Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेस्टर: हिंदू-मुस्लीम सलोखा गमावून हिंसेच्या जखमा अंगावर वागवणारं ब्रिटनचं शहर

britain
, सोमवार, 1 जुलै 2024 (16:01 IST)
भारतीय वंशाचे कीथ वाझ लेस्टरच्या रस्त्यांवर घरोघरी प्रचार करत आहेत. त्यांना पाहिल्यावर वाटतं की हे तेच ठिकाण आहे का, जिथं सप्टेंबर 2022 मध्ये हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये हिंसाचार झाला होता.
 
कीथ वाझ यांचं लेस्टरमधील स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि महत्त्वाचं आहे. कारण पूर्व लेस्टर मतदारसंघातून ते लेबर पार्टीच्या तिकिटावर 32 वर्षांपासून खासदार म्हणून निवडून येत आहेत. ब्रिटनमधील यावेळच्या निवडणुकीत कीथ वाझ 'वन लेस्टर' या एका नवीन पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत.
 
इतका प्रदीर्घ काळ लेस्टरचं प्रतिनिधित्व केलेलं असल्यामुळं कीथ वाझ हे लेस्टरमधील ख्यातनाम व्यक्ती आहेत. ते जेव्हा लोकांना भेटतात तेव्हा त्यांच्या स्थानिक मुद्द्यांवर बोलतात.
 
अर्थात स्थानिक मुद्द्यांवर बोललं जात असताना लेस्टरमध्ये झालेल्या हिंसेवर मात्र चर्चा होत नाही. वेगवेगळ्या संस्कृती एकत्र नांदण्याचं उदाहरण असणाऱ्या लेस्टरमध्ये हिंसेचा आगडोंब उसळला होता. तो तणावपूर्व काळ आता सर्वांनाच विसरायचा आहे.
 
हिंदू-मुस्लीम समुदायातील हिंसक संघर्ष
17 सप्टेंबर 2022 ला दोन्ही समुदायातील तणावाचं रुपांतर रस्त्यावरील हिंसाचार झाला होता.
 
हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये झालेल्या चकमकींत काही पोलिस कर्मचारीसुद्धा जखमी झाले होते. डझनावारी लोकांना अटक करण्यात आली होती.
 
काही स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की, असा तणाव बहुतांश वेळा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याच्या वेळेस पाहायला मिळायचा. मात्र 2022 मध्ये परिस्थिती इतकी चिघळली की दोन्ही समुदायांमध्ये निर्माण झालेली दरी स्पष्टपणे दिसू लागली.
धर्मेश लखानी हे मूळचे गुजरातचे आहेत. ते लेस्टरमधील बेलग्रेव रोडवर एक रेस्टॉरंट चालवतात. याच बेलग्रेव रोडच्या परिसरात हिंसाचार झाला होता.
 
त्या दिवशाच्या आठवणी त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत.
बेलग्रेव रोडवर जिथे हिंसाचार झाला ती जागा दाखवत ते म्हणतात, त्या दिवशी इथे शेकडो लोकांची गर्दी जमा झाली होती. जमाव प्रचंड चिडलेला होता. मी इथं उभा राहून पाहत होतो की हे काय घडतं आहे. आमचं शहर जळत असल्यासारखं वाटत होतं.
 
धर्मेश लखानी बेलग्रेव रोडवरील एक कार वॉश दाखवतात. ते सांगतात, "या कार वॉशभोवती पोलिसांनी कडं तयार केलं होतं. पोलिसांच्या कड्याच्या आतील बाजूस जवळपास 150 ते 200 हिंदू लोक होते. पोलिसांच्या संरक्षक कड्याच्या बाहेरच्या बाजूस मुस्लिमांचा मोठा जमाव होता."
 
कार वॉशच्या अगदी समोर एक हिंदू मंदिर आहे.
धर्मेश लखानी सांगतात की जमावातील काही लोकांनी मंदिरावर चढून मंदिरावरील एका झेंड्याला खाली काढून जाळण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात, "झेंडा थोडासाच जळाला होता. तेवढ्यात एक मुस्लीम तरुण पुढे सरसावला आणि त्याने ती आग विझवली. त्याला वाटलं की झेंडा जाळणं योग्य नाही. जे लोक हे सर्व करत होते त्यांना हिंसाचाराची आग वाढवायची होती. मात्र त्या जमावातील सर्व लोक असे नव्हते. जे काही झालं ते काही चांगलं नव्हतं. दोन्ही समुदायांना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं."
 
त्यावेळेस प्रसिद्ध झालेल्या बीबीसीच्या एका वृत्तानुसार या हिंसाचारात चर्च, मशीद आणि मंदिरांना टार्गेट करण्यात आलं होतं.
 
निवडणुकीचे वारे
ब्रिटनमध्ये चार जुलैला सर्वसाधारण निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. पूर्व लेस्टर मतदारसंघातून एकूण 10 उमेदवार मैदानात उतरले आहेत.
 
त्यातील आठ उमेदवार दक्षिण आशियाई वंशाचे आहेत. लेस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात वसलेल्या दक्षिण आशियाई लोकांच्या मतांच्या जोरावर आपण या मतदारसंघातून निवडून येऊ अशी आशा या उमेदवारांना वाटते आहे.
 
मात्र दक्षिण आशियाई देशांमध्ये आणि विशेषत: भारतात निवडणुकांकडे ज्या पद्धतीनं पाहिलं जातं, निवडणुकांच्या काळात इथं ज्या प्रकारचं वातावरण असतं, त्यापेक्षा लेस्टर खूप वेगळं आहे.
इथे तुम्हाला क्वचितच सार्वजनिक ठिकाणी काही उमेदवारांचे पोस्टर किंवा बॅनर लागलेले दिसतील.
 
बहुतांश प्रचार शनिवारी आणि रविवारी केला जातो. कारण नोकरदार लोक या दिवशी घरी असतात. प्रचार करण्यासाठी उमेदवार लोकांच्या घरी आणि दुकानांमध्ये जातात.
 
पूर्व लेस्टर मतदारसंघावर अनेकांचं लक्ष लागलं आहे. कारण 2022 च्या हिंसाचारानंतर इथलं वातावरण बदललं आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत दक्षिण आशियाई लोक कोणत्या पक्षावर किंवा कोणत्या उमेदवारावर विश्वास दाखवतात हे पाहण्यासारखं असेल.
 
'विविधतेतील एकतेचं उदाहरण'
1951 च्या जणगणनेनुसार लेस्टरमध्ये फक्त 624 जण दक्षिण आशियाई वारसा असणारे होते. मात्र आता 70 वर्षानंतर लेस्टर ब्रिटनमधील अशा शहरांपैकी आहे जिथे ब्रिटिश दक्षिण आशियाई लोकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
 
1950 च्या दशकापासून लेस्टरमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी लोक चेन मायग्रेशन किंवा साखळी स्थलांतराच्या पद्धतीनं आले. म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील किंवा गावातील लोक इथे होते म्हणूनच तेसुद्धा इथे आले. त्यांच्यासाठी लेस्टर एक चांगलं ठिकाण होतं. इथे समृद्धी होती. इथे डनलप, इंपीरियल टाइपरायटर आणि मोठ्या होजियरी (कापड) मिल मध्ये नोकऱ्या होत्या.
 
नव्यानं आलेले लोक सुरुवातीच्या काळात उत्तर आणि पूर्व लेस्टरच्या बेलग्रेव रोड आणि स्पिनी हिल पार्क या भागात स्थायिक झाले. याच भागात हा अलीकडचा हिंसाचार झाला होता. येणाऱ्या लोकांमध्ये हिंदू, मुस्लिम आणि शिख समुदायाचे लोक होते. त्यांनी भारताच्या फाळणीच्या वेळेस झालेली हिंसा पाहिली होती.
 
1960 च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये लेस्टरमध्ये आलेल्या लोकांची कुटुंब देखील इथं स्थलांतरित होऊ लागली.
लेस्टर शहरात वास्तव्यास असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांमुळे आणि इथल्या सामाजिक वातावरणामुळे अनेक दशकांपासून लेस्टरला सांस्कृतिक विविधता, सलोखा आणि समुदायामधील एकीचं उदाहरण मानलं जातं.
 
पूर्व लेस्टरचे माजी खासदार कीथ वाझ म्हणतात, "ज्यांना लेस्टरबद्दल माहिती आहे त्यांना इथल्या हिंसाचाराची बातमी कळाल्यावर धक्काच बसला. लेस्टर शहरात वेगवेगळ्या धर्मांचे आणि वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक राहतात. इथे जेव्हा हिंसाचार झाला तेव्हा तो माझ्यासाठी सुद्धा एक धक्का होता. आम्ही याआधी इथे असं काहीही अनुभवलं नव्हतं."
 
कीथ वाझ यांच्यानुसार 2022 मध्ये झालेल्या हिंसेमागे अनेक कारणं होती. या कारणांमध्ये कोरोनातील लॉकडाऊन, इथली आर्थिक परिस्थिती आणि बेरोजगारी यांचा समावेश आहे. ते म्हणतात, "ही एक ठिणगी होती. मला वाटतं की यासारखी घटना फक्त एकदाच घडते. इथे हिंसाचार का झाला या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे."
 
बेलग्रेव रोडचं वातावरण
बेलग्रेव रोडवर आल्यावर असं वाटतं की तुम्ही भारतातच आहात. इथले रेस्टॉरंट असोत की कापडाची आणि दागिन्यांची दुकानं असोत...बहुतांश दुकानं भारतीय वंशाचे लोकच चालवतात.
 
या परिसरात 2022 मध्ये दोन समुदायांमध्ये हिंसक चकमकी झाल्या होत्या.
 
इथल्या व्यापाऱ्यांना आजसुद्धा त्या तणाव आणि हिंसाचारामुळे झालेले परिणाम जाणवतात.
 
भारतीय वंशाचे इमरान पठाण इथं एक वेडिंग गारमेंट्स म्हणजे विवाहासाठी लागणाऱ्या कपड्यांचं दुकान चालवतात.
ते म्हणतात, "त्या घटनेनंतर इथल्या व्यापारावर थोडासा परिणाम झाला आहे. तो असा की इथे येण्यापूर्वी लोक विचार करतात, चौकशी करतात की आता सर्व ठीक आहे ना. उदाहरणार्थ अलीकडेच भारत आणि पाकिस्तानात टी20 सामना झाला होता. त्यावेळेस लोक दुकानांमध्ये सकाळी लवकरच आले. त्यांनी फोन करून आमची अपॉईंटमेंट घेतली जेणेकरून क्रिकेट सामना सुरू होण्यापूर्वीच त्यांना दुकानातील खरेदी करून निघता येईल. इथे घडलेल्या हिंसाचारामुळे लोकांच्या मनात एक भीती तयार झाली आहे. हिंसाचाराचे इथल्या समाज जीवनावर जे परिणाम झाले आहेत ते दूर होण्यासाठी काही काळ तर लागेलच."
 
बेलग्रेव रोडवरच इमरान यांच्या स्टोअरपासून काही पावलांच्या अंतरावर भारतीय वंशाच्या रंजू मोढा यांचं सुद्धा कपड्यांचं दुकान आहे.
 
त्या म्हणतात, "इथे असं काही होईल असा कधी विचारदेखील केला नव्हता. दोन वर्षांमध्ये व्यापारावर त्याचा परिणाम झाला आहे. इथला व्यापार घटला आहे. शहराबाहेरून आमचे जे दक्षिण आशियाई ग्राहक यायचे, त्यांची संख्या घटली आहे. कारण इथे घडलेल्या सर्व घटना मीडियावर पाहिल्या गेल्या. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. त्याचा व्यापारावर बराच परिणाम झाला आहे."
 
समुदायांची भौगोलिक विभागणी
लेस्टरमध्ये मागील अनेक दशकांपासून दक्षिण आशियाई लोक मोठ्या संख्येने राहतात. यामध्ये हिंदू आहेत तसे मुस्लीम देखील आहेत.
 
मात्र मागील काही वर्षात इथली परिस्थिती अशी झाली आहे की लेस्टरच्या काही भागात हिंदू बहुसंख्य झाले आहेत तर काही भागांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त आहे.
असाच एक परिसर म्हणजे एविंगटन रोड. इथे एक खूप मोठी मशीद आहे.
 
स्थानिक लोक सांगतात की बेलग्रेव रोडच्या परिसरात बहुतांश हिंदू लोक राहतात आणि व्यापार करतात. तर हायफील्ड्स आणि एविंगटन रोडसारख्या भागात बहुतांश मुस्लीम राहतात.
 
काही लोकांना वाटतं की दोन्ही समुदायांमध्ये असलेल्या तणावामुळे अनेकवेळा दोन्ही समुदायाचे लोक एकमेकांची बहुसंख्या असलेल्या भागात जाण्यास कचरतात.
 
'हिंदू विरुद्ध मुस्लीम'
2022 मध्ये लेस्टरमध्ये घडलेल्या घटनांसाठी दोन्ही समुदाय एकमेकांना जबाबदार ठरवतात.
 
लेस्टरमध्ये राहणारे मोहम्मद ओवेस यूके इंडियन मुस्लिम कौन्सिलचे संचालक आहेत.
ते म्हणतात, "मुस्लीम समुदायाला सातत्यानं धोका जाणवतो आहे. ते सतत तणावात असतात. आम्हाला वाटतं की एका जागतिक हिंदुत्व चळवळीच्या माध्यमातून मुस्लीम लोकसंख्येला नाराज करणं हा यामागचा हेतू आहे."
 
मोहम्मद ओवेस यांच्यानुसार दंगलीच्या आधी लेस्टरमध्ये शांतता होती, समाजात सलोखा होता. लोकं मिळून मिसळून राहत होते. ते म्हणतात, "आमची इच्छा आहे की तेच वातावरण पुन्हा निर्माण व्हावं. लेस्टरमधील बहुतांश हिंदूंना शांतता हवी आहे. हिंदू मुस्लीम, शीख आणि धार्मिक नसणाऱ्या लोकांशी सलोख्यानं वागतात. सगळ्यांशी मिळून मिसळून राहतात. मात्र त्यांचा आवाज तितका बुलंद नाही, खूपच क्षीण आहे."
 
'लोक विसरलेले नाहीत'
कीथ वाझ म्हणतात की, "हिंसाचारामुळे जे नुकसान झालं ते लोकांनी पाहिलं. आता त्यांच्या लक्षात आलं आहे की एकमेकांशी मिळून मिसळून, सलोख्यानं आणि एकजुटीनं राहिलं तरच त्यांची प्रगती होऊ शकते."
 
त्यांना वाटतं की लेस्टरमधील बहुतांश लोक 2022 च्या वाईट घटना विसरुन आपल्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस मार्गस्थ झाले आहेत.
 
दुसऱ्या बाजूस अनेक लोकांना वाटतं की जे घडलं आहे, ते समजून घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. महागाई, रोजगार आणि मुलांसाठी चांगलं शिक्षण या गोष्टींची जुळवाजुळव करताना लोकांना संघर्ष करावा लागतो आहे, यामुळे लोक निराश होत आहेत.
भारतीय वंशाच्या रीटा पटेल या लेस्टर सिटी कौन्सिलमध्ये माजी सहाय्यक मेयर होत्या. त्या म्हणतात, "लोक त्या घटनांना विसरलेले नाहीत. त्या घटनांमुळे समुदायांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. आता सर्वत्र शांतता दिसते आहे, म्हणून समस्या संपली आहे असं मानणं चुकीचं ठरेल. यातून आपल्याला धडा घ्यावा लागेल. जर आपण यातून योग्य तो धडा घेतला नाही तर पुन्हा पुन्हा त्या चुका होण्याचा धोका कायम राहील."
रीटा पटेल म्हणतात, "मला वाटतं की तुम्ही जर लोकांशी बोललात तर तुमच्या लक्षात येईल की त्या घटनांचा लोकांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम झाला आहे...लोकांना अधिक असुरक्षित, अस्थिर वाटतं आहे. मला वाटतं की एका घटनेमुळे कोणतंही शहर निर्माण किंवा नष्ट होत नाही. हा एक धक्का असू शकतो. त्याचबरोबर मला वाटतं की लेस्टरमधील लोकांनी नेहमीच अडचणींना तोंड देत त्यातून मार्ग काढला आहे."
 
न्यायाची प्रतीक्षा
लेस्टरमध्ये झालेल्या हिंसाचारामागची कारणं शोधण्यासाठी सध्या दोन तपास सुरू आहेत.
 
यातील एक तपास सरकारकडून केला जातो आहे. तर दुसरा तपास लंडनचं सोआस (SOAS)विद्यापीठ करतं आहे.
 
लेस्टरमध्ये मागील 60 वर्षांपासून वास्तव्यास असलेले भारतीय वंशाचे प्राध्यापक गुरहरपाल सिंह म्हणतात की, "अशांततेच्या खुणा अजूनही आहेत. कारण ज्या कारणांमुळे हा तणाव निर्माण झाला त्यामध्ये अजूनही फारसा बदल झालेला नाही."
 
प्राध्यापक गुरहरपाल सिंह म्हणतात, "शहरात संसाधनांची कमतरता आहे. जिथे वेगवेगळ्या समुदायाचे लोक राहतात तिथे क्षेत्रीय अधिकारांबाबतसुद्धा तणाव आहे."
 
"राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा आणि त्यानंतर होणाऱ्या कार्यक्रमांमुळे तणावाचं वातावरण होतं. दक्षिण आशियात किंवा इथे एखादी महत्त्वपूर्ण घटना घडली तर त्यामुळे हे समुदाय किंवा हिंसाचार घडवण्यात रस असणारे गट संघर्ष करण्यासाठी पुन्हा सरसावू शकतात."
 
आम्ही प्राध्यापक गुरहरपाल सिंह यांना विचारलं की इथे जे काही घडलं आणि ज्या पद्धतीनं त्याची हाताळणी करण्यात आली, ते शासनाचं अपयश आहे का?
 
त्यावर प्राध्यापक गुरहरपाल सिंह यांनी उत्तर दिलं की, "नक्कीच. लेस्टरमध्ये 60 वर्षांपासून वास्तव्यास असणारी व्यक्ती म्हणून मी हे सांगतो की जे काही संकट निर्माण झालं होतं त्याची राष्ट्रीय स्तरावर आणि स्थानिक स्तरावर प्रभावीपणे हाताळणी केली गेली नाही."
वरवर पाहता लेस्टरमधील परिस्थिती निवळलेली आणि पूर्ववत झालेली दिसते. मात्र इथल्या लोकांशी बोलल्यावर लक्षात येतं की 2022 मध्ये झालेल्या हिंसाचारा घटनांच्या वेदनेचं शल्य किंवा जाणीव इथल्या मोठ्या लोकसंख्येच्या मनात आजही ताजी आहे.
 
लेस्टरमधील लोक म्हणतात की 2022 मध्ये जे घडलं त्यामुळे लेस्टरची प्रतिमा डागाळली. आता जर त्या वाईट आठवणींना मागे ठेवून लेस्टरला पुढे जायचं असेल तर त्या हिंसाचारासाठी जबाबदार असणाऱ्या लोकांची ओळख पटवावी लागेल आणि दोषींना शिक्षा मिळवून द्यावी लागेल.
 
लोक म्हणतात की जोपर्यत हे केलं जात नाही तोपर्यंत लेस्टरच्या जखमा ताज्या राहतील.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तरुणाने ताम्हिणी घाटात धबधब्यात उडी मारली, वाहून गेला Video