भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आहेत.
आज दिल्लीमधील भाजप मुख्यालयात गृहमंत्री अमित शाह यांनी जे. पी. नड्डा यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली.
जेपी नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. मात्र नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर जेपी नड्डांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, तर त्यांच्यावर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
कोण आहेत जे.पी. नड्डा?
मूळचे हिमाचल प्रदेशमधल्या बिलासपूर इथल्या जगत प्रकाश नड्डा उर्फ जेपी नड्डा यांनी पाटण्यातून LLB ची पदवी घेतली आहे.
महाविद्यालयापासूनच भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) कार्य करणारे नड्डा 1993 साली हिमाचल प्रदेशमधून आमदार झाले. त्यांनी राज्यात आणि केंद्रात मंत्रिपद भूषवलं आहे. 1994 ते 1998 पासून ते हिमाचल प्रदेश विधानसभेत पक्षाचे नेते म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.
2007मध्ये ते हिमाचल प्रदेशात प्रेम कुमार धुमल सरकारमध्ये वन-प्रर्यावरण, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते. त्यानंतर भाजपनं 2012 मध्ये नड्डा यांना राज्यसभेवर खासदार म्हणून पाठवलं होतं. 2014 मध्ये त्यांनी मोदी सरकारमध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून काम केलं आहे.
मोदी यांची महत्त्वाकांक्षी 'आयुष्मान भारत' योजना यशस्वीरित्या राबविण्यामागे जेपी नड्डा यांनी मेहनत घेतली होती.
पूर्णवेळ अध्यक्ष होण्यास उशीर?
58 वर्षांचे नड्डा हे मोदी-शाह तसंच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मर्जीतले असल्याचं मानलं जातं. नड्डा स्वत:ला 'लो प्रोफाइल' ठेवतात, असंही म्हटलं जातं.
2014च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजपच्या दिल्लीतल्या मुख्य कार्यालयातून देशभरातल्या प्रचारावर लक्ष ठेवलं होतं. तसंच 2019 मध्ये त्यांच्यावर उत्तर प्रदेशमधल्या लोकसभा प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली होती. उत्तर प्रदेशात सप-बसप यांच्या आघाडीनंतरही भाजपनं 62 जागा जिंकल्या.
"राजनाथ सिंह यांच्यानंतर अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते. तेव्हाही जेपी नड्डा यांचं नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होतं. निवडणूक प्रचाराच्या मॅनेजमेंटमध्ये अमित शाह यांच्याएवढेच जेपी नड्डा हे तरबेज आहेत. त्यांचं संघटन कौशल्य मजबूत आहे. तसंच ते मोदी-शाह यांच्या अगदी जवळचे नेते आहेत," असं भारतीय निवडणुकांचे अभ्यासक डॉ. राहुल वर्मा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. ते Centre For Policy Research (CPR) इथं फेलो आहेत.
भाजपमध्ये महत्त्वाच्या पदावर काम करण्यासाठी RSSची पार्श्वभूमी किंवा RSSसोबत चांगले संबंध असणं अत्यंत गरजेचं असतं, असंही वर्मा यांनी सांगितलं.
मात्र, 17 जूनला झालेल्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत नड्डा यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. गृहमंत्रिपदी असूनही अमित शाह हे भाजपचे अध्यक्ष म्हणून कायम राहिले.
त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षेप्रमाणे निकाल मिळाले नाही. महाराष्ट्र आणि झारखंड ही राज्यं हातून गेली तर हरियाणात भाजपने जेमतेम सरकार स्थापन करण्यात यश मिळवलं.
तसंच फेब्रुवारीत महत्त्वाच्या अशा दिल्ली विधानसभेच्या निवडणुका असल्याने नड्डा यांच्याकडे सूत्र सोपवण्यात उशीर होतोय, असं चर्चा राजकीय वर्तुळात होती.