरोधात त्याच धर्मातील लोकांनी आवाज उठवला त्याचप्रमाणे आपणही मुस्लीम धर्मातील कुप्रथांविरोधात आवाज उठवला पाहिजे असं त्यांना वाटू लागलं.
 
प्रतिकूल परिस्थितीतही लढा
तोपर्यंत दलवाई यांची इंधन आणि लाट ही दोन पुस्तकंही प्रकाशित झाली होती. या पुस्तकांमुळे त्यांची ओळख एक दर्जेदार साहित्यिक अशी बनली होती. आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्रात ते पत्रकार म्हणून काम करू लागले होते. त्यावेळी अत्रेंनी त्यांना सांगितलं, की जर तुम्हाला समाज समजून घ्यायचा असेल तर देशातल्या मुस्लीम बुद्धिजीवी लोकांशी चर्चा करा. या विचारमंथनातूनच त्यांनी 'इस्लामचं भारतीय चित्र' हा ग्रंथ लिहिला होता.
 
मुस्लीम समाजात महिला हक्कांविषयी जागरूकता नाही, अशी जाणीव त्यांना झाली. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी 'सदा-ए-मिसवा' म्हणजेच महिलांची हाक अशी संघटना काढली.
 
त्यानंतर त्यांनी 'इंडियन सेक्युलर सोसायटी'ची स्थापना केली. 1970 मध्ये मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि 1971 मध्ये 'ऑल इंडिया फॉरवर्ड लुकिंग काँफरन्स'ची त्यांनी स्थापना केली. या संस्थेमार्फत त्यांनी पुणे, मुंबईमध्ये परिषदा घेतल्या.
 
त्यांनी सुरू केलेल्या कार्याला कडव्या धर्मनिष्टांचा विरोध होऊ लागला होता. दलवाई यांचा विरोध करण्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ प्रोटेक्शन कमिटीची स्थापना करण्यात आली. 1973 मध्ये या कमिटीचं नाव 'ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड' असं ठेवण्यात आलं. त्यांच्यावर पुण्यातील मोमीनपुऱ्यात हल्ला झाला होता. तसेच जेव्हा ते अलीगढ विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी गेले होते तेव्हा त्यांच्यावर थुंकण्यात आलं होतं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये दलवाईंनी आपलं काम सुरू ठेवलं होतं. इतकंच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर काही लोकांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला होता.
 
1975 मध्ये ते आजारी पडले आणि 3 मे 1977 रोजी त्यांचं निधन झालं. हे कार्य करण्यासाठी त्यांना केवळ दहा वर्षं मिळाली. पण त्यांनी सुरू केलेल्या कार्यामुळेच आज हजारो मुस्लीम महिला आपल्या हक्कांसाठी लढताना दिसत आहेत.
 
त्यांचं जीवन हे जितकं संघर्षमय होतं तितकाच त्यांचा मृत्यूही संघर्षमय ठरला. त्यांनी आपल्या मृत्युपत्रात लिहिलं होतं की माझा अंत्यविधी हा कोणत्याच धर्मानुसार होऊ नये. चंदनवाडीतल्या विद्युतवाहिनीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंतर कोणताही धार्मिक संस्कार झाला नाही. त्यांनी आपली जी इच्छा जाहीर केली होती त्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती. दफनविधीला नाही म्हणणारा कसला मुसलमान अशी टीका त्यांच्यावर झाली होती.
 
'मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया' या पुस्तकात रामचंद्र गुहा यांनी हमीद दलवाई यांचा उल्लेख 'द लास्ट मॉडर्निस्ट' असा केला आहे.
 
त्यांच्या मृत्यूनंतर तत्कालीन परराष्ट्र मंत्री अटल बिहारी वाजपेयी शोकसंदेशात म्हटलं होतं, 'Hindus too needed Hameed Dalwai.' हमीद दलवाई यांची केवळ मुस्लीम समाजालाच नाही तर हिंदू समाजालाही तितकीच आवश्यकता होती असे उद्गार वाजपेयी यांनी काढले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

समुद्वारात वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे महाराष्ट्रात वळविणारा राज्यातील पहिला देवसाने (मांजरपाडा) प्रकल्प पूर्ण