इंडियन प्रीमिअर लीग म्हणजेच IPLच्या 12व्या हंगामात मुंबई इंडियन्सने विजयश्री मिळवला.
शेवटच्या बॉलपर्यंत चाललेल्या या सामन्यात मुंबईने चेन्नई सुपर किंग्सला एका रनने हरवलं. आणि याबरोबरच मुंबई इंडियन्स सगळ्यात जास्त वेळा (4 वेळा) IPLचं जेतेपद पटकावणारी टीम बनली आहे.
तो सामना कसा रंगला, नेमकं मैदानाच्या आत आणि बाहेर कसा माहोल होता, हे तुम्ही इथे वाचूच शकता -
आता जाणून घेऊ या त्या प्रश्नाचं उत्तर, जो या क्षणी सर्वांच्याच मनात आहे - की या IPL खेळाडूंना लिलावाची रक्कम सोडून किती पैसा मिळाला?
खेळाडूंच्या वाटेला काय?
IPL जिंकणाऱ्या टीमला एकूण 20 कोटी रुपये मिळाले. नियमांनुसार या रकमेचा अर्धा भाग टीम फ्रेंचायझीला मिळतो तर अर्धा हिस्सा खेळांडूमध्ये वाटला जातो.
उपविजेत्या टीमला 12.5 कोटी रुपये मिळतात.
Emerging Player of the Season: या स्पर्धेदरम्यान सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूला एक ट्रॉफी दिली जाते आणि 10 लाख रुपयेही. या खेळाडूची निवड स्पर्धेतील कमेंटेटर्स तसंच IPLच्या वेबसाईट आणि अॅपवर लोकांनी दिलेल्या मतांवरून केली जाते. यंदा शुभमन गिलला हा पुरस्कार मिळाला आहे.
Orange Cap: संपूर्ण स्पर्धेदरम्यान सगळ्यात जास्त रन बनवणाऱ्या बॅटसमनला ऑरेंज कॅप दिली जाते. त्याबरोबर 10 लाख रुपयाचं रोख बक्षीसही. यंदा सनरायझर्स हैद्राबादच्या डेव्हिड वॉर्नरला ही कॅप मिळाली आहे. वॉर्नरने 69.20च्या सरासरीने 692 रन्स केले. त्याचा स्ट्राईक रेट 143.86 होता.
Purple Cap: स्पर्धेत सगळ्यात जास्त विकेटस घेणाऱ्या बॉलरला पर्पल कॅप दिली जाते. या खेळाडूलाही 10 लाख रुपये रोख बक्षीस दिलं जातं.या हंगामात पर्पल कॅप चेन्नई सुपरकिंग्सच्या इम्रान ताहीरला मिळाली. इम्रानने 26 विकेट घेतल्या.
Most Valuable Player: स्पर्धेत सर्वाधिक पॉइंटस मिळवणाऱ्या खेळाडूला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा किताब दिला जातो. हे पॉइंट्स त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर आधारित असतात - फोर, सिक्स, डॉट बॉल, कॅचेस, स्टंपिंग. या खेळाडूलाही 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जातं.
Perfect Catch of the Season: स्पर्धेदरम्यान सगळ्यात भारी कॅच घेणाऱ्या खेळाडूला 'परफेक्ट कॅच ऑफ द सिझन'चा अवॉर्ड दिला जातो. असा कॅच घेणाऱ्या खेळाडूला 10 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जातं. याची निवडही प्रेक्षकांच्या ऑनलाईन मतांमधून केली जाते. किरन पोलार्डने हा मान पटकावला.
Super Striker: IPL स्पर्धेत सगळ्यात जास्त स्ट्राइक रेट असणाऱ्या खेळाडूला एक लाख रुपये, एक SUV गाडी आणि ट्रॉफी दिली जाते. यंदा आंद्रे रसेलने या गाडीची चावी मिळवली.
Fair Play: याशिवाय आणखी एक असतो, तो म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड. आपल्या खेळादरम्यान विशेष खिलाडूवृत्ती दाखवणाऱ्या संघाला हा मान मिळतो. फक्त मान. नो कॅश. यंदा सनरायजर्स हैदराबादने हा मान पटकावला.