Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहन डेलकर आत्महत्या : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने

मोहन डेलकर आत्महत्या : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आमने-सामने
, सोमवार, 1 मार्च 2021 (17:13 IST)
दादरा-नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राइव्हच्या सी-ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आला. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.
 
ते म्हणाले,"दुसरी एक आत्महत्या मुंबईत झाली. त्यात 13-14 पानांची स्यूसाईड नोट मिळाली आहे. त्यात उच्चपदस्थ नावं आहेत. सहा-सात टर्म खासदार राहीलेल्या माणसाने आत्महत्या केली. भाजप नेत्यांना त्याचा छळ करण्याचा परवाना मिळाला आहे का," असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी दादरा नगर आणि हवेलीचे खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्ये प्रकरणी विचारला आहे.
 
तसंच ही आत्महत्या 'संशयास्पद' असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलं होतं.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत या प्रकरणात कुठेही भाजप नेत्याचं नाव नसल्याचं म्हटलं आहे. "मोहन डेलकरांच्या आत्महत्येत कुठल्याही भाजप नेत्याचं नाव नाही. मोहन डेलकर यांची आत्महत्या दुर्दैवी आहे. कुठल्याही आत्महत्येची चौकशी झाली पाहिजे."
 
संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये 'रोखठोक' सदराअंतर्गत खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
 
"मोहन डेलकरांना गेली किमान 20-22 वर्षं मी जवळून ओळखतो. हा माणूस सगळ्यांना थेट भिडणारा आणि नडणारा होता. तो मैदानातून पलायन करील असं कधीच वाटलं नाही," असं म्हणत संजय राऊत पुढे म्हणालेत की, डेलकरांची आत्महत्या हे साधं प्रकरण वाटत नाही.
 
"सुशांत राजपूतने त्याच्या एका सिनेमात 'आत्महत्या करू नये, निराश होऊ नये' असे संवाद फेकले. त्यामुळे सुशांतसारखा खंबीर मनाचा तरुण आत्महत्या कसा करील? सुशांतची आत्महत्या नसून हत्या असल्याची 'पटकथा' तयार झाली. त्या कथाकारांना डेलकरांच्या आत्महत्येमागे कोणतेच काळेबेरे दिसू नये?" असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे.
 
याच लेखात संजय राऊत यांनी मोहन डेलकरांच्या सद्यस्थितीचाही उल्लेख केला आहे आणि त्यातून त्यांनी दादरा-नगर हवेलीतील शासन-प्रशासन, तसंच भाजपवर निशाणा साधला आहे.
 
राऊत यांनी लेखात लिहिलंय, "सिल्वासा हे केंद्राशासित प्रदेश. येथे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींपेक्षा केंद्राने नेमलेल्या प्रशासकांचेच जास्त चालते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचा संघर्ष सुरूच असतो. पुन्हा निवडून आलेले खासदार हे दिल्लीतली सत्ताधारी पक्षाचे नसतील तर त्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीस पिळवणुकीच्या चरकातून जावे लागते, रोज अपमानित व्हावे लागते. त्याची प्रचंड कोंडी होत असते. गेली काही वर्षं डेलकर याच पिळवणुकीच्या चरकातून जात होते."
 
डेलकरांनी ही खंत वेळोवेळी बोलून दाखवली असल्याचं सांगत राऊत पुढे म्हणतात, डेलकरांनी याच भावनेचा स्फोट लोकसभेत केला, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
 
"एका नटाची आत्महत्या खळबळ माजवते, एका नटीचे बेकायदेशीर बांधकाम तोडल्यावर हलकल्लोळ होतो, पण सातवेळा निवडून आलेले एक खासदार मुंबईत संशयास्पदरित्या मृत पावतात. त्यावर कोणी काहीच आपटायला तयार नाही," असं म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे.
 
या लेखाच्या शेवटच्या भागात संजय राऊत यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना उद्देशून प्रश्न विचारला आहे की, "प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाने आपल्याला कसे अपमानित केले, त्याबाबत डेलकरांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. डेलकर अस्वस्थ होते आणि प्रशासकीय दडपशाहीने ते असहाय्य बनले. त्याच असहाय्यतेतून संसदेचा एक सदस्य, एक लोक प्रतिनिधी दु:खद आत्महत्या करतो. आपल्या झुंजारपणासाठी, स्वाभिमानासाठी एका खासदाराला प्राणाचे मोल द्यावे लागले. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आता काय करणार आहेत?"
 
संजय राऊत यांच्या या संपूर्ण लेखाचा रोख केंद्र सरकार, भाजप आणि दादरा-नगर हवेलीच्या प्रशासनाकडे आहे.
 
संजय राऊत यांचं लेखन भाजपविरोधापर्यंतच मर्यादित - भाजप
याबाबत आम्ही यावर भाजपची भूमिकाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
 
महाराष्ट्र भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "संजय राऊत यांचं लेखन हे केवळ भाजपविरोध इथवरच मर्यादित असतं."
 
"कुठल्याही प्रश्नावर संजय राऊत यांचा भाजपविरोध, मोदीविरोध दिसतो. त्यामुळे ज्यांना एवढंच राजकारण करायचं आहे, त्यांच्याकडून कोणतीही वेगळी अपेक्षा आम्ही ठेवत नाही," असंही केशव उपाध्ये म्हणाले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

COVID-19 लस मिळविण्यासाठी, घरी बसून Co-WIN App वर रजिस्ट्रेशन करा, संपूर्ण प्रक्रिया येथे पहा