"शरदराव तुमच्या पक्षाचं नाव राष्ट्रवादी आहे. हीसुद्धा धुळफेक आहे का," असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर इथं आयोजित सभेत केला.
अहमदनगर इथं शुक्रवारी मोदी यांची सभा झाली. या सभेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना पुन्हा एकदा टीका केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, दक्षिण नगरमधील भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील, शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे आदी उपस्थित होते.
मोदी म्हणाले,"काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा लोकांबरोबर आहे, जे जम्मू काश्मीर भारतापासून तोडण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसच एक वेळ ठीक आहे, कारण हे पाप त्यांनीच जन्माला घातलं आहे. पण शरदराव तुम्हाला काय झालं आहे? देशासाठी तुम्ही काँग्रेस सोडली होती. आता देशात दोन पंतप्रधान असण्याची भाषा होत असताना तुम्ही गप्प का आहात? तुम्हीही देशाकडे विदेशी चष्म्यातून पाहात आहात का? काश्मीरमधून सैन्य हटवण्याची आणि सैनिकांचे अधिकार काढून घेण्याची भाषा होते. तुम्ही स्वत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील आहात. तुम्हाला रात्री झोप कशी येते? "
मोदी म्हणाले, "देशाच्या सुरक्षेच्या प्रश्नावर भारत आता जगाकडे मदत मागत नाही. दहशतवाद्यांना घरात घुसून मारण्याची परवानगी आम्ही सैन्याला दिली आहे. युपीएच्या काळात सतत कुठे ना कुठे बाँब स्फोट होत होते. पण पाच वर्षं हा चौकीदार सजग राहिला. आता दहशतवाद्यांच्या डोक्यात ही भीती आहे की ते कुठेही लपले तरी त्यांना शोधून शिक्षा केली जाईल."
महाराष्ट्राच्या भूमीने जे संस्कार दिले आहेत ते आम्ही मजबूत करत आहोत. देशाकडे आज जग महाशक्ती म्हणून पाहात आहे. मतदान करताना 'इमानदार चौकीदार हवा की भ्रष्ट नामदार हवा, हिंदुस्तानचे हिरो हवेत की पाकिस्तानची भलावण करणारे हवेत, हा विचार करा. 21व्या शतकातील भारत कमजोर हवा की बळकट हवा, हा विचार यावेळी पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांनी करावा.
23 मे रोजी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल, त्यानंतर PM किसान योजना सर्व शेतकऱ्यांना लागू केली जाईल असं ते म्हणाले. कोकणात समुद्रात वाहून जाणारे पाणी वापरात आणण्यासाठी योजना आखली जाईल, देशात पाण्यासाठी स्वतंत्र जलशक्ती मंत्रालय स्थापन करणार आहोत, असं ते म्हणाले. उज्ज्वला योजना, स्वयंरोजगारसाठी विनातारण कर्ज, रस्ते बांधणी आदी योजानांवर त्यांनी भाष्य केलं.
'काँग्रेस हटाव, गरिबी हटाव,' असा नारा त्यांनी यावेळी दिला. काँग्रेसने देशाला आतापर्यंत लुटले आहे, काँग्रेस आणि मित्रपक्षांना शिक्षा द्या, असं ते म्हणाले.
मध्य प्रदेशात मुलांसाठीच्या योजनांचा पैसा काँग्रेस निवडणुकीसाठी वापरत आहे, हा तुलघल रोड घोटळा आहे, असा उल्लेख त्यांनी केला. देशाचा चौकीदार इमानदार आहे. शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमळ आणि धनुष्यबाणाला मतदान करा, असं आवाहन त्यांनी केलं.
महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील देश घडवण्यासाठी हृदय तसं लागतं, असं ते म्हणाले.
अहमदनगरचा उल्लेख त्यांनी साईबाबांची श्रद्धेची आणि सेवेची भूमी असा त्यांनी केला.
'काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक'
सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेसवर सर्जिकल स्ट्राईक होता, असा उल्लेख फडणवीस यांनी केला. विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचं काम चांगलं आहे, त्यांच्याकडे पक्ष दुर्लक्ष करणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र पाकिस्तानला जागा दाखवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या मागे उभा आहे, असं ते म्हणाले. राष्ट्रवादीचे ओपनिंग बॅटसमन आणि कॅप्टनने माघार घेतली पण आमचे युवा बॅटसमन मैदानात उतरले आहेत, असं ते म्हणाले.
भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांना भाषण करताना रोखण्याचा प्रयत्न केला. गांधी यांना तिकीट नाकारण्यात आल्याने त्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. आजच्या रॅलीत त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामांची माहिती दिली. त्यांचं भाषण सुरू असतानाच त्यांना "आवरते" घेण्याची सूचना केली. यावरून गांधी चांगलेच संतापले.