Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

हेमंत नगराळे: मुंबई पोलीस दलाच्या नव्या आयुक्तांविषयी या गोष्टी माहित आहेत का?

Hemant Nagarale: Do you know these things about the new Commissioner of Mumbai Police?
, बुधवार, 17 मार्च 2021 (17:47 IST)
सचिन वाझेप्रकरणी मुंबई पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
परमबीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जबाबदारी देण्यात आली आहे. रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
कोण आहेत हेमंत नगराळे?
हेमंत नगराळे हे मूळचे चंद्रपूरचे असून तिथल्या भद्रावती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर नागपूर इथल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये पुढचं शिक्षण घेतले.
नगराळे हे मेकॅनिकल इंजिनीअर असून फायनान्स मॅनेजमेंट विषयात त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतलं आहे. 1987च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या नगराळे यांच्याकडं सध्या महासंचालकपदाची जबाबदारी होती.
नगराळे यांनी आयपीएस अधिकारी म्हणून राज्यातील अनेक जिल्ह्यांसह दिल्लीतही सेवा बजावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा या नक्षलग्रस्त भागात त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली होती. 1992 ते 1994 या काळात ते सोलापूरमध्ये पोलीस उपायुक्त होते.
सोलापूर जिल्ह्यात नवे आयुक्तालय सुरू करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. 1992 च्या दंगलीनंतर सोलापूरमधील कायदा व सुव्यस्थेची स्थिती त्यांनी उत्तम प्रकारे हाताळली होती. त्याबद्दल त्यांचं कौतुक झालं होतं.
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक असताना 1994 ते 1996 या काळात दाभोळ ऊर्जा कंपनीशी संबंधिक भूसंपादनाचं प्रकरण त्यांनी हाताळलं होतं. 1996 ते 1998 मध्ये पोलीस अधीक्षक, सीआयडी व गुन्हे शाखेत विविध पदांवर असताना त्यांनी राज्यव्यापी असलेल्या एमपीएससी पेपर फुटी प्रकरणाची चौकशी केली होती.
लहान मुलांचे अपहरण व हत्या करणाऱ्या कुप्रसिद्ध अंजनाबाई गावित हिच्या विरोधातील प्रकरणाची चौकशीही नगराळे यांनी केली होती. सर्वोच्च न्यायालयानं कालांतराने गावित हिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.
1998 ते 2002 या काळात सीबीआयसाठी मुंबई व दिल्लीतही सेवा बजावली. सीबीआयच्या सेवेत असताना बँक ऑफ इंडियातील केतन पारेख घोटाळा, माधोपुरा को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा, हर्षद मेहताचा घोटाळा अशा अनेक प्रकरणांच्या चौकशीत महत्त्वाची भूमिका बजावली. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीत त्यांनी बारकाईनं केलेल्या तपासाचं कौतुक झालं होतं.
2016 मध्ये नगराळे हे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. त्यावेळी तेथील बँक ऑफ बडोद्यावरील दरोड्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या दरोड्याची देशभर चर्चा झाली होती. नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकानं अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला होता.
गायक जस्टिन बिबरच्या कार्यक्रमा दरम्यान कायदा व सुव्यवस्था उत्तम राखल्याबद्दलही सरकारतर्फे त्यांचं कौतुक करण्यात आलं होतं. कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करणारे अधिकारी अशी त्यांची ख्याती आहे.
नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना 2018 साली नगराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवसुली प्रकरणात बँकेचे अध्यक्ष व संचालकांविरोधात एफआयआर दाखल करण्याचा आदेश नगराळे यांनी दिला होता.
त्यात शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचाही समावेश होता. विधान परिषदेच्या सभापतींच्या मंजुरीशिवाय कोणत्याही आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल न करण्याचा नियम आहे. हा नियम मोडल्याबद्दल नगराळे यांच्यासह पोलीस उपायुक्त तुषार जोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
मराठी आरक्षणासंदर्भात मोर्चा मुंबईत आलेला असताना, नगराळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन केलं होतं.
राज्यातील फॉरेन्सिक सायन्स प्रयोगशाळांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती.
नगराळे यांना राष्ट्रपती पोलीस पदक, विशेष सेवा पदक आणि आंतरिक सुरक्षा पदकानं गौरवण्यात आलं आहे.
ज्युडोत ब्लॅक बेल्ट पटकावणारे नगराळे उत्तम गोल्फही खेळतात. त्यांना टेनिस खेळायलाही आवडतं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन वाझे प्रकरण : अनिल देशमुख वर्षावर उद्धव ठाकरेंच्या भेटीला