Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोकियो ऑलिम्पिक जपानसाठी 'इकडे आड तिकडे विहिर' झालंय का?

टोकियो ऑलिम्पिक जपानसाठी 'इकडे आड तिकडे विहिर' झालंय का?
, शुक्रवार, 28 मे 2021 (18:59 IST)
यंदाच्या ऑलिम्पिकचं यजमानपद जपानकडे आहे. टोकियो ऑलिम्पिक सुरू होण्यासाठी अवघ्या दोन महिन्याचा कालावधी उरला आहे आणि त्यातच जपानमध्ये कोव्हिडचा प्रादूर्भाव वाढतोय.
 
कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जपानमधल्या ज्या शहरांमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे त्यात टोकियोचाही समावेश आहे. मात्र, तरीही ऑलिम्पिक नियोजित वेळेतच घेण्याचं आवाहन आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) केलं आहे.
 
ऑलिम्पिक कधी आणि कुठे आहे?
23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान जपानची राजधानी टोकियोमध्ये ऑलिम्पिक 2020चं आयोजन करण्यात आलं आहे.
 
खरंतर गेल्या वर्षीच ही स्पर्धा पार पडणार होती. मात्र, कोरोना संकटामुळे इतर अनेक महत्त्वाच्या स्पर्धांप्रमाणेच ऑलिम्पिक 2020 ही स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली होती.
ऑलिम्पिकबरोबरच पॅरालिम्पिक स्पर्धाही 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या दरम्यान पार पडणार आहे.
 
ऑलिम्पिकमध्ये एकूण 42 ठिकाणी 33 क्रीडा प्रकारातील 339 स्पर्धा पार पडतील तर पॅरालिम्पिकमध्ये एकूण 21 ठिकाणी 22 क्रीडा प्रकारातील 539 स्पर्धा पार पडतील.
 
यापैकी बहुतांश स्पर्धा या ग्रेटर टोकियोमध्ये होतील. तर फुटबॉल आणि मॅराथॉनमधल्या काही स्पर्धा होक्काईदोमधल्या हॅप्पोरो शहरात होणार आहेत. हॅप्पोरोमध्येही सध्या आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.
 
जपानमध्ये कोव्हिड परिस्थिती कशी आहे?
जपानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या तुलनेने कमी आहे. मात्र, एप्रिलमध्ये तिथं कोरोनाची नवीन लाट आली. गेल्यावर्षीपासून आतापर्यंत जपानमध्ये एकूण 7 लाख 20 हजार कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे तर 12,200 जणांचा कोव्हिडमुळे मृत्यू झाला आहे.
 
एप्रिलमध्ये आलेल्या नव्या लाटेमुळे जपानमधल्या बहुतांश भागांमध्ये मेपर्यंत आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. तर काही भागांमध्ये 20 जूनपर्यंत निर्बंध लागू असतील.
 
इतर अनेक प्रगत देशांच्या तुलनेत जपानमध्ये लसीकरणाची सुरुवात उशिरा झाली. फेब्रुवारी महिन्यापासून जपानमध्ये लसीकरण सुरू झालं.
 
आजघडीला जपानमध्ये 29 लाख नागरिकांनी लस घेतली आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात बघितल्यास जपानमध्ये केवळ 2.3% लसीकरण झालं आहे.
जपानमधल्या टोकियो आणि ओसाका या दोन शहरांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलाय. त्यानंतर मे महिन्याच्या उत्तरार्धात या दोन्ही शहरांमध्ये व्यापक प्रमाणावर लसीकरणाला सुरुवात झाली. जुलै अखेरपर्यंत 65 वर्षांहून मोठ्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, अशी आशा अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
 
कोव्हिड परिस्थिती बघता तयारी कशी सुरू आहे?
विषाणूमुळे जपानने परदेशी नागरिकांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. याचाच अर्थ ऑलिम्पिकसाठी परदेशातून क्रीडारसिक खेळ बघायला येऊ शकणार नाहीत.
 
देशांतर्गत क्रीड चाहत्यांना मात्र स्टेडिअमवर जाऊन स्पर्धेचा आनंद घेता येईल. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता स्टेडिअमवर प्रेक्षकांना परवानगी द्यायची की नाही, यावर अंतिम निर्णय झालेला नाही.
 
परदेशी खेळाडू आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ यांना जपानमध्ये येण्यापूर्वी आणि दाखल झाल्यानंतर कोव्हिड चाचणी करणं बंधनकारक असणार आहे.
 
त्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याची गरज नाही. मात्र, खेळाडूंसाठीच्या बायो बबलमध्ये त्यांना रहावं लागले. त्यांना स्थानिकांशी मिसळता येणार नाही.
 
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या जवळपास 80% खेळाडूंचं लसीकरण पूर्ण झालेलं असेल, असा अंदाज IOC ने व्यक्त केला असला तरी स्पर्धेसाठी लसीकरण करणं गरजेचं नाही. स्पर्धा संपेपर्यंत खेळाडूंची रोज चाचणी होईल.
 
जपानी नागरिकांना काय वाटतं?
जपानमध्ये नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यात 70% लोकांनी ऑलिम्पिकच्या विरोधात मत व्यक्त केलं आहे.
टोकियो प्रांतातील ज्या वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यापैकी अनेकांनी परदेशी खेळाडूंमुळे कोरोनाच्या फैलावात अधिक भर पडेल आणि आरोग्य यंत्रणेवर ताण येईल, या कारणास्तव माघार घेतली आहे.
 
मे महिन्याच्या सुरुवातीला डॉक्टरांच्या संघटनेने सरकारला पत्र लिहून कोरोना संकटाची सद्यपरिस्थिती बघता ऑलिम्पिकचं आयोजन करणं 'अशक्य' असल्याचं म्हटलं होतं.
 
जपानमधील नामांकित व्यावसायिकांपैकी एकाने ऑलिम्पिकचं आयोजन करणं चुकीचं असल्याची टीका केली होती.
 
जपानमधील सॉफ्टबँक या बँकेचे सीईओ मसायोशी सोन यांनी एक ट्वीट करत 'ऑलिम्पिक पुढे ढकलावं किंवा रद्द करावं', अशी अनेकांची इच्छा असल्याचं म्हणत 'कुठल्या आधारावर या स्पर्धेची सक्ती केली जात आहे?', असा प्रश्न विचारला होता.
 
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 'असाही शिम्बून' या वृत्तपत्रानेही लेख लिहित ऑलिम्पिकचं आयोजन रद्द करण्याचं आवाहन केलं होतं.
 
खेळाडूंच्या प्रतिनिधींचं म्हणणं काय आहे?
अनेक संस्था आणि तज्ज्ञांनीही स्पर्धेच्या आयोजनावर चिंता व्यक्त केली आहे.
 
60 देशातील 85 हजार खेळाडूंचं प्रतिनिधित्व करणाऱ्या द वर्ल्ड प्लेअर्स असोसिएशन या संस्थेने खेळाडूंच्या सुरक्षेसाठी IOC ने अधिक पावलं उचलणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. शारीरिक अंतर राखण्यासाठी अधिक कठोर उपाय करणं गरजेचं असल्याचं तसंच अधिक प्रभावी आणि कठोर चाचण्या घेणंही गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
 
इतकंच नाही तर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंकडून करारावर स्वाक्षरी घेण्याचा निर्णयही IOC ने मागे घ्यावा, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.
जपानमधल्या खेळाडूंनी यावर अजून उघडपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, जपानमधील स्टार टेनिसपटू नाओमी ओसाकाने या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी, असं म्हटलं आहे.
 
Olympians and Power Games: A Political History of the Olympics या पुस्तकाचे लेखक जुल्स बॉयकॉफ यांनीही न्यूयॉर्क टाईम्स वृत्तपत्रात लेख लिहून स्पर्धा रद्द करण्याचं आवाहन केलं आहे.
 
आपल्या लेखात 'क्रीडा स्पर्धा कोव्हिड-19 आजाराचा सुपरस्प्रेडर ठरू नये', असं म्हणत "आर्थिक फायद्यापेक्षा लोकांचं आरोग्य जास्त महत्त्वाचं असल्याचं" ते लिहितात.
 
इतर राष्ट्रांचं काय म्हणणं आहे?
अजूनतरी कुठल्याच महत्त्वाच्या राष्ट्राने ऑलिम्पिक आयोजनाविरोधात भूमिका मांडलेली नाही.
 
जपानमध्ये कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता अमेरिकेने आपल्या नागरिकांना जपानला न जाण्याचा इशारा दिला आहे. मात्र, अमेरिकी खेळाडू स्पर्धेत नक्कीच सहभागी होतील, अशी खात्री अधिकारी व्यक्त करतात.
 
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनीही स्पर्धेला पाठिंबा दर्शवला आहे. पुढल्या हिवाळ्यात म्हणजेच फेब्रुवारी 2022 च्या स्पर्धेचं आयोजन चीनकडे आहे.
 
ऑलिम्पिक स्पर्धा रद्द होऊ शकते का?
होय. मात्र, युद्ध किंवा नागरी उठावासारख्या अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत.
 
महत्त्वाचं म्हणजे IOC आणि यजमान टोकियो यांच्यात झालेल्या करारानुसार स्पर्धा रद्द करण्याचा अधिकार केवळ IOC कडे आहे.
 
प्रसारण हक्कातून 70% तर प्रायोजकत्वातून 18% कमाईचा IOCचा विचार आहे. मात्र, स्पर्धा रद्द झाल्यास IOC चं मोठं आर्थिक नुकसान होऊ शकतं आणि ऑलिम्पिकच्या भविष्यालाही फटका बसू शकतो.
 
शिवाय, सर्व खबरदारी घेऊन स्पर्धा आयोजित करता येऊ शकेल, असं IOC कडून वारंवार सांगितलं जात आहे. त्यामुळे टोकियो ऑलिम्पिक रद्द होण्याची शक्यता फार धूसर आहे.
 
जर टोकियो IOC बरोबरचा करार मोडून स्पर्धा रद्द करायची असेल तर त्यासाठी जो आर्थिक भुर्दंड येईल तो जपानला सोसावा लागणार आहे.
टोकियो ऑलिम्पिक 2020चं बजेट आहे तब्बल 12.6 अब्ज डॉलर्स. मात्र, प्रत्यक्षात याहून दुप्पट खर्च येईल, असा अंदाज वर्तवला जातोय.
 
स्पर्धेतील बराचशा भागाचा विमा उतरवण्यात आला असला तरीही स्पर्धा रद्द झाल्यास मोठं आर्थिक नुकसान होणार, हे निश्चित.
 
आधीच ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आलेली आहे. त्यात परदेशी क्रीडा रसिकांची अनुपस्थिती यामुळे यजमान देश आणि IOC यांच्या अपेक्षित नफ्याला आधीच कात्री लागली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वातंत्रवीर सावरकरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे -चंद्रकांत पाटील