Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट घेतल्यानंतर कसं बदलतं आयुष्य?

लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट घेतल्यानंतर कसं बदलतं आयुष्य?
आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनसमोर बसलेली रेचल अचानक रडू लागते. 2018च्या वर्षातील कोणता तरी दिवस होता आणि तिचं घर अंधार आणि शांततेत हरवलं होतं. सर्वच खूप वेगळं होतं. 28 वर्षीय रेचल आपल्या नवऱ्यासोबत पूर्वी याच घरात राहायची मात्र ती आता एकटीच आहे.
 
तिथूनच सुमारे 200 मैल अंतरावर तिचा पती 26 वर्षीय रॉब याचं घर आहे. सध्या रॉब सरकारी संकेतस्थळावर घटस्फोटासाठी सल्ला शोधत आहे. रॉब आणि रेचल आता विभक्त झाले आहेत.
 
"ती वाईट मानसिक अवस्थेतून जात होती. तिला एकांत हवा होता. मी त्यावेळीही तिला यासाठी जबाबदार ठरवलं नाही किंवा आताही मला तसं करायचं नाही. मात्र याचा अर्थ असा होत नाही की ती गेली तर मला काहीच फरक पडत नाही," रॉब सांगतो.
 
"मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो होतो. जेव्हा मी घटस्फोटासाठी सल्लामसलत करत होतो, त्यावेळी मी फक्त माझं आयुष्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होतो, सर्वांच्या भल्यासाठी."
 
रॉबला दोन मुलं आहेत. त्यांचा सांभाळ तो एकटाच करतो. आता पुढे जायला हवं, असं तो म्हणतो.
 
सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार 2017 मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये 1 लाख 2 हजारपेक्षाही जास्त घटस्फोट झाले आहेत. यामध्ये बहुतांश व्यक्तिंनी चाळीशीतच घटस्फोट घेतला. मात्र 12 हजार जण असे होते, ज्यांनी रेचल आणि रॉबप्रमाणे वयाच्या 22-25 व्या वर्षीच घटस्फोट घेतला आहे.
 
ज्या व्यक्ती 18-19 किंवा 20-22 वर्षाच्या असताना लग्नगाठ बांधतात त्यांचं लग्न तुटण्याचा धोका जास्त असतो. संशोधनानुसार 1976 मध्ये 20-22 व्या वर्षी लग्न करणाऱ्यांपैकी 50 टक्के महिलांनी घटस्फोट घेतला होता. तिशीतच त्या आपल्या पतीपासून विभक्त झाल्या. रेचलनंसुद्धा याच वयात लग्न केलं होतं.
 
वेदनादायी अनुभव
रेचल सांगते, "हे खूपच वेदनादायी होतं. दोन वर्षांपर्यंत मला असं वाटत होतं, की माझं व्यक्तिमत्व दबलं जातंय. मला माहिती आहे, की हे खूपच नाटकी वाटतंय. पण यापूर्वी मला असं कधीच वाटलं नव्हतं. या नात्यात मला खूप दुःख मिळालं. जे नातं कायमचं असेल असा मी विचार केला होता, तेच अचानक तुटलं होतं."
 
जेव्हा एका लग्नामध्ये भावनांतील उत्कटता कमी होऊ लागते, तेव्हा ते नातं तुटण्याची सुरूवात होऊ लागते. रेचल आणि रॉब दोघंही स्वतःला पीडित संबोधतात.
 
रेचल म्हणाली, "लग्नानंतर दोन वर्षांतच मला कळलं, की माझ्या पतीचं दुसऱ्या एका महिलेसोबत अफेअर सुरू आहे. हे कळल्यानंतर मला खूपच वाईट वाटलं. मात्र मला लग्न मोडायचं नव्हतं. त्यामुळेच या खोटेपणावर मी पांघरूण घातलं. सहा महिने लग्न वाचवण्याचे प्रयत्न केले."
 
मात्र विश्वास तुटल्यानंतर नात्यात पोकळी निर्माण झाली. अखेरीस रेचल आणि रॉब यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला.
 
मात्र त्यासाठीही अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
 
रेचल सांगते, "जेव्हा तुम्ही आपल्या जोडीदाराच्या अफेअरबाबत कळूनसुद्धा त्याच्यासोबत सहा महिने राहता तेव्हा अडल्ट्रीच्या (व्यभिचार) आधारावर तुम्ही कायदेशीररित्या घटस्फोट घेऊ शकत नाही. इतकं दुःख सहन करूनसुद्धा लग्न वाचवल्याची शिक्षा मला दिली जात असल्याचं मला वाटायचं.
 
रॉबला वाटतं, की पत्नी निघून गेल्यानंतर त्यांना कळालं की कायदेशीररित्या घटस्फोट हवा असेल तर आणखी एक वर्ष या नात्यात राहावं लागेल.
 
आपलं दुःख सांगताना रॉब म्हणतो, "हे सगळं घडल्यानंतर असं वाटलं होतं की माझ्या आयुष्यात मी पुढे जाऊ शकणार नाही. मी सिंगल पॅरेंट होतो. मला केवळ या सर्व गोष्टींतून बाहेर पडायचं होतं. या सगळ्यांनी मला खूप मानसिक ताण दिला होता.
 
दोघांनी वाट पाहण्याऐवजी 'अनुचित व्यवहार' (ज्या कारणांमुळे सोबत राहण्याची इच्छा नाही त्यांची यादी जमा करावी लागेल) च्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज करणं त्यांना योग्य वाटलं.
 
रेचल सांगते, "तुमचे सगळे मित्र त्यांच्या आयुष्यात सेटल होत असताना हे सगळं होत असेल तर ते खूप कठीण असतं."
 
31 वर्षीय रूबीनंही लग्नाच्या दोन वर्षानंतर नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
 
आम्ही लग्नंच करायला नको होतं
ती सांगते, "तो अनेक गोष्टींमध्ये चांगला होता. मात्र प्रत्येक छोट्या गोष्टीवरून आमच्यात वाद व्हायचे. भांडणं व्हायची. गैरसमज खूप वाढले होते. एकेदिवशी मी त्याला दुसऱ्या महिलेला मॅसेज करताना पाहिलं. त्यादिवशी मला वाटलं की आम्ही लग्नंच करायला नको होतं."
 
रूबीच्या आईने घटस्फोटाच्या वेळी तिची साथ दिली नाही. एक चांगली पत्नी बनून राहा, असं तिची आई तिला सांगायची. रूबी आपलं घर सोडून वेगळं राहू लागली.
 
मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राहेल अँड्र्यू सांगतात, की जेव्हा तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींपैकी खूपच कमी व्यक्ती अशा गोष्टींतून गेल्या असतील तर तुम्हाला जास्त एकटं वाटतं.
 
रिलेशनशिप थेरपिस्ट आणि 'द हॅप्पी कपल हँडबुक'चे लेखक अँड्र्यू जी मार्शल याला दुजोरा देताना सांगतात, "घटस्फोटामुळं नेहमी तुमचा आत्मसन्मान दुखावतो. यातून जाणाऱ्या व्यक्तींमध्ये लाज आणि अपयशाची भावना निर्माण होणं स्वाभाविक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना प्रेमात पडलेले पाहता त्या स्थितीत अशा भावना जास्त प्रमाणात निर्माण होतात."
 
रेचलसाठी आता मित्रांना भेटणंही कठीण बनलं आहे. ती सांगते, "माझे मित्र आपल्या जोडीदारासोबत चांगलं नातं निभावत आहेत. त्यांच्यासोबत वेळ घालवणं माझ्यासाठी खूप त्रासदायक बनलं होतं."
 
डॉक्टर अँड्र्यू सांगतात, "आपल्या मित्रांपैकी सर्वात आधी तुमचं लग्न तुटल्यास एक भावनिक तणाव असतो. राग, भीती, नैराश्य या सर्व भावना तुमच्यात आलटून पालटून येत असतात. मात्र जितका जास्त आयुष्याचा अनुभव तुमच्याकडे असेल, तेव्हा तुमच्या भावनांचा योग्य प्रकारे वापर करणं तुम्ही शिकाल. परंतु नवयुवकांना अशा गोष्टी समजण्यास अडचणी येतात.
 
रॉब सांगतो, की मित्रांना भेटणं खूपच अवघड होतं. अनेक वर्षांपासून मित्र असलेले आम्ही काहीजण प्रत्येक शुक्रवारी दारू पिण्यासाठी पबमध्ये जमायचो. माझ्या मनातलं दुःख मी दारुमध्ये विसरायचा प्रयत्न करायचो. मी दारू पिऊन भांडणं केली आहेत. मला खरंच याची लाज वाटते. मी माझ्या घराच्या खिडकीची काचसुद्धा फोडून टाकली होती.
 
"माझे मित्र माझी साथ देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होते. त्यांना वाटायचं, की बाहेर घेऊन गेल्यानंतर, दारू पाजल्यानंतर मला बरं वाटेल, पण अखेरीस मी केवळ रडत बसायचो. माझ्याशी काय आणि कसं बोलायचं हे त्यांना कुणालाही समजत नसे. दारू पिणं सोडल्यानंतर सगळं ठीक होईल, असं मला वाटलं. त्यामुळं मी सहा महिने दारू प्यायलो नाही."
 
सुखद भविष्याची आस
रूबी आपले आई-वडील आणि जुन्या मित्रांपासून दूर गेली. दुसऱ्या शहरात जाऊन नवी नोकरी करू लागली. सहा महिन्यांनंतर ती पुन्हा डेट करू लागली.
 
"पहिली डेट खूपच वाईट ठरली. मी 29 वर्षांची होते आणि मुलगा 26 वर्षांचा. मी घटस्फोट घेत असल्याचं सांगितल्यानंतर त्याने मला अत्यंत विचित्र वागणूक दिली. त्यानंतर इतरांसोबत माझ्या घटस्फोटाबाबत चर्चा करणं मी टाळू लागले."
 
डॉक्टर अँड्र्यू सांगतात की नातं तुटल्यानंतर अपराधी वाटणं स्वाभाविक आहे. "जे काही घडलं ते तुमच्या दोघांतील नात्यामुळं घडलं, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे तुमच्याबद्दल अथवा दुसऱ्या व्यक्तिबद्दल कोणतंही जजमेंट नाही. आपण चांगली व्यक्ती नाही त्यामुळेच हे सर्व घडल्याचं युवकांना वाटतं."
 
रूबी आणि रेचल दोघंही आता नव्या नात्यात जाण्यापूर्वी थोडा वेळ घेत आहेत. मात्र रॉबनं नुकतंच डेट करणं सुरू केलं आहे.
 
रॉब सांगतो, "माझी पहिली पत्नी आणि मी आता चांगले मित्र आहोत. सुरूवातीला मला अडचणी येत होत्या मात्र आता सर्व गोष्टी सकारात्मकरित्या चालू आहेत.
 
रूबी आता हळूहळू आपल्या कुटुंबीयांना भेटू लागली आहे. ती सांगते, की कोणत्याही कामासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते, हे मला घटस्फोटानं शिकवलं. माझ्या आनंदासाठी मी स्वतःच जबाबदार आहे. हा प्रवास अवघड होता. परंतु एका लांबच लांब अंधारानंतर एखाद्या सोनेरी किरणासारखा हा प्रवास आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे दुर्घटना : तब्बल 7000 कोटींचा निधी आणि 29 योजना, तरीही भिंत पडून का मरतात बांधकाम कामगार?