Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मालविका बनसोड: खेळाचं मैदान आणि शाळा यात समतोल साधणारी बॅडमिंटनपटू

मालविका बनसोड: खेळाचं मैदान आणि शाळा यात समतोल साधणारी बॅडमिंटनपटू
, सोमवार, 1 फेब्रुवारी 2021 (17:49 IST)
भारतात शिक्षणाला सर्वाधिक महत्त्व दिल्यामुळे क्रीडा क्षेत्रातल उत्तम कामगिरी बजावू शकणाऱ्या अनेक खेळाडूंचं नुकसान झालं आहे. मात्र, भारताची तरुण बॅडमिंटनपटू मालविका बनसोडचं उदाहरण यात उठून दिसतं.
 
मालविकाचे आई-वडील डेंटिस्ट आहेत. मुलीला तिच्या क्रीडा करियरमध्ये मदत व्हावी, म्हणून तिच्या आईने स्पोर्ट्स सायन्समध्ये मार्स्टर्सचं शिक्षण घेतलं.
 
महाराष्ट्री उपराजधानी नागपूरमधून येणाऱ्या मालविकाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती.
 
तिच्या पालकांनीही तिला खेळू दिलं. मात्र, कुठलातरी एक खेळ निवड आणि तो गांभीर्याने खेळ, जेणेकरून उत्तम फिटनेसही राखता येईल आणि त्यामुळे सर्वांगिण विकासही होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आठ वर्षांची असताना मालविकाने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.
 
खेळाचं प्रशिक्षण, साहित्य ते मानसिक आधार या सर्वच दृष्टीने मालविकाच्या आई-वडिलांची तिला कायम साथ होती.
 
मालविकाला बॅडमिंटनसाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करायचं नव्हतं आणि शिक्षणामुळे खेळाकडे दुर्लक्ष झालेलंही तिला आवडणारं नव्हतं. त्यामुळे या दोन्हीमध्ये समन्वय साधताना तिने बरेच कष्ट घेतले. अखेर त्या कष्टांचं चीज झालं.
 
दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांमध्ये तिला 90 टक्क्यांच्या वर गुण पडले. इतकंच नाही या दोन्ही वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्येही ती खेळली आणि पदकही पटकावले.
 
दोन्ही आव्हान पेलताना

एका यशस्वी व्यावसायिक कुटुंबातून येऊनदेखील संसाधनं आणि सुविधा यासाठीचा लढा तिला द्यावाच लागला.
 
नागपुरात तिला प्रॅक्टिससाठी पुरेसे सिंथेटिक कोर्ट्स नव्हते आणि जे होते तिथे पुरेशी प्रकाश व्यवस्था नव्हती.
शिवाय प्रशिक्षक कमी आणि प्रशिक्षण घेणारे जास्त, यामुळे प्रशिक्षकांकडून पुरेसं लक्षही दिलं जात नव्हतं.
 
मालविकाने सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर पातळीवर खेळायला सुरुवात केली तेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्च महागडा आहे आणि अशावेळी मुलीसाठी स्पॉन्सर्सशीप मिळवणंही सोपं नाही, याची जाणीव तिच्या पालकांना झाली.
 
यशाला गवसणी

राज्यपातळीवर अंडर-13 आणि अंडर-17 वयोगटात मानांकनं मिळाल्यानंतर मालविकाने स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया स्पर्धेत तीन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर राष्ट्रीय पातळीवर ज्युनिअर आणि सीनिअर्सच्या स्पर्धेतही तीने 9 सुवर्ण पदकं पटकावली.
 
2019 साली मालदिव्ज इंटरनॅशनल फ्युचर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेतही तिने पदकांची कमाई करत सीनिअर इंटरनॅशनल लेव्हल स्पर्धेत दिमाखदार सुरुवात केली.
 
मालदिव्जमधला विजय केवळ योगायोग नव्हता हे डावखुऱ्या मालविकाने आठवडाभरातच नेपाळमध्ये झालेल्या अन्नपूर्णा पोस्ट इंटरनॅशनल सीरिजमध्ये दाखवून दिलं. या स्पर्धेतही तिने पदक पटकावलं.
 
सीनिअर स्तरावर खेळण्याआधी मालविकाने ज्युनिअर आणि युथ लेव्हलवरही उत्तम कामगिरी बजावली होती.
 
एशियन स्कूल बॅडमिंटन चॅम्पियनशीप आणि साऊथ एशियन अंडर-21 रिजनल बॅडमिंट चॅम्पियनशीपमध्येही तिने सुवर्ण पदकांची कमाई केली होती.
 
मालविकाच्या खेळाची केंद्राच्या क्रीडा विभागाने आणि इतर क्रीडा संस्थांनी नोंद घेतली.
 
आजवर क्रीडा क्षेत्रातले अनेक पुरस्कार तिला मिळाले आहेत. नागभूषण पुरस्कार, खेलो इंडिया टॅलेंट डेव्हलपमेंट अॅथलिट पुरस्कार आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम (TOPS) अॅथलिट सन्मानाचीही ती मानकरी ठरली आहे.
 
शिक्षण आणि खेळ यांचा समतोल साधताना मालविकाला जी तारेवरची कसरत करावी लागली, त्या अनुभवातून खेळ आणि शिक्षण यांची सांगड घालण्यासाठी बरंच काही करण्याची गरज आहे, असं तिल वाटतं.
 
देशासाठी पदक जिंकतानाच ज्यांना शिक्षणातही मागे पडायचं नाही, अशा महिला खेळाडूंच्या गरजांविषयी व्यवस्थेने अधिक संवेदनशील असायला हवं आणि तसं झाल्यास यापुढे कुठल्याही मुलीला शिक्षण किंवा खेळ यापैकी एकाचीच निवड करण्याची गरज पडणार नाही, असं मालविकाचं म्हणणं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बजेट 2021 : इन्कम टॅक्स वाढला की कमी झाला?