काश्मीर कलम 370: राहुल गांधी म्हणतात; "मला तुमचं विमान नको, पण काश्मिरात येऊन लोकांशी बोलू द्या'

मंगळवार, 13 ऑगस्ट 2019 (17:25 IST)
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक याचं निमंत्रण स्वीकारलंय. तुमच्या विमानाची गरज नाही, मात्र जम्मू-काश्मीरमध्ये मला मुक्तपणे फिरण्याचं आणि लोकांना भेटण्याचं आश्वासन द्या, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
 
"प्रिय राज्यपाल मलिक, विरोधी पक्षनेत्यांचं शिष्टमंडळासह मी स्वत: तुमचं निमंत्रण स्वीकारून जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये येण्यास तयार आहे. आम्हाला तुमच्या विमानाची गरज नाही. मात्र, जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही मुक्तपणे फिरू शकतो आणि स्थानिक नागरिक, राजकीय नेते आणि जवानांशी संवाद साधू शकतो, याची खात्री द्या." असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलंय.
 
या सर्व प्रकरणाची सुरूवात राहुल गांधी यांच्याच ट्वीटपासून झाली.
 
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं की, "जम्मू-काश्मीर अशांत असल्याचे वृत्त समोर येतायत. सरकारने तिथे माध्यम आणि एकूणच संवादावर बंदी आणलीय. मी सरकारला विनंती करतो की, त्यांनी जम्मू-काश्मीरच्या लोकांना सुरक्षेची हमी द्यावी आणि जी गुप्तता पाळली जातेय, त्यावरील पडदा हटवावा"
राहुल गांधींच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटलं, "राहुल गांधी यांना मी जम्मू-काश्मीरमध्ये येण्याचं निमंत्रण देतो. मी तुमच्यासाठी विमानही पाठवेन, तुम्ही या आणि इथली परिस्थिती पाहून बोला. तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तीने असं वक्तव्य करायला नको होतं."
 
सत्यपाल मलिक म्हणाले होते, "कलम 370 आणि कलम 35ए हटवण्यात आलं आहे. याला धार्मिक रंग नाही. लेह, कारगिल, राजौरी, जम्मू, पुंछ कोठेही जातीय तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत. काश्मीर खोऱ्यात कोठेही जातीय तणावाच्या घटना घडलेल्या नाहीत."

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या कोचपदी?