Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

कोरोना व्हायरस : जयंत पाटील - '49 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा'

Jayant Patil
, सोमवार, 13 एप्रिल 2020 (15:01 IST)
राज्यात कोव्हिड-19चा विळखा सतत वाढत असताना सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरमधून एक दिलासा देणारी बातमी आली. ती म्हणजे तिथल्या 24 पैकी 22 रुग्णांची उपचारानंतरची प्राथमिक चाचणी निगेटिव्ह आली आहे. शिवाय लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून तिथं नवे रुग्ण आढळेलेले नाहीत.
 
हा इस्लामपूर पॅटर्न नेमका काय आहे, ते जाणून घेण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री आणि इस्लामपूरचे आमदार तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी स्काईपद्वारे चर्चा केली. त्याच चर्चेचा हा संपादित अंश...
 
प्रश्न - सांगलीतलं इस्लामपूर हॉटस्पॉट झालं होतं, त्यातून बाहेर पडण्यासाठी असं काय केलं, नेमका कुठला पॅटर्न राबवल्यामुळे हे शक्य झालं?
 
पाटील - राज्यात कोव्हिड-19चे रुग्ण आढळत असताना 19 मार्चला आम्ही ठरवलं की परदेशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन करायचं. पण 22 मार्चला दुर्दैवानं इस्लामपूरमध्ये 4 रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याचं कळालं. त्यानंतर आम्ही लगेच संपूर्ण एरिया लॉकडाऊन केला.
 
ज्या घरी हे रुग्ण आढळले त्यांच्या घराचा 500 मीटरचा परिसर संपूर्ण सील केला. त्या कुटुंबातल्या सर्वांना त्या परिसरातून बाहेर काढून घरातल्या सर्वांची तपासणी केली. जे पॉझिटिव्ह आढळले त्यांना लगेच क्वारंटाईन केलं. संपूर्ण इस्लामपूरमध्ये कंटेनमेंट झोन तयार करण्यात आला. कुणालाही बाहेर किंवा आत जाता येत नव्हतं.
 
संशयित रुग्ण व्यवस्थित शोधून काढले. अंगणवाडी आणि आशा सेविकांनी घराघरात जाऊन कुणाला लक्षणं आहेत का, याची चौकशी केली. संपूर्ण सांगली जिल्ह्यातल्या घराघरात त्या गेल्या, त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं. ज्यांना लक्षणं आढळली त्यांची लगेचच तपासणी करण्यात आली.
 
प्रश्न - इस्लामपूरमध्ये भाजीपाला आणायला लोकांना परवानगी दिली होती का?
 
पाटील - लोक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करत होते, नंतर लोकांनी अंतर ठेवून भाजी घ्यावी, असे प्रयोग केले. काही वेळा भाजी विक्री बंद करण्याचे आदेश द्यावे लागले. पण गर्दी टाळण्यासाठी मात्र आम्हाला पूर्णपणे भाजीविक्री नंतरच्या काळात बंद करावी लागली.
 
प्रश्न - धारावी आणि वरळी कोळीवाडा हॉटस्पॉट झाले आहेत, त्यांनी सांगली पॅटर्नमधून काय शिकलं पाहिजे?
 
पाटील - वरळी कोळीवाड्यात कॉमन फॅसिलिटी फार आहेत. त्यामुळे इथं झपाट्यानं संसर्ग झाला. कॉमन टॉयलेट्स किंवा कॉमन फॅसिलिटी, जिथं असतात तिथं हा आजार पसरतो असं दिसतं. त्यामुळे थोडं गैरसोयीचं होईल, पण कडक लॉकडाऊन धोरण राबवलं पाहिजे.
 
शिवाय, इथं संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं ट्रॅकिंग करणं गरजेचं आहे. त्यांची तपासणी करणं गरेजचं आहे. गर्दीच्या भागात कोव्हिड-19 जायला नको होता, पण तो दुर्दैवानं गेला आहे. आता गेला आहे तर कडक लॉकडाऊन करून त्याच्या पसरण्यावर मर्यादा आणायला हवी.
 
प्रश्न - आपण तिसऱ्या स्टेजमध्ये गेलोय, असं यावरून म्हणता येईल का?
 
जयंत पाटील - असं म्हणण्याची आज परिस्थिती नाही, आपण मुंबईत 18 हजार लोक तपासले आहेत, त्यापैकी 1,000 पॉझिटिव्ह आले आहेत. मी जे भाग सांगितले त्या भागात कॉमन फॅसिलिटीमुळे हा आजार पसरला आहे. त्या भागातच जर रोगाला अटकाव केला तर तो इतर भागात वाढणार नाही, अशी आम्हाला अपेक्षा आहे.
 
प्रश्न - मुंबईत जर भाजीपाला बंद केला तर मग तो घरपोच सर्वांना देणं प्रॅक्टिकली शक्य आहे का? सरकार तसा विचार करत आहे का?
 
पाटील - हो, थोडं नियोजन केलं तर शक्य आहे. ग्रामीण भागातील लोक भाजीपाला घेऊन जायला तयार नाहीत. त्यामुळे मुंबईतले ट्रक पाठवून भाजीपाला आणावा लागेल आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून गरजूंपर्यंत तो पोहोचवता येईल.
 
प्रश्न - मुंबई पुण्यात लॉकडाऊन सुरू ठेऊन इतर भागात किंवा ज्या 8 जिल्ह्यांमध्ये पेशंट नाही तिथं शिथिल होईल का? आणि जे हॉटस्पॉट आहेत, तिथं आणखी कठोर होणार आहे का?
 
पाटील - इस्लामपूरमध्ये आता लोक रिलॅक्स होत आहेत, ज्या गोष्टी पाळाव्यात त्या आता लोक पाळत नाहीत, हा मानवी स्वभाव आहे. पण आम्ही आमच्या जिल्ह्यात कडक धोरण ठेवायचं ठरवलं आहे. थोडं लॉकडाऊन रिलॅक्स केलं की लोक प्रवास करायला लागतात.
 
आता पोलिसांनी अटकाव केला की लोक त्यांना मारण्याचे व्हीडिओ येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठी काही पावलं हळूहळू घ्यायला हवी. त्याला व्यवस्थितरीत्या उचलणं करणं गरजेचं आहे. कंटेनमेंट झोन वगळून काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी पावलं उचलावी लागती.
 
(ही मुलाखत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लॉकडाऊन वाढवण्याच्या घोषणेपूर्वी घेण्यात आली होती.)
 
Image copyrightGETTY IMAGES
प्रतिमा मथळा
प्रातिनिधिक फोटो
प्रश्न - देशात आर्थिक आणीबाणी लागू होण्याची किती शक्यता आहे आणि ती लागू झाली तर काय होईल, हे तुम्ही सांगू शकाल का.
 
पाटील - आज आपल्या राज्यात GSTचं उत्पन्न शून्य आहे. कुठलाही स्टँपड्युटीचे व्यवहार होत नाहीये, उत्पादन शुल्कामधून काहीही येत नाहीये. राज्यच्या तिजोरीत काही येत नाहीये. 22 मार्चला लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे 31 मार्चपर्यंत येणारा कर आला नाही.
 
त्यामुळे सरकार आता कुठून व्यवस्था करणार? त्यामुळे पुढचे तीन-चार महिने आपल्याला फार कठीण जातील. पण नंतरच्या काळात गेलेले मजूर परत येतील, कारखाने सुरू होतील, लोकांमध्ये कोरोना गेल्याचा विश्वास निर्माण केला तर सर्व पूर्वपदावर येईल. पण व्यवस्थित लॉकडाऊन केलं तरच फायदा होईल. 49 दिवस क्लिअर कट लॉकडाऊन पाळला तर त्याचा फायदा होतो हे जगात आता लोकांच्या लक्षात येत आहे.
 
प्रश्न - पाणी भरण्यासाठी विहिरींवर बायका गर्दी करत आहेत, तिथं सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तुम्ही जलसंपदा मंत्री आहात - राज्यात सध्या पाण्याची स्थिती काय आहे, इतर राज्यांमधून पाण्याच्या टंचाईच्या बातम्या येत आहेत, आपल्याकडे तशी स्थिती उद्भवली तर सरकारचा काय ऍक्शनप्लान आहे?
 
पाटील - ज्या भागात नेहमी दुष्कळ असतो त्या भागातून आता पिण्याच्या पाण्याची मागणी येईल. यावेळी सुदैवानं बरा पाऊस झाला आहे. पण जिथून मागणी यईल तिथं टँकरनं पाणी द्यावं लागेल. काही गावांमध्ये टँकर सुरु झाले आहेत. एप्रिलच्या शेवटीशेवटी हे सकंट वाढेल. त्यामुळे कोरोनाचं संकट लवकर संपलं पाहिजे, म्हणजे आपल्याला या संकटाचा सामना करता येईल, पण पाणी वाटताना सोशल डिस्टंसिंग ठेवूनच ते द्यावं लागेल. पाणी द्यायला त्यामुळे वेळ लागेल, पण ते करावं लागेल.
 
प्रश्न - तुम्ही म्हणता की तुम्ही आता चिंता मुक्त झाला आहात, सांगलीच्या लोकांचं तुम्ही कौतुक केलं आहे तुम्ही. पण ही लढाई अजून सुरूच आहे असं नाही का तुम्हाला वाटत. जर शहर पुन्हा उघलं आणि पुन्हा पेशंट आले तर काय?
 
पाटील - याचा अर्थ आता सर्वंनी शिथिल राहावं असं नाही. शिथिलता येणं योग्य नाही. जे राज्याचं धोरण ठरेल तेच आम्ही सांगलीमध्ये राबवू, पण इस्लामपूरमध्ये आता पॉझिटिव्ह लोक निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे हळूहळू तिथं लोकांना ये जा करण्याची परवानगी देण्यात येईल. लोकांमध्ये जागरुकता आली आहे. काही गावांमध्ये लोकांनी झाडं कापून रस्ते बंद केलेत.
 
प्रश्न - जगात सध्या सप्रेस आणि लिफ्ट पॅटर्नची चर्चा सुरू आहे, तसं तुम्ही काही करणार आहात का?
 
उत्तर - जिल्हाबंदी आणि लोकांचं फिरणं याला मर्यादा या राहिल्याच पाहिजेत. बाहेरची मंडळी जिल्ह्यात आली तर ते कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यामुळे फक्त कामापुरतंच त्यांना येऊ देण्याच्या मनस्थितीत आम्ही आहोत. हळूहळू हे करता येईल. पण परत कुठे रुग्ण सापडला तर तो प्रश्न सोडवता येणार नाही. लॉकडाऊन उठवण्याची एक पद्धत आहे. तो एकदम शिथिल करता येणार नाही, त्याचे काही टप्पे आहेत. त्यावर जगात अभ्यास झाला आहे. त्यानुसारच लॉकडाऊन काढता येऊ शकतो.
 
पण संपूर्ण 49 दिवस लॉकडाऊन केलं तर लढाई संपू शकते असं माझं मत आहे. मी काही तसं करा किवा करू नका असं म्हणणार नाही. तो सर्वांचा निर्णय होईल. पण कोरोनाचा कुठलाही पेशंट राज्यात नाही अशी स्थिती निर्माण करण्यासाठी काळी काळ वाट पाहावी लागेल.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी