Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंदुरीकर महाराजांवर 'त्या' वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल

इंदुरीकर महाराजांवर 'त्या' वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल
, शुक्रवार, 26 जून 2020 (11:25 IST)
कीर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकार महाराज यांच्यावर अहमदनगरमधील संगमनेर कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (PCPNDT) कायद्याअंतर्गत इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
 
इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीची नोटीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी अहमदनगरच्या जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना 17 फेब्रुवारीला बजावली होती. मात्र, ती तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती. त्यानंतर गवांदे यांनी 27 फेब्रुवारी 2020 रोजी कोर्टामार्फत नोटीस दिली. कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर अखेर 19 जून रोजी इंदुरीकरांविरोधात संगमनेर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
 
अॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अधिकाऱ्यांना पाठवलेल्या नोटिशीत बीबीसी मराठीनं 13 फेब्रुवारी 2020 रोजी केलेल्या बातमीचा उल्लेख करण्यात आला आहे.
 
त्यात म्हटलंय, "बीबीसी मराठी या न्यूज पोर्टलनं 13 फेब्रुवारी 2020मध्ये प्रसिद्ध केलेल्या बातमीमध्ये इंदुरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याचा उल्लेख केला आहे. एवढेच नाही तर बीबीसीनं म्हटलं आहे की, हे वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी प्रथम उरण इथं केलेलं नाही, तर त्यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये असंच वक्तव्य अहमदनगर जिल्ह्यातील शेलद इथं केलं होतं."
webdunia
इंदुरीकर महाराज काय म्हणाले होते?
2 जानेवारी 2020 ला नवी मुंबईतल्या उरण येथे इंदुरीकर महाराजांचं किर्तन झालं.
 
त्यात त्यांनी म्हटलं, "स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होत असतो. स्त्री संग जर विषम तिथीला झाला, तर मुलगी होत असते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होत असते. याचा पुरावा विचाराल तर पुलश्य नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या स्त्रीसोबत सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या ऋषीनं पवित्र दिवशी संग केला, तर त्याच्यापोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूनं नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला."
 
इंदुरीकर महारांजांनी पहिल्यांदाच असं वक्तव्य केलंय असं नाही. त्यांनी आपल्या किर्तनांत अनेकदा हे वक्तव्य केलं आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यातल्या शेलदमध्ये फेब्रुवारी 2019मध्ये केलेल्या किर्तनात त्यांनी हेच वक्तव्य केलं होतं.
 
याच किर्तनात त्यांनी पुढे हेसुद्धा म्हटलंय की, "सोमवारी, एकादशीला स्त्री संग करणाऱ्या माणसाला क्षयरोग होतो."
 
इंदुरीकरांना नोटीस
इंदुरीकर महाराजांच्या वरील वक्तव्यामुळे त्यांना अहमदनरगच्या PCPNDT समितीनं नोटीस पाठवली होती. त्यावेळी बीबीसी मराठीनं अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांच्याशी बातचीत केली होती.
 
डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "आपलं महानगर या वर्तमानपत्रात इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याची बातमी आली होती. सम दिवशी समागम केल्यास मुलगा होतो, विषम दिवशी समागम केल्यास मुलगी होते. उजवीकडे फिरला तर मुलगा होतो, डावीकडे फिरला तर मुलगी होते, असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केल्याचं त्या बातमीत म्हटलं आहे. कोणत्याही पद्धतीनं लिंगनिदानाबद्दल वक्तव्य करणं किंवा जाहिरात करणं प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायद्याच्या (PCPNDT) 22 व्या कलमाचं उल्लंघन ठरतं. त्यामुळे पुण्यातल्या वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार इंदुरीकरांना बुधवारी (12 फेब्रुवारी) कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे."
 
ते पुढे म्हणाले होते, "वर्तमानपत्रात आलेल्या बातमीविषयी आपलं काय म्हणणं आहे, याविषयी तत्काळ उत्तर द्या, असं त्या नोटिशीत म्हटलं आहे. त्यामुळे इंदुरीकरांनी आज उत्तर देणं अपेक्षित आहे. सध्यातरी त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यांनी उत्तर न दिल्यास पुण्यातील PCPNDTच्या वरिष्ठ कार्यालयाच्या ज्या सूचना येतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ."
webdunia
इंदुरीकर महाराजांनी 'त्या' वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी
इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरीही व्यक्त केली होती. आपल्या वाक्यांमुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असं, एक पत्रक काढून इंदुरीकर यांनी म्हटलं होतं.
 
निवृत्ती देशमुख ते 'इंदुरीकर' महाराज
निवृत्ती देशमुख यांचा 9 जानेवारी 2019ला 48वा अभीष्टचिंतन सोहळा पार पडला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचं गाव. या गावाच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून इंदोरीकर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे 'इंदोरीकर'चा अपभ्रंश 'इंदुरीकर' असा झाला आणि आता ते इंदुरीकर याच नावाने ओळखले जातात.
 
इंदुरीकरांच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल त्यांचे सहकारी राधाकृष्ण गरड गुरुजी सांगतात, "कोतुळ इथल्या डी.एड कॉलेजवर इंदुरीकर शिक्षक होते. त्यांच्याकडे ज्ञान चांगलं होतं. शिवाय जनरल नॉलेजही उत्तम होतं. त्यामुळे ते सायकलवर खेड्यापाड्यांत जाऊन कीर्तन करायचे. विनोदाच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवायचे.
 
"पुढे त्यांच्या कीर्तनाला लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून आम्ही सहकाऱ्यांनी मिळून त्यांना कीर्तनाची कॅसेट काढायचा सल्ला दिला. 2000 साल होतं ते. मग कळसगावच्या दौलत वाघचौरे यांनी इंदुरीकरांचं लाईव्ह कीर्तन रेकॉर्ड केलं आणि त्याची कॅसेट काढली. या कॅसेट्स त्र्यंबकेश्वरला विकण्यासाठी ठेवण्यात आल्या, तेव्हा अवघ्या दोन तासात दोन हजार कॅसेट्स विकल्या गेल्या. नंतर मग महाराष्ट्रात त्यांची कीर्तनं गाजायला लागली."
webdunia
यानंतर राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन व्हायला लागलं. इंदुरीकरांच्या कीर्तनाची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांची तारीख मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्षं वाट पाहू लागले. इतकंच काय येरवडा मध्यवर्ती कारागृहासारख्या सरकारी वास्तूंमध्येही त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत १ हजार कोरोनाबाधितांचे मृत्यू दडवले गेले?