Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मिल्खा सिंग यांना जेव्हा पाकिस्तानी फिल्ड मार्शल म्हणाले, 'दौड़े नहीं, उड़े हो'

मिल्खा सिंग यांना जेव्हा पाकिस्तानी फिल्ड मार्शल म्हणाले, 'दौड़े नहीं, उड़े हो'
, शनिवार, 19 जून 2021 (10:36 IST)
- रेहान फझल
कोरोनातून बरे झाल्यानंतरच्या आरोग्याच्या समस्येमुळे 91 वर्षीय मिल्खा सिंग यांचं 18 जून 2021 रोजी चंदिगडच्या पीजीआयएमईआर याठिकाणी निधन झालं. ते भारताचे सर्वांत प्रसिद्ध धावपटू होते.
 
1932 मध्ये अविभाज्य भारतात जन्म झालेल्या मिल्खा सिंग यांची कहाणी ही दृढ निश्चयाची आणि प्रेरणा देणारी आहे.
 
असे व्यक्ती जे फाळणीच्या दंगलींमध्ये अगदी थोडक्यात बचावले, ज्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची त्यांच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली, जे रेल्वेत विनातिकिट प्रवास करताना पकडले गेले आणि त्यासाठी त्यांना तुरुंगातही जावं लागलं आणि ज्यांनी केवळ एक ग्लास दूध मिळावं यासाठी लष्कराच्या शर्यतीमध्ये भाग घेतला, तेच पुढच्या काळात भारतातील सर्वात महान धावपटू बनले.
 
1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्ये विश्वविक्रम मोडूनही मिल्खा सिंग यांना भारतासाठी पदकाची कमाई करता आली नाही, त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
'ही शर्यत तुला उध्वस्त करू शकते'
मिल्खा सिंग यांनी जागतिक स्तरावर सर्वप्रथम ओळख मिळवली ती, कार्डिफ राष्ट्रकुल (कॉमनवेल्थ) स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत त्यांनी त्याकाळी विश्वविक्रम नावावर असलेले धावपटू मॅल्कम स्पेंस यांना 440 यार्ड (आताचे 400 मीटर) शर्यतीत मागं टाकत सुवर्ण पदक जिंकलं होतं.
 
शर्यतीच्या आधल्या रात्री मिल्खा सिंग यांना झोपच आली नाही. दुसऱ्या दिवशी 440 यार्डच्या शर्यतीची अंतिम फेरी चार वाजता होती. मिल्खा सिंग यांनी सकाळी स्नायूंना आराम मिळावा म्हणून टबमध्ये गरम पाण्यानं अंघोळ केली. त्यानंतर नाश्ता केला आणि ते पुन्हा झोपी गेले. त्यानंतर ते दुपारी झोपेतून उठले.
 
त्यांनी जेवणामध्ये एक वाटी सूप आणि दोन स्लाइड पाव खाल्ले. शर्यतीत धावताना कामगिरीवर परिणाम व्हायला नको म्हणून त्यांनी कमी खाल्लं. "एक वाजता मी केस विंचारले आणि लांब केसांचा जुडा पांढऱ्या रुमालाने व्यवस्थित बांधला," अशी आठवण मिल्खा सिंग यांनी या दिवसाबाबत सांगितली आहे.
 
"एअर इंडियाच्या माझ्या बॅगमध्ये मी शर्यतीचे स्पाइक्ड शूज, एक छोटा टॉवेल, कंगवा आणि ग्लुकोजचं एक पाकिट घेतलं. ट्रॅक सूट परिधान केला, डोळे बंद केले आणि गुरू नानक, गुरू गोविंद सिंग आणि शिवशंकराचं स्मरण केलं."
 
त्यादिवसाच्या प्रत्येक क्षणाची आठवण मिल्खा सिंग यांनी सांगितली आहे. "माझे टीममधील सहकारी बसमध्ये माझी वाट पाहत होते. मी जेव्हा माझ्या सीटवर जाऊन बसलो, त्यावेळी ते, 'मिल्खा सिंगचा रंग आज उडालेला दिसतोय,' असं म्हणत माझी गंमत करू लागले. एकाने विचारलं, काय झालं? आज तू आनंदी दिसत नाहीस? मी त्यांना काहीही उत्तर दिलं नाही, पण माझ्या मनावरचा ताण काहीसा कमी झाला."
 
बीबीसीबरोबर बोलताना मिल्खा सिंग यांनी सांगितलं होतं की, ते काळजीत असल्याचं पाहून प्रशिक्षक डॉक्टर हावर्ड त्यांच्या शेजारी येऊन बसले आणि म्हणाले, "आजची शर्यत एक तर तुला मोठं बनवेल, अन्यथा तुला उध्वस्त करेल. तू माझ्या सूचना ऐकल्या तर तू माल्कम स्पेंसला हरवू शकतोस. तुझ्यात तसं करण्याची क्षमता आहे."
 
सहाव्या लेनमध्ये होते भारताचे मिल्खा सिंग
मिल्खा म्हणाले होते, प्रशिक्षकांनी धीर दिल्यामुळे त्यांच्यामध्ये काहीसा प्राण आला. मैदानात पोहोचल्यानंतर ते थेट ड्रेसिंग रूममध्ये गेले आणि पुन्हा झोपले. किंचित ताप आला आहे, असंही त्यांना वाटलं. त्याचवेळी डॉक्टर हावर्ड पुन्हा आले. त्यांनी मिल्खा यांच्या पाठ आणि पायांचा मसाज केला आणि म्हणाले, "उठ आणि तयारीला लाग, तासाभरामध्ये शर्यत सुरू होणार आहे."
 
हावर्ड हे शर्यतीपूर्वी मिल्खा सिंग यांच्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याच्या तंत्राचा अभ्यास करत होते.
 
पहिल्या हिटदरम्यान (शर्यत) रात्री जेवणानंतर ते मिल्खा यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या शेजारी बसले आणि मोडक्या हिंदीमध्ये म्हणाले होते, "मिल्खा आपण स्पेंसला 400 मीटर धावताना पाहिलं. तो पहिले 300 मीटर हळू धावतो आणि अखेरच्या 100 मीटरमध्ये सर्वांना पछाडतो. तुला 400 मीटर नाही, 350 मीटर धावायचं आहे. एवढीच (350 मीटर) शर्यत आहे असंच समज."
 
"440 यार्डच्या शर्यतीसाठी 3 वाजून 50 मिनिटांनी अंतिम कॉल आला. आम्ही सर्व सहा जण स्टार्टिंग लाइनवर जाऊन उभे राहिलो. मी टॉवेलनं घाम पुसला. शूजच्या लेस बांधत असतानाच दुसरा कॉल आला. मी ट्रॅक सूट काढला. त्यावेळी माझ्या छातीवर इंडिया असं लिहिलेलं होतं. त्याच्याखाली अशोक चक्रही होतं. मी काही वेळ दीर्घ श्वास घेतला आणि प्रतिस्पर्ध्यांना शुभेच्छा दिल्या," असं मिल्खा म्हणाले होते.
 
इंग्लंडचे साल्सबरी पहिल्या लेनमध्ये होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे स्पेंस आणि ऑस्ट्रेलियाचे केर, जमैकाचे गास्पर, कॅनडाचे टोबॅको आणि सहाव्या लेनमध्ये होते भारताचे मिल्खा सिंग.
 
फक्त अर्ध्या फुटाचा फरक
स्टार्टरने ऑन युवर मार्क म्हणताच, मिल्खा यांनी डावा पाय स्टार्टिंग लाइनच्या मागे केला, उजवा गुडघा डाव्या पायाच्या समांतर केला आणि दोन्ही हात जमिनीला टेकवले.
 
गोळी झाडली जाताच मिल्खा असे काही धावले की, जणू मधमाशांचा थवा त्यांच्या मागे लागलेला असावा. त्यांना हावर्ड यांनी दिलेला सल्ला लक्षात होता. पहिल्या 300 मीटरच्या अंतरासाठी त्यांनी सर्व शक्ती पणाला लावली.
 
मिल्खा सर्वात पुढं होते आणि स्पेंस यांनी जेव्हा मिल्खा यांना विद्युत वेगानं धावताना पाहिलं तर त्यांनी पुढं जाण्याचा प्रयत्न केला, पण नशीब मिल्खा यांच्या बाजुनं होतं.
 
"मी शर्यत संपण्यासाठी 50 फुटांचं अंतर राहिलं असताना, पांढरा टेप (फिनिशिंग लाइन) पाहिला होता. स्पेंसच्या आधी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मी पूर्ण वेगानं धावलो. मी जेव्हा या टेपला स्पर्श केला त्यावळी स्पेंस केवळ अर्धा फूट अंतराने माझ्या मागे होते. त्यावेळी इंग्रज - कम ऑन सिंग, कम ऑन सिंग असं मोठ्यानं ओरडत होते. टेपला स्पर्श करताच मी बेशुद्ध होऊन मैदानावरच पडलो," अशी आठवण मिल्खा यांनी सांगितलेली आहे.
 
मिल्खा सिंग यांचा स्ट्रेचरवरून डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्याठिकाणी त्यांना ऑक्सिजन देण्यात आला. शुद्धीत आल्यानंतर त्यांच्या लक्षात येऊ लागलं की, त्यांनी केवढी मोठी कामगिरी केली आहे.
 
त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना खांद्यावर उचललं, त्यांनी भारताचा तिरंगा घेतला आणि संपूर्ण स्टेडियमची चक्कर मारली. भारतीय क्रीडापटूनं राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची ती पहिलीच वेळ होती.
 
धावत आल्या विजयालक्ष्मी पंडित
इंग्लंडच्या महाराणी एलिजाबेथ द्वितिय यांनी मिल्खा सिंग यांना सुवर्णपदक प्रदान केलं, त्यानंतर जेव्हा त्यांनी भारताचा तिरंगा फडकताना पाहिला तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
 
त्यानंतर व्हिआयपी इन्क्लोजरमधून छोटे केस असणारी, साडी परिधान केलेली एक महिला त्यांच्याकडे धावत येत असल्याचं त्यांनी पाहिलं. भारतीय पथकाचे प्रमुख अश्विनी कुमार यांनी त्यांची ओळख करून दिली. त्या ब्रिटनमधील भारताच्या उच्चायुक्त विजयालक्ष्मी पंडित होत्या.
 
"त्यांनी मला भेटून माझं अभिनंदन केलं आणि सांगितलं की, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक संदेश पाठवला आहे. एवढ्या मोठ्या कामगिरीनंतर भेट म्हणून काय स्वीकारायला आवडेल? असं नेहरुंनी विचारलं होतं. अशा वेळी काय मागावं हे मला सुचतंच नव्हतं. माझ्या तोंडून निघालं की, माझ्या विजयाच्या आनंदात संपूर्ण देशाला (भारत) सुटी द्या. मी ज्यादिवशी भारतात परतलो त्यादिवशी नेहरूंनी त्यांचं वचन पूर्ण करत संपूर्ण देशात सुटी जाहीर केली होती," असं मिल्खा यांनी सांगितलं आहे.
 
'फ्लाइंग शीख' होण्यामागची कहाणी
1960 मध्ये मिल्खा सिंग यांना पाकिस्तानकडून भारत-पाकिस्तान क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निमंत्रण आलं. टोकियो आशियाई स्पर्धेमध्ये मिल्खा यांनी पाकिस्तानचा सर्वोत्तम धावपटू अब्दुल खालिकला 200 मीटर शर्यतीत पराभूत केलं होतं.
 
त्यानंतर पाकिस्तानच्या धरतीवर या दोघांमध्ये शर्यत व्हावी अशी पाकिस्तानची इच्छा होती. पण मिल्खा यांनी पाकिस्तानला जायला नकार दिला. कारण, फाळणीच्या वेळी त्यांच्या वडिलांची हत्या करण्यात आली होती. त्यासंबंधी अनेक कटू आठवणी त्यांच्या स्मरणात होत्या.
 
मात्र, नेहरूंच्या सांगण्यावरून मिल्खा पाकिस्तानला गेले. लाहोर स्टेडियममध्ये स्टार्टरनं गोळी झाडताच, मिल्खा यांनी धावायला सुरुवात केली. प्रेक्षक पाकिस्तान झिंदाबाद... अब्दुल खालिक झिंदाबाद.. अशा घोषणा देत होते. खालिक मिल्खा यांच्या पुढं होते, पण 100 मीटर पूर्ण होण्यापूर्वीच मिल्खा यांनी त्यांना गाठलं.
 
त्यानंतर खालिक यांचा वेग मंदावला आणि मिल्खा यांनी फिनिशिंग लाईनला स्पर्श केला त्यावेळी खालिक त्यांच्यापेक्षा अंदाजे दहा फूट मागं होते. त्यांनी 20.7 सेकंदांमध्ये ही शर्यत पूर्ण केली होती आणि ती त्यावेळच्या विश्वविक्रमाची बरोबरी होती. शर्यत संपल्यानंतर खालिक मैदानावरच रडायला लागले.
 
मिल्खा त्यांच्याजवळ गेले आणि पाठ थोपटत म्हणाले, "विजय आणि पराभव हा खेळाचा भाग आहे. ते मनावर घ्यायचं नसतं."
 
शर्यतीनंतर मिल्खा यांनी मैदानाला चक्कर मारली. त्यांना पदक देताना पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष फील्ड-मार्शल अय्यूब खान म्हणाले, "मिल्खा आज तुम्ही धावले नाही, हवेत उडाले आहात. मी तुम्हाला 'फ्लाइंग शीख' ही पदवी देतो."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ICC WTC Final: पुन्हा पाऊस खेळ खराब करेल की प्रेक्षकांना आनंदी होण्याची संधी मिळेल, दुसऱ्या दिवसाचे Weather Update जाणून घ्या