- जेम्स गॅलाघर
मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या डासांची प्रतिकारक्षमता वाढल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं आहे. मलेरियाच्या औषधांना प्रतिकार करू शकणारी प्रजाती सध्या आग्नेय आशियामध्ये आहे आणि तिचा वेगानं प्रसार होत आहे असं थायलंड आणि युकेतल्या अभ्यासकांच्या लक्षात आलं आहे. या प्रजातीचा प्रसार कंबोडियाहून लाओसला झाला, त्यांनतर थायलंड आणि व्हिएतनामध्ये झाला आहे. याचा परिणाम असा झाला आहे की सध्या या भागातले मलेरियाचे रुग्ण बरे होत नाहीयेत.
औषधाला प्रतिकार करू शकणाऱ्या डासांच्या नव्या प्रजातीबाबत संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. ही प्रजाती फक्त आशियापुरतीच मर्यादित राहणार नाही तर भविष्यात ती आफ्रिकेमध्ये पोहचू शकते, असं संशोधकांना वाटतं. असं असलं तरी, याचे गंभीर परिणाम जाणवणार नाही, असं काही तज्ञांनी म्हटलं आहे.
काय घडतंय?
Artemisinin and Piperaquine या औषधांच्या एकत्रीकरणातून मलेरियावर उपचार केला जात असे. कंबोडियात 2008मध्ये हे औषध तयार करण्यात आलं होतं. पण, 2013ला देशातील पश्चिम भागात दोन्ही औषधांचा प्रतिकार करणारी प्रजाती आढळली. Lancet Infectious Diseases नुकत्याच प्रकाशित केलेल्या अभ्यासात, दक्षिण पूर्व आशियातील रूग्णांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले.
या डासांच्या प्रजातीच्या DNA तपासणीनंतर हा स्ट्रेन (प्रतिरोधक) लाओस, थायलंड आणि व्हिएतनाममध्ये पसरलेला दिसून आला. नंतर या प्रसारानं वेग पकडला आणि ते गंभीर रूप धारण करत आहे. काही भागात तर 80 टक्के मलेरिया परपोषी औषधांना प्रतिकार करत होते. "हा प्रकार अधिक वाढत गेला आणि त्यानं गंभीर रूप धारण केलं," असं Wellcome Sanger Instituteच्या डॉ. रॉबर्टो अमॅटो यांनी बीबीसीला सांगितलं. याचा अर्थ हा आजार उपचारानं बरा होण्यापलीकडे गेला आहे का, तर नाही.
स्टँडर्ड थेरपीनुसार, निम्मे पेशंट बरे झाले नाहीत, असं याच जर्नलमधील दुसऱ्या अभ्यासात म्हटलं आहे. असं असलं तरी, या आजारासाठी पर्यायासाठी औषध वापरले जाऊ शकतात. "औषधांना होत असलेला प्रतिकार पाहून यावर लवकरात लवकर पर्यायी प्रथमोपचार पद्धती शोधणं गरजेचं आहे," असं व्हिएतनामधील Oxford University Clinical Research Unitचे प्राध्यापक ट्रान हेन यांनी सांगितलं. यामध्ये artemisinin सोबत इतर औषधी वापरता येऊ शकते किंवा तीन औषधांचं मिश्रण तयार करता येऊ शकतं.
चिंता कसली?
मलेरियाच्या निर्मूलनासाठी मोठी प्रगती साधण्यात आली होती. पण, मलेरिया औषधांवरील प्रतिरोधकांच्या विकासामुळे या प्रगतीला खीळ बसली आहे. दुसरं म्हणजे हा प्रतिरोधक पसरत आफ्रिकेत पोहोचला, तर तिथं 10 पैकी 9 प्रकरणं ही मलेरियाची असतात. "औषधांना प्रतिरोधक करणारी परपोषी या प्रदेशात आल्यास त्याचं आक्रमण वेगानं होईल आणि ते संपूर्ण आफ्रिकेत पसरेल. जसं की 1980मध्ये chloroquineला प्रतिरोधक तयार झाल्यामुळे देशात लाखो लोकांचे मृत्यू ओढावले होते, तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, " असं the Wellcome Sanger Institute and University of Oxfordचे प्राध्यापक ऑलिव्हो मियटो सांगतात.
लोकांच्या आयुष्यात काय फरक?
या अभ्यासामुळे दक्षिण पूर्व आशियातील Greater Mekong Subregionमधील लोकांच्या दैनंदिन आयुष्यात फार काही मोठा फरक पडलेला नाही. मलेरियाचा संसर्ग झाल्यास वेळीच योग्य उपचार घेणे, हा यावरील सर्वांत चांगला उपचार आहे. मलेरिया पसरवणाऱ्या डासांवर नियंत्रण ठेवण्याच्या सर्व प्रयत्नांमध्ये बदल करता कामा नये. पण, संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला देण्यात येणाऱ्या औषधात बदल करायला हवा, असं संशोधकांना वाटतं. अभ्यासातून असं दिसून आलं की, मलेरियाच्या परपोषींचं अनुवांशिक विश्लेषण डॉक्टरांना योग्य उपचार देण्याकरता तसंच औषध-प्रतिरोधकांपासून दूर ठेवण्याकरता आणि रुग्णांना योग्य उपचार देण्याकरता मदत करू शकतं.
परिस्थिती काय?
"हे परपोषी भीतीदायक प्राणी आहेत, यात शंका नाही," असं London School of Hygiene and Tropical Medicineचे प्राध्यापक कॉलिन सदरर्लंड यांनी म्हटलं आहे. "However, I wonder if these parasites are not very fit because the population as a whole is crashing." "मला आश्चर्य वाटतं की, हे परजीवी तंदुरुस्त नाहीत कारण संपूर्ण लोकसंख्या क्रॅश होत आहे," असं त्यांनी पुढे म्हटलं आहे.
कंबोडियात 2008मध्ये 2 लाख 62 हजार मलेरियाचे रुग्ण आढळून आले, तर 2018मध्ये 36,900 रुग्ण आढळले. औषधांना प्रतिरोधक ठरणारी परपोषी निशंयपणे सगळीकडे पसरली असली तरी त्यामुळे वैश्विक धोका निर्माण झालेला नाही, असं सदरर्लंड सांगतात. "आपल्याला जितके गंभीर वाटतात, तितके गंभीर परिणाम यामुळे होणार नाही," ते म्हणतात.
मलेरिया किती वाईट?
दरवर्षी मलेरियाच्या 21.9 कोटी मलेरियाचे रुग्ण आढळतात. सर्दी येणे, त्यानंतर अंगात ताप भरणे आणि प्रचंड घाम येणे, ही मलेरियाची लक्षणं आहेत. उपचाराअभावी श्वासोच्छवासाच्या समस्या होऊ शकतात अथवा रुग्णाचे अवयव निकामी होऊ शकतात. मलेरियामुळे दरवर्षी 4 लाख 35 हजार जणांचा मृत्यू होतो. यांत सर्वाधिक 5 वर्षाखालील मुलांचा समावेश असतो.