Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख, आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी

दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख, आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी
MPSC टॉपर दर्शना पवार हिच्या खून प्रकरणी पोलिसांनी तिचा मित्र राहुल हांडोरे याला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
दर्शना पवार हिने लग्नास नकार दिल्याने तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून पुढील तपासानंतर सविस्तर माहिती हाती येईल, असं पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितलं.
 
26 वर्षीय दर्शना पवार हिचा मृतदेह पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील राजगडाच्या पायथ्याजवळ 18 जून 2023 रोजी सापडला होता.
 
दर्शना पवार मूळची अहमदनगरची रहिवासी होती. तिने यावर्षी MPSC परीक्षेत यश मिळवलं होतं.
 
पोलिसांनी काय म्हटलं?
आरोपी राहुल हांडोरे याला अटक केल्यानंतर आज (22 जून) पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी एक पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली.
 
ते म्हणाले, "18 जून 2023 रोजी वेल्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह सापडला होता. त्या मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दर्शना दत्तू पवार (वय 26) असं निष्पन्न झालं. परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार मुख्य आरोपी राहुल हांडोरे (वय 28) हा आहे, हे निष्पन्न झालं."
 
"घटनेपासून राहुल फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी विविध पथके रवाना केली. अखेर त्याला काल (21 जून) रात्री उशीरा मुंबईतील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेण्यात आलं.
 
प्राथमिक माहितीनुसार लग्नास नकार दिल्याच्या कारणामुळे राहुलने दर्शनाचा खून केल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत आणखी तपास करण्याची गरज आहे. त्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली असून लवकरच सविस्तर माहिती माध्यमांना दिली जाईल, असं गोयल यांनी म्हटलं.
 
गोयल यांच्या माहितीनुसार, "आरोपी राहुल हासुद्धा MPSC ची तयारी करत होता. पुण्यात गेल्या काही वर्षांपासून तो पार्टटाईम जॉब करून परीक्षा देत होता. सध्या तो वेगवेगळ्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेससाठी पार्टटाईम जॉब करत होता.
 
दर्शना आणि राहुल यांची लहानपणापासून ओळख आहे. मुलीच्या मामाचं घर आणि आरोपीचं घर हे समोरासमोर असल्याने त्यांची पूर्वीपासून ओळख होती."
 
अंकित गोयल म्हणाले, "राहुल हांडोरे आणि दर्शना पवार हे राजगडावर जाताना दिसतात. पण परत येताना आरोपी एकटाच खाली येताना दिसतो. घटनास्थळी दगडांवर रक्ताचे डाग सापडले आहेत. मृतदेहावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निशाण आहेत. याबाबतचा सविस्तर पोस्टमॉर्टम अहवाल अद्याप येणं बाकी आहे. सकाळी साडेआठ ते पावणे अकरादरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला."
 
पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न
अंकित गोयल म्हणाले, "आरोपी राहुल फरार झाल्यानंतर सतत रेल्वेने फिरून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता.
 
रेल्वेने तो पश्चिम बंगालसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरला. अधून मधून घरच्यांशी तो संपर्क साधत होता. अखेर मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर त्याला अटक करण्यात आली."
 
नेमकं काय घडलं?
दर्शना पवार यांचे वडील दत्ता पवार यांनी पोलीस जबाबात दिलेल्या माहितीनुसार, "दर्शना 9 जूनला पुण्यात एका खासगी कोचिंग क्लासच्या सत्कार समारंभात सहभागी होण्यासाठी आली होती. 10 जूननंतर तिचा कुटूंबीयांशी संपर्क झाला नाही. त्यामुळे 12 जूनला त्यांचे कुटुंबीय पुण्यात आले आणि कोचिंग क्लासमध्ये जाऊन चौकशी केली.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेल्हे तालुक्यातील गुंजवणी गावातील स्थानिकांमध्ये काहीतरी कुजल्यासारखा वास येत असल्याची कुजबूज सुरु झाली. स्थानिकांनी पोलीस पाटलांनी कळवलं आणि त्यानंतर ही माहिती वेल्हे पोलिसांपर्यंत आली. जिथून वास येत होता, तिथे शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला.
 
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक मनोज पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या माहितीनुसार, “रविवारी राजगडाच्या पायथ्याशी कुजलेला वास येत असल्याची माहिती मिळाली. शोध घेतल्यावर एक मृतदेह सापडला. मृतदेहाजवळ काही वस्तूही सापडल्या. त्यामध्ये फोन, बॅग अशा गोष्टींचा समावेश होता. सिंहगड पोलीस हद्दीत एक मिसिंग पर्सन तक्रार दाखल होती. त्यावरुन नातेवाईकांशी संपर्क साधला त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली."
 
"मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला आहे. पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आलाय. पुढचा तपास सुरु आहे,” अशी माहिती मनोज पवार यांनी दिली.
 
पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय म्हटलंय?
वेल्हे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी सांगितलं की, दर्शना पवार यांच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे.
 
मनोज पवार यांच्या माहितीनुसार, "पोस्टमार्टममध्ये डोक्यावर जखम असल्याचे पुरावे समोर आले आहेत. तसंच, शरीरावर जखमाही आढळल्या आहेत. या प्राथमिक अहवालावरुन तिची हत्या झाली असावी, असं स्पष्ट होतंय. त्यामुळे आम्ही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास सुरु आहे."
 
"आमचं संपूर्ण पोलीस ठाणे या प्रकरणाच्या तपासावर काम करतंय. तिच्या मित्राचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय. हत्येचा गुन्हा दाखल केला असला तरीही तो कुणी केला आणि का केला यासंदर्भात आम्ही तपास करतोय," अशीही माहिती मनोज पवार यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'भाजप सत्तेत आल्यास देशात निवडणुका होतील की नाही हे ठरलेले नाही', शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल