दिल्लीतल्या 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद हे दारू आणि झोपेच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे बेशुद्ध पडले. परिणामी त्यांना दिल्लीतल्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.
कांता प्रसाद यांचं वय 80 वर्षे आहे. दिल्लीतल्या मालवीय नगरमध्ये 'बाबा का ढाबा' नावाचं खाद्यपदार्थाचं छोटसं दुकान चालवणारे कांता प्रसाद गेल्यावर्षी त्यांच्या एका व्हीडिओमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले होते. त्यांची हालाखीची स्थिती पाहून देशभरातून आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला होता.
नंतर कांता प्रसाद यांच्याच काही आरोपांमुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आणि नुकतेच त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले, त्यांची माफीही मागितली होती.
आता त्यांनी दारूचं अतिसेवन केल्यानं आणि प्रमाणापेक्षा जास्त झोपेच्या गोळ्या खाल्ल्यानं बेशुद्धावस्थेत आहेत.
कांता प्रसाद यांच्या मुलाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तशी माहिती दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी एएनआय वृत्तसेवा संस्थेला माहिती दिली.
कांता प्रसाद का चर्चेत आले होते?
दिल्लीतल्या मालवीयनगरमध्ये असलेल्या 'बाबा का ढाबा'चा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्या व्यथा ऐकून, पाहून बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात मदत केली.
मधल्या काळात या मदतीवरून काही वादही झाला होता. मात्र, आता 80 वर्षीय कांता प्रसाद यांनी मालवीयनगरमध्येच रेस्टॉरंट सुरू केला आहे.
या नवीन रेस्टरंटबद्दल बोलताना कांता प्रसाद म्हणतात, "आम्ही आता खूप आनंदी आहे. देवानं आमच्यावर कृपा केली. ज्यांनी आम्हाला मदत केली, त्यांचे आभार. आमच्या रेस्टॉरंटला भेट देण्याचं आवाहन करतो. आम्ही भारतीय आणि चायनिज पदार्थ बनवतो."
कसा प्रसिद्ध झाला होता 'बाबा का ढाबा?'
दिल्लीतल्या मालवीयनगरमध्ये असलेल्या 'बाबा का ढाबा' चा व्हीडिओ यूट्युबर गौरव वासन यांनी शूट करून 7 ऑक्टोबरला सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
लॉकडाऊनमुळे ढाब्याच्या मालकावर ओढावलेली परिस्थिती दाखवून त्यांनी लोकांना इथं येऊन खाण्याचं आणि प्रसाद दाम्पत्याला मदत करण्याचं आवाहन केलं होतं.
पण सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी इथं खाण्यासाठी रांगा लावल्या. अनेक सेलिब्रिटींनीही हा व्हीडिओ शेअर केला होता.
प्रसिद्धी मिळवून देणाऱ्याविरोधात पैशांच्या अफरातफरीची तक्रार
कांता प्रसाद यांनी यू-ट्युबर वासन याच्यावर फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अजून कोणतीही एफआयआर दाखल झालेली नाही.
गौरव वासन यांनीच सर्वांत पहिल्यांदा 'बाबा का ढाबा' चा व्हीडिओ शूट केला होता. हा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी इथं खाण्यासाठी गर्दी केली. कांता प्रसाद यांना मदत म्हणून अनेकांनी डोनेशनही दिलं होतं.
कांता प्रसाद यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं की, "वासन यांनी त्यांचा व्हीडिओ शूट करून ऑनलाइन पोस्ट केला आणि लोकांना पैसे डोनेट करायला सांगितलं. वासन यांनी जाणीवपूर्वक त्यांचे स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे बँक डिटेल्स लोकांना दिले आणि त्यातून मोठी रक्कम जमा केली."
वासन यांनी आर्थिक देवाणघेवाणीची माहितीही आपल्याला दिली नसल्याचा आरोपही ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांनी केला.
द इंडियन एक्प्रेसशी बोलताना कांता प्रसाद यांनी म्हटलं की, "वासन यांच्याकडून आपल्याला केवळ 2 लाख रुपये मिळाले आहेत."
"सध्या आमच्याकडे फार लोक जेवायला येत नाहीत. जे येतात ते सेल्फी काढायला येतात. आधी माझी रोजची कमाई 10 हजार रुपये होती. आता मला केवळ तीन ते पाच हजार रुपये मिळतात."
काय आहे वासन यांची बाजू?
द इंडियन एक्सप्रेसनं गौरव वासन यांच्याशी संवाद साधला होता. त्यांनी सांगितलं की, "मी आलेले सर्व पैसे हे प्रसाद यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले आहेत."
आपल्यावरील सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
त्यांनी म्हटलं, "मी जेव्हा हा व्हीडिओ शूट केला होता, तेव्हा तो इतका व्हायरल होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. लोकांनी बाबांना त्रास देऊ नये अशी माझी इच्छा होती आणि म्हणूनच मी माझे बँक डिटेल्स दिले होते."
काही यूट्युबर्सनं आरोप केला आहे की, "वासन यांना डोनेशनच्या रुपात 20 ते 25 लाख रुपये मिळाले आहेत." वासन यांनी हा आरोपही फेटाळला आहे.