Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना आता भाजपला तडजोडीचा संकेत देत आहे का?

शिवसेना आता भाजपला तडजोडीचा संकेत देत आहे का?
, मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019 (14:24 IST)
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत जी रस्सीखेच सुरू आहे त्यात मुख्यमंत्रिपदाबाबत शिवसेनेची भूमिका लवचिक झाली आहे का, अशी शंका उपस्थित करणारं वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
 
माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. हरियाणात दुष्यंत चौटालांनी उपमुख्यमंत्रिपद घेत भाजपला पाठिंबा दिला, त्याचा संदर्भ देत ते म्हणाले आहेत की, "इथं कोणी दुष्यंत (चौटाला) नाही की ज्यांचे वडील तुरुंगात आहेत. इथं आम्ही आहोत जे धर्माचे आणि सत्याचं राजकारण करतो. इथं शरद पवार आहेत ज्यांनी भाजपच्या विरोधात वातावरण तयार करून निवडणूक लढले. इथं काँग्रेस आहे ज्यांच्याकडे आमदारांचा आकडा आहे आणि ते कधीच भाजपसोबत जाणार नाहीत."
 
हे सगळं बोलत असतानाच शिवसेनेसमोर इतर पर्याय असले तरी ते स्वीकारण्याचे पाप करणार नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. "आमची युती आहे आणि युतीच्या धर्माचे पालन आम्ही करत आहोत. जर कोणी युतीधर्माचे पालन करणार नसेल त्याबाबत मला काही म्हणायचे नाही. याला उत्तर जनताच देईल. आमच्याकडे इतर पर्यायही आहेत, पण ते पर्याय स्वीकारण्याचे पाप मी करू इच्छित नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय." असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय.
webdunia
'सरकार भाजपच्या नेतृत्वातच'
तर भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत निवडक पत्रकरांशी बोलताना त्यांनी ही गोष्ट स्पष्ट केली आहे.
 
"त्यांना (शिवसेनेला) ५ वर्षं मुख्यमंत्रीपद मिळावं असं वाटू शकतं. पण वाटणं आणि होणं यात फरक आहे. १९९५ चा फॉर्म्युला होईल की नाही याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. कोणती खाती द्यायची हे चर्चेला बसल्यावर कळेल," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.
 
उध्दव ठाकरेंचं आणि माझं निकालानंतर फोनवर बोलणं झालं आहे. आम्ही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
 
शनिवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होतं की शिवसेनेला अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्यात यावं आणि भाजपनं त्याबाबत लेखी आश्वासन द्यावं. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं 'पाप करणार नसल्याचं' वक्तव्य तडजोडीचा संकेत देणारं असल्याचं मानलं जातंय.
 
उपमुख्यमंत्रिपद आणि महत्वाच्या खात्यांवर सेना राजी होईल?
'फ्री प्रेस जर्नल' या दैनिकाचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार यांचं म्हणणं आहे की, सेनेनं वाटाघाटीचा संकेत दिला आहे. "इतर पर्याय स्वीकारण्याचे पाप आम्ही करू इच्छित नाही हे सांगून शिवसेनेनं भाजपला वाटाघाटीचा एक संकेत दिला आहे. आम्हाला फार ताणायचे नाही, तुम्हीही फार ताणू नका असं सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. बुधवारी मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दिलेला हा संदेश महत्त्वाचा आहे. आम्हाला पाप करायचं नाही पण करावं लागले तर तुमच्यामुळे करावं लागेल असाही राऊतांच्या या वक्तव्याचा अर्थ आहे."
 
अधिकाधिक गोष्टी पदरात पाडून घेण्यासाठी सेना प्रयत्न करत असल्याचं चुंचूवार यांचं म्हणणं आहे. "शिवसेना शुद्ध दबावाचं राजकारण खेळत आहे. अर्थात त्यांच्या जागेवर ते बरोबरच आहेत. गेली पाच वर्षं भाजपनं त्यांना जी वागणूक दिली, शिवसेनेची गरज नसल्यासारखं दाखवलं, त्याची वसुली करताना शिवसेना दिसतेय. जास्तीत जास्त पदरात पाडून घेणं ही सगळी रणनिती आहे. उपमुख्यमंत्रिपद आणि महसूल किंवा नगरविकास सारखी खाती घेऊन शिवसेना सत्तेत सामील होईल. फार ताणण्याचं धारिष्ट्य शिवसेनेत नाही."
webdunia
शिवसेनेच्या या काहीशा बदललेल्या भूमिकेला भाजपच्या ताठर भूमिकेची पार्श्वभूमी दिसत आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार.
 
"उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत. उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत," असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
 
तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना?
वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे की शिवसेनेत सत्तेतील सहभागाबाबत दोन मतप्रवाह आहेत, "सत्तावाटपाचा जो 50-50 चा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत ठरलेला आहे तो अंमलात आणण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. पण भाजप हा फॉर्म्युला मान्य करण्यास तयार दिसत नाहीये. उपमुख्यमंत्रिपद आणि आणखी काही महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार असल्याचं दिसत आहे. शिवसेनेत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. आत्ता नाही तर कधी नाही अशी शिवसेनेची टॅगलाईन होती आणि त्याच आधारावर 'मातोश्री'वरील मतप्रवाह आहे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचेच. पण दुसरा ज्येष्ठ नेत्यांचा जो मतप्रवाह आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी अनुभव घेऊन मगच मुख्यमंत्री व्हावं. यामध्ये कोणता मतप्रवाह वजनदार ठरेल त्यावरच आगामी घडामोडी अवलंबून आहेत."
 
"शिवसेनेचा इतिहास बघितल्यास सेना नेहमीच 'तुझं माझं जमेला अन् तुझ्यावाचून करमेना' या पद्धतीने भाजपसोबत जात आलीय हे आपण पाहिलं आहे. हेही या घडामोडींमध्ये महत्त्वाचं आहे."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेंद्र फडणवीस : भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल