Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झारखंड : चेटकीण समजून 7 वर्षांत 231 जणांची हत्या, तरीही भरतो भुतांचा मेळावा

Witchcraft
, शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (12:15 IST)
झारखंडच्या पलामू जिल्ह्यात टळटळीत दुपार आहे. एके ठिकाणी गोवऱ्यांच्या सहाय्याने विस्तव पेटवला आहे. त्यात कोणी तांदुळ टाकतंय तर कोणी नारळ.
 
एका बाजूला काळ्या बकऱ्याला लाल रंगाचं कुंकू लावण्यात येत आहे. कबुतराच्या शरीरात खिळे रुतवले जात आहेत, तर एका महिलेच्या शरीराला धागा बांधला जात आहे.
 
एका ठिकाणी एक पंडित एका कोंबड्याला मंत्रपठण करून भात भरवत आहे. तिथे आसपास बसलेल्या महिला आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत आहेत.
 
यांना असं वाटतं आहे की यांच्या शरीरात भुताने प्रवेश केला आहे. हे सगळे लोक इथे उपचार करायला आले आहेत. कारण इथे भूतांचा मेळावा भरला आहे.
 
हा मेळावा झारखंड राज्यात भरतो. चेटकीण समजून या राज्यात गेल्या सात वर्षांत 231 लोकांची हत्या झाली आहे आणि त्यात बहुतांश महिलांचा समावेश आहे.
 
हा मेळावा कधी आणि कुठे भरतो?
हा मेळावा चैत्र नवरात्राच्या वेळी भरतो. ही परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे.
 
राजधानी रांची पासून 252 किलोमीटर अंतरावर असलेल्या पलामू जिल्ह्यातील हैदरनगरात हजारो लोक रोज येताहेत. काही अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे.
प्रलामूचे विभागाचे आयुक्त जटाशंकर चौधरी यांच्या मते त्यांना पहिल्यांदाच ही माहिती मिळाली आहे.
 
तर रांची इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरो सायकियाट्री अँड अलाईड सायन्सेस (RINPAS) चे संचालक डॉक्टर सुभाष सोरेन यांच्या मते, 21 व्या शतकात अशा प्रकारचे मेळावे आयोजित करणं दुर्दैवी आहे.
 
ये मेळाव्यासमोर एका मांत्रिकासमोर एक महिला बसली होती. ती सतत तिची मान जोरजोरात हलवत होती. तो मांत्रिक तिच्यावर कथित उपचार करत होता. त्यांनी आपलं पूर्ण नाव सांगण्यास नकार दिला. त्यांचं नाव फक्त पांडेय असल्याचं त्यांनी सांगितलं. ते उत्तर प्रदेशातील बनारसहून आले आहेत. त्यांच्या मते या महिलेच्या शरीरात भूत शिरलं आहे, म्हणून ती असं करत आहे.
 
तिच्या शरीरात भूत शिरलं आहे हे कसं कळलं?
 
या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, "भगवती मातेच्या कृपेने कळतं. तीच उभी राहून सांगते की भूत आहे. हे फक्त इथे येऊन कळतं. बाहेर कळत नाही की भूत आहे."
 
'भूत कबुतरात सामावलं'
 
बिहारच्या रोहतासमधून संजय भगत नावाचे एक मांत्रिक तिथे बसले होते. त्यांच्या आजूबाजूला महिला, पुरुष आणि लहान मुलं जमली होती. त्यांनी लाल ओढणी घेतली होती, डोळ्यात काजळ घातलेलं होतं आणि ते सतत नाचत होते.
 
थोड्यावेळाने त्यांच्या एक सहकाऱ्याने त्यांच्या हातात दोन कबुतरं आणून ठेवले. त्यांनी काही मंत्र उच्चारले आणि त्या कबुतराच्या शरीरात तीन चार खिळे टोचले आणि त्या कबुतरला उडवलं. ते भूत कबुतराच्या शरीरात गेलं आणि उडून गेल्याचा दावा त्यांनी केला.
 
मात्र कबुतर फार काळ उडू शकलं नाही. जेमतेम पाच मीटर उडाल्यावर ते कबुतर पडलं. जवळच उभ्या असलेल्या एका व्यक्तीने ते टॉवेलमध्ये गुंडाळले आणि पुढे निघून गेला. त्याच्या खिशात दारुची बाटली होती.
 
संजय सांगतात, "मी हे काम गेल्या 32 वर्षांपासून करतोय. जो भक्त कबुतर घेऊन आला होता त्याच्यावर जादुटोणा केला होता. कबुतराच्या शरीरात खिळे टोचल्याने त्याचं कल्याण झालं. आता तो बरा होईल." अनेक राज्यांतून त्यांच्याकडे लोक येतात. हे सगळं औषधाने बरं होत नाही असा दावा ते करतात.
 
त्याचवेळी सासाराम हून आलेले त्यांचे सहयोगी मंटू चंद्रवंशी सांगतात, "ज्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे असेच लोक त्यांच्याकडे बहुसंख्येने येतात. ते उपचार करून थकलेले असतात. हे शास्त्र पुरातन काळापासून आहे. विज्ञानात हे सगळं अमान्य आहे. विज्ञानाचा आधार घ्यायचा झाला तर हे सगळं खोटं आहे. मात्र वेदांमध्येही भूत प्रेत दाखवलं आहे."
तुम्ही वेद वाचलेत का या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली. "ते ठीक आहे पुढे विचारा," असं ते म्हणाले. मग मंटू प्रश्न विचारतात, "जर विज्ञानात भूत प्रेत असं काही नसतं तर सरकार यावर बंदी का आणत नाही?"
 
मंटू यांच्याशिवाय संजय यांचे अन्य सहकारी तिथे होते. भूत-पिशाच्च पळवण्यापासून ते अन्य रोगांवर उपचार करण्याचे ते 10-15 हजार रुपये घेतात.
 
त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाकडून कमी पैसे घेतले म्हणून संजय त्यांच्या सहकाऱ्यांवर चिडलेही. पैशाचा सगळा हिशोब मंदिराबाहेर केला जात होता. मात्र जेव्हा उपचाराचा दर विचारला तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की जितके पैसे भक्त देतील तितकेच आम्ही घेतो. तोच आमचा दर आहे.
 
मंदिराच्या परिसरात एक मजारही होती. तिथे उपचार करणारे आशिक अली सांगतात की मजारवर भूत पळवण्यासाठी सगळ्या धर्माचे लोक येतात. फातिया वाचला की भूत पळून जातो.
 
इतकी अंधश्रद्धा का आहे?
उत्तर प्रदेशातील सोनभ्रद भागातल्या दुधी गावातून आलेले रोशन कुमार सांगतात, "मी अभ्यासात बरा होतो. अचानक डोकंच फिरलं. मी वेड्यासारखा वागायला लागलो. कारण माझ्या काकूने माझ्यावर भूत सोडलं होतं."
 
रोशन त्यांच्याच गावातली मांत्रिक मंगरी देवी यांच्याबरोबर तिथे आले आहेत. मंगरी देवी यांनी त्यांच्यावर उपचार केले आहेत. बारीक अंगकाठी असलेल्या रोशन यांनी बीए ची पदवी मिळवली आहे.
 
डेहरी ऑन सोन हून आलेल्या राजकुमारी देवी सांगतात, "यांच्यावर सरकारने बंदी आणली ते ठीक आहे. पण मग सरकार आमच्यावर उपचार करणार का? आमच्यासारख्या लोकांचा शोध घेण्यासाठी घराघरात जाणार का? आम्ही लोक मरतोय इथे, सरकार येतंय का पहायला? आम्ही रुग्णालयात जातो तिथेही काही उपचार होत नाही. मग आम्ही मांत्रिकाकडे येतो."
 
या लोकांमध्ये अंधश्रद्धा इतकी ठासून भरली आहे की राजकुमारी सांगतात की त्यांनी भूत पाहिलं आहे. बिहारच्या सासाराम येथील चंद्रमा विश्वकर्मा त्यांचा अनुभव सांगतात.
 
ते म्हणतात, "माझ्या हाताला एक दिवस अचानक विजेचा झटका लागल्यासारखं वाटलं. हात सुन्न झाला आणि एकदम जड झाला. सात वर्षं उपचार केले. मात्र तो बरा झाला नाही. माझ्या एका मामीने मंत्रपठण केलं आणि मी ठीक झालो.त्यामुळे सगळे आजार औषधानेच बरे होतात हे मी कसं मानू? मला तर वाटतं की भूत असतं."
 
झारखंड मध्ये गेल्या 32 वर्षांपासून सटवाईच्या हत्येविरोधात काम करणाऱ्या आशा या संस्थेचे प्रमुख अजय जयस्वाल यांचा मात्र वेगळा अनुभव आहे.
 
ते सांगतात, "जेव्हा मांत्रिकांकडे लोक जातात तेव्हा त्यांच्यावर लगेच उपचार केले जात नाही. त्यांना दहा दिवसांनंतरची वेळ देण्यात येते."
 
या दहा दिवसात त्या मांत्रिकाचे सहकारी रुग्णाच्या गावात जातात. कोणाला चेटकीण म्हणायचं आहे याची शहनिशा करून येतात. त्यांच्या घरी काय परिस्थिती आहे ही सगळी माहिती घेऊन येतात.
 
ते म्हणतात की, जेव्हा रोगी दहा दिवसांनंतर मांत्रिकाकडे जातो तेव्हा तो मांत्रिक काही न विचारता सगळी माहिती देतो. तेव्हा रोग्याला आश्चर्य वाटतं आणि त्याचा मांत्रिकावरचा विश्वास आणखी दृढ होतो.
 
हा मेळावा का बंद होत नाही?
पलामू चे जिल्हाधिकारी जटाशंकर चौधरी बीबीसीशी बोलताना म्हणतात, "मी अजून हा मेळावा पाहिलेला नाही, फक्त ऐकलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे सुरू असल्याची माहिती आहे. ही एक अंधश्रद्धा आहे. प्रशासनाला याविरोधात एखादं अभियान हाती घ्यावं लागेल. झारखंडबरोबरच शेजारी राज्यातही हा उपक्रम घ्यावा लागेल."
 
"प्रशासकीय पातळीवरून सुरक्षेच्या मुद्द्यावरून मला असं वाटतं की प्रशासनाच्या देखरेखीखाली असे मेळावे होत नाही. तिथे येणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तिथे तैनात आहेत."
 
"लोक जरा शिकले सवरले की तिथे येण्याचं प्रमाण आपोआप कमी होईल," ते पुढे म्हणतात.
 
मेळावा व्यवस्थापन समितीचे सचिव रामाश्रय सलिंह सांगतात की, या भूत मेळाव्यात झारखंडशिवाय बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या राज्यांतूनही लोक येतात.
 
ते म्हणतात, "औषधांशिवाय प्रार्थनासुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. एखादा आजार औषधोपचाराने ठीक होत नसेल आणि इथे आल्यावर तो बरा होत असेल तर काय अडचण आहे?
स्थानिक पत्रकार जितेंद्र रावत त्याची दुसरी बाजू सांगतात. त्यांच्या मते प्रशासकीय किंवा सामाजिक पातळीवर हा मेळावा बंद करण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. प्रयत्न झालेही असतील तरी याविरोधात लोकांनी नक्कीच बंड पुकारलं असेल. कारण मांत्रिकांना, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि या मेळाव्याच्या आयोजन समितीच्या लोकांना घसघसशीत मानधन आणि भेटवस्तू मिळतात.
 
झारखंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2015 चे 2022 मध्ये डायन बिसाही म्हणजेच चेटकिणीाला मारण्याच्या प्रयत्नात 231 लोकांची हत्या झाली आहे. त्यात बहुतांश महिलांचा समावेश आहे. 2015 ते 2020 या काळात 4560 गुन्हे दाखल झाले आहेत.
 
तर अजय कुमार जयस्वाल यांच्या मते, गेल्या 26 वर्षांत 1800 महिलांची हत्या झाली आहे. तरीही राज्य सरकार अशा प्रकारच्या मेळाव्यांवर बंदी घालण्यात असमर्थ ठरलं आहे.
 
 
ते म्हणतात, "आशा संस्थेतर्फे 2018 मध्ये आठ जिल्ह्यात 332 गावांचं आम्ही सर्वेक्षण केलं. त्यात असं लक्षात आलं की 258 महिलांना चेटकीण घोषित केलं आहे. याचदरम्यान आम्ही 103 अशा व्यक्तींना भेटलो जे स्वत:ला मांत्रिक म्हणवून घेत होते."
 
याच संस्थेच्या प्रमुख छुटनी देवी यांना चेटकीण हत्येविरोधात कार्य केल्याबद्दल 2020 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
 
हे लोक मानसिक रुग्ण तर नाही?
झारखंडमध्ये मानसिक रोगांवर उपचार करणारे दोन रुग्णालयं आहे. एक RINPAS आणि दुसरं म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकीअट्री. (CIP)
 
RINPAS च्या संचालकांशी आम्ही फोनवरून बातचीत केली. ते म्हणाले, "असं काही होत असेल तर सरकारने तिथे एक समिती पाठवायला हवी. हे सगळं खरंच मानसिक आरोग्याशी निगडीत आहे की अंधश्रद्धा आहे याचा अभ्यास व्हायला हवा."
 
त्यांच्या मते, "कोव्हिडच्या आधी आमच्याकडे 350-400 लोक उपचाराला यायचे. लॉकडाऊन संपताच रुग्णांची संख्या खूप वाढली आहे. त्यात झारखंडशिवाय बिहार, पश्चिम बंगाल या राज्यातूनही रुग्ण येतात."
 
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मारीवाला हेल्थ इनिशिएटिव्ह चे मॅनेजर भावेश झा यांच्या मते, "भारत सरकारनं 2020-21 मध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात फक्त 40 कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यातले 20 कोटी फक्त खर्च झाले आहेत. त्यावरून सरकारचे प्राधान्यक्रम काय आहेत हे लक्षात येतं. WHO च्या मार्गदर्शक तत्त्वानुसार समाजाच्या आधारावर मानसिक आरोग्याच्या योजना आखायला हव्यात."
 
ते म्हणतात, "ग्रामीण भागात इतर सुविधा नाहीत.त्यामुळेही लोक मांत्रिकांकडे जातात."
 
आता रात्रीचे आठ वाजलेत. शेतात उभारलेल्या तंबूंमध्ये बरीच गर्दी जमा झाली आहे. प्रत्येक मांत्रिकाचा एक वेगळा तंबू आहे. ज्यांनी उपचार घेतलेत त्यांनी विटांची चूल मांडली आणि स्वयंपाक करत आहेत. काही लोक उघड्यावर झोपलेत. ते उद्या सकाळी आपल्या घरी जातील आणि मांत्रिक नवे रुग्ण शोधतील.
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Boxing:लोव्हलिना बोर्गोहेन जागतिक स्पर्धेपूर्वी इस्तंबूलमध्ये महिला संघाचे नेतृत्व करणार