-चंदन जजवाडे
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय पैलवान विनेश फोगाटला जास्त वजन भरल्यामुळे अपात्र घोषित करण्यात आलं.
विनेश फोगाट बुधवारी अंतिम सामना खेळणार होती. मात्र सकाळी तिचं वजन केलं तेव्हा 100 ग्रॅम पेक्षा जास्त होतं.
क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी संसदेत या मुद्द्यावर मत मांडलं. ते म्हणाले, “भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला पॅरिस ऑलिंपिक मध्ये निर्धारित वजनापेक्षा 100 ग्रॅम वजन जास्त असल्यामुळे बाहेर पडावं लागलं आहे.”
विनेश 50 किलो ग्रॅम वर्गात खेळत होती. त्याप्रमाणे तिचं वजन 50 किलो असणं गरजेचं होतं.
विनेश फोगाट अपात्र ठरल्यावर एका दिवसात वजन जास्त किंवा कमी होऊ शकतं का या चर्चेला उधाण आलं आहे.
याच मुद्द्यावर पुरुषांपेक्षा महिलांना वजन कमी करणं जास्त अवघड असतं का असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
विनेश फोगाटने 53 किलो हा गट सोडून 50 किलो या गटात सहभाग घेतला होता. त्यामुळे तिला तिचं वजन कमी करावं लागलं होतं.
भारतीय ऑलिंपियन बजरंग पुनियाने सांगितलं की विनेशने वजन कमी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.
वजन कमी करणं महिलांसाठी किती कठीण?
पुनिया यांच्या मते, “पुरुष आणि महिलांच्या वजनात खूप फरक असतो. पुरुषांना घाम जास्त येतो त्यामुळे त्यांचं वजन लवकर कमी होतं. विनेश गेल्या सहा महिन्यांपासून थोडं पाणी पित होती आणि एक दोन पोळ्या खात होती.”
अंतिम फेरीच्या आधीसुद्धा तिने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिचं वजन जास्त भरलं.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाच्या मेडिकल टीमचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी सांगितलं, “विनेशसाठी 1.5 किलो अन्न गरजेचं होतं. कारण ती तीन मॅचेस खेळली होती. त्यामुळे तिला खाण्यापिण्याची गरज होती. उपांत्य फेरीनंतर तिचं वजन 2.7 किलो जास्त होतं.”
“वजन कमी करण्यासाठी जो वेळ आम्हाला हवा होता तो आमच्याकडे नव्हता. आम्ही तिचं वजन कमी करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.”
दिल्लीतील एम्सच्या मेडिसिन विभागाचे प्रा. नवल के. विक्रम यांनी लोकांच्या वजनाशी निगडित अनेक मुद्द्यांवर अभ्यास केला आहे आणि हा विषयही शिकवला आहे.
ते म्हणतात, “महिला आणि पुरुषांच्या वजन कमी करण्याच्या क्षमतेत काही फरक आहे असं मला वाटत नाही. मात्र दोघांच्या शरीर रचनेत फरक असतो आणि महिलांचं वजन वाढण्याची अनेक कारणं असतात.”
महिला आणि पुरुष यांच्या वजन कमी करण्याच्या बाबतीत घाम हा फार मोठा मुद्दा नाही असं त्यांना वाटतं.
मात्र डायटिशियन आणि वेलनेस एक्सपोर्ट दिव्या प्रकाश म्हणतात की शरीरातून पाणी निघेल तेव्हाच वजन कमी होईल. जर तुम्ही एक लीटर घाम वाहवला तर तुमचं वजन एक किलो कमी होईल.
एका दिवसात वजन कमी किंवा जास्त होऊ शकतं का?
दिव्या प्रकाश यांच्या मते, पाळीच्या दरम्यान महिलांचं वजन वाढतंच. ते 700 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत वाढतं. मात्र हे महिलांच्या शरीरावर आणि त्यांच्या कामाच्या प्रकारावर अवलंबून असतं.
दिव्या म्हणतात की हा वैयक्तिक प्रश्न आहे आणि एखाद्याचं वजन का वाढलं हे सांगता येणं कठीण आहे.
घाम गाळणं हा वजन कमी करण्याचा एक मार्ग आहे. पण वजन नेहमी हळूहळू कमी करणं सुरक्षित असतं. नाहीतर शरीरात पाण्याचं प्रमाण कमी होतं.
“विनेश फोगाटने इतका घाम वाहवला की तिच्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी झालं आणि तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं.”
घाम निघण्यात शरीराच्या एकूण आकारामानाची महत्त्वाची भूमिका असते. पुरुषांच्या शरीराचं आकारमान जास्त असतं त्यामुळे त्यांचा घाम जास्त निघतो.
काही तज्ज्ञांच्या मते एखाद्या पुरुषाने धावून 300 कॅलरी जाळल्या तर तितक्याच वेळात महिला फक्त 180 कॅलरी जाळू शकते.
त्याशिवाय महिलांचं शरीर पुरुषांच्या तुलनेत कमी ॲथलेटिक असतं. म्हणजे त्यांच्या शरीरात स्नायू कमी असतात. त्यांचा बीएमआर (बेसल मेटबॉलिक रेट) जास्त असतो.
यामुळे सुद्धा महिलांचा वजन कमी होण्याचा वेग मंदावतो असं दिव्या यांना वाटतं.
महिलांचं वजन जास्त होणं किंवा कमी होणं हे हार्मोन्सच्या बदलांवर अवलंबून असतं.
एम्स मधील डॉक्टर नवल यांच्या मते पाळी सुरू झाल्यावर, गरोदर झाल्यावर, मुलांच्या जन्मानंतर, पाळी थांबल्यानंतर हार्मोन्समध्ये प्रचंड बदल होतात. हे बदल पुरुषांमध्ये होत नाही.
पुरुष आणि महिलांच्या शरीरातील चरबीच्या प्रमाणातही फरक असतो. एकाच वयाच्या पुरुषामध्ये स्नायू जास्त असतात. महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत फॅट्स जास्त असतात.
पुरुषांचं शरीर महिलांपेक्षा वेगळं
फोर्टिस हॉस्पिटलच्य सी-डीओसीचे चेअरमन अनुप मिश्रा म्हणतात की महिलांना कोणत्याही वयात वजन कमी करणं कठीण नसतं. विशेषत: महिला 20-25 वयाची असेल आणि तिच्या शरीरात फॅट्स जास्त नसतील तर अजिबात कठीण नसतं.
“वय वाढल्यानंतर त्यांच्या हार्मोनमध्ये बदल होतात त्यामुळे वजन कमी करण्यात अडथळे येऊ शकतात. घामाचा विचार करायचा झाला तर पुरुषांमध्येही कमी घाम निघतो त्यामुळे वजन कमी करण्यात जास्त फरक पडत नाही.”
अनुप मिश्रा यांच्या मते आपण द्रव पदार्थांचं सेवन कमी केलं आणि लघवीला जास्त गेलो तर ते वजन कमी करण्यासाठी घामापेक्षा जास्त उपयुक्त होतं.
त्यांच्या मते महिलांमध्ये पाळीच्या आधी आणि त्यानंतर फ्लुईड शिफ्ट जास्त प्रमाणात होतं त्यामुळे त्यांचं वजन वाढू शकतं.
जर तुम्ही द्रव पदार्थ घेत असाल आणि जास्त कॅलरी असलेले जेवण करत असाल तर तुमचं वजन एका दिवसात 1.5 किलो वाढू शकतं.
असं म्हणतात की एका पिझ्झ्यात 1800 कॅलरी, एका पेस्ट्रीत 400 कॅलरी आणि एका समोस्यात 250 कॅलरी इतकी ऊर्जा असते. अशा परिस्थितीत एखाद्या व्यक्तीने जास्त कॅलरी असलेलं जेवण केलं तर त्याचं वजन लगेच वाढू शकतं.
तज्ज्ञांच्या मते एखाद्या व्यक्तीला वजन कमी करण्यासाठी 7200 कॅलरी कमी कराव्या किंवा जाळाव्या लागतात.