Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मर्डर इन अ कोर्टरूम : अक्कू यादव कोण होता, ज्याला महिलांनी कोर्टातच ठेचून मारलं

court
, रविवार, 6 नोव्हेंबर 2022 (14:13 IST)
तुषार कुलकर्णी
"सकाळी चार-पाच वाजता दरवाजावर जोराजोरात थाप पडली. माझ्या नवऱ्याने दार उघडलं. नवऱ्याने विचारलं की काय काम आहे. तो म्हणाला तुझ्याशी नाही तर तुझ्या बायकोशी काम आहे. त्याला बोलण्यासाठी नकार दिला पण त्याने चाकू दाखवला. माझ्या नवऱ्याला त्याने बाथरूममध्ये कोंडलं आणि तो मला हाताला ओढत वस्तीच्या बाहेर घेऊन गेला. आणि त्याने माझ्यासोबत इतकं घाणेरडं काम केलं की ते इथं सांगू पण शकत नाही. तो वस्तीमध्ये झालेला पहिला बलात्कार होता. त्यानंतर त्याने कित्येक महिलांसोबत हे केलं."
 
नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'इंडियन प्रेडिटर- मर्डर इन अ कोर्टरुम' या तीन भागांच्या चित्रपटात एक महिला आपला अनुभव सांगते.
 
जेव्हा या महिलेवर अत्याचार करण्यात आले तेव्हा कुणी अक्कू यादवचा प्रतिकार केला नसेल, पण काही वर्षांनंतर मात्र याच अक्कू यादवची कोर्टात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात महिलांवर आरोप ठेवण्यात आला की त्यांनी कोर्टात अक्कू यादवची हत्या केली.
 
औपचारिकरित्या पाच महिलांवर हत्येचा आरोप होता पण या पाचच बायका नव्हे तर एकूण 200 महिला म्हणाल्या की, जर दोषी ठरवायचेच असेल तर आम्हाला पण ठरवा. त्यानंतर एकूण 21 जणांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला. पण नंतर आरोपींची निर्दोष सुटका झाली.
 
भारतात गाजलेल्या प्रकरणांपैकी एक असलेलं हे प्रकरण महाराष्ट्राची उप-राजधानी असलेल्या नागपुरात हे घडलं होतं. एखादा गुन्हा घडल्यानंतर बऱ्याचदा दोषी हे आपला गुन्हा मान्य करत नाही असं चित्र असतं पण एक-दोन नाही तर चक्क दोनशेहून अधिक महिला हा गुन्हा आम्हीच केला असं का म्हणत होत्या.
 
नागपुरातील कस्तुरबा नगर दलितबहुल वस्तीत अक्कू यादवने 40 हून अधिक महिलांवर बलात्कार केला होता, असं या महिलांचं म्हणणं होतं. त्याच्या दहशतीला कंटाळून आणि त्याचा बदला म्हणून आम्ही त्याला मारलं, असं त्या सांगत.
 
सध्या नेटफ्लिक्सवर मर्डर इन कोर्टरूम या वेबसीरिजमुळे अक्कू यादव प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे अक्कू यादव कोण होता, तो गुंड कसा बनला आणि त्याचा अंत कसा झाला हे समजून घेण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
 
अक्कू यादव कोण होता?
भरत कालीचरण यादव म्हणजेच अक्कू यादवचे मृत्यूवेळी वय 32 होते अशी नोंद आहे. म्हणजे त्याचा जन्म साधारणतः 1971-72 मध्ये झाला असावा. त्याचं नाव नागपुरातील कस्तुरबा नगर या झोपडपट्टीच्या वस्तीत तो राहत असे. त्यांच्या घरी म्हशी होत्या आणि त्याच्या वडिलांचा दुध-दुभत्याचा व्यवसाय होता.
 
त्याला दोन भाऊ होते, संतोष आणि युवराज. पुढे अक्कू यादवची हत्या झाल्यावर या दोघांनी कोर्टात हत्येची साक्ष दिली होती पण ती अमान्य करण्यात आली होती.
 
त्याचे शिक्षण जेमतेमच होते. मित्रांसोबत उनाडक्या करणे, दारू-गांजा पिणे, जुगार खेळणे अशा गोष्टी तो करू लागला. अक्कू यादव पहिल्यांदा पोलीस रेकॉर्डवर 1991 मध्ये. मुलीवर सामूहिक बलात्कार करण्याचा आरोप त्याच्यावर होता.
 
त्या काळात कस्तुरबा नगरमध्ये दोन गॅंग कार्यरत होत्या. त्यापैकी एकात तो सामील झाला आणि चोऱ्या-माऱ्या करणे, खंडणी अशी कामं तो करू लागला. कस्तुरबा नगरमध्ये जे छोटे मोठे व्यवसाय चालत त्यावर तो हफ्ते गोळा करू लागला.
 
दमदाटी करून जमीन बळकवणे ही कामे देखील त्याने केली होती. त्याच्या नावावर 24 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात हत्या, खंडणी गोळा करणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे. अक्कू यादव वर MPDA act नुसार गुन्हाही दाखल झाला होता.
 
महाराष्ट्र झोपडपट्टीदादा, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत हा कायदा महाराष्ट्रात आहे. त्यानुसार त्याची नोंद झाली होती.
 
अक्कू यादवची दहशत
अक्कू यादवच्या हत्येनंतर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी या प्रकरणाचा स्वतंत्ररीत्या अभ्यास केला. कस्तुरबा नगर वस्तीतील लोकांना भेट देऊन त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्या काळात प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रातील बातम्यांची पडताळणी केली. पोलीस दफ्तरी कोणत्या गुन्ह्यांची नोंद आहे याची शहानिशा केली. कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह ही मानवाधिकार संघटना त्यापैकी एक आहे.
 
कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्हने या संपूर्ण प्रकरणावर 'व्हिजिलांटिजम इन नागपूर' असा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
अक्कू यादव दहशत कशी पसरवायचा याचा उल्लेख यात आहे.
 
या वस्तीमध्ये हरिचंद खोरसे नावाचे अत्यंत वृद्ध गृहस्थ वस्तीत राहत होते. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते बाजा वाजवत असत. अक्कूने त्यांच्याकडे 100 रुपयांची मागणी केली.
 
अक्कूची मागणी ते पूर्ण करू शकले नाही तेव्हा अतिशय निर्दयपणे अक्कूने त्यांना मारहाण केली. वस्तीतील कुणाकडूनही तो वेळी अवेळी पैशांची, खाण्याची, वस्तूंची मागणी करत असे आणि जर ती पूर्ण झाली नाही तर गलिच्छ शिव्या आणि मारहाण करत असे. त्याच्या जाचाला कंटाळून किमान 10-15 कुटुंबांनी वस्ती सोडली होती.
 
अक्कूचा स्वभाव संशयी होता आणि त्याला वाटत असे की, वस्तीतील लोक त्याच्याविरोधात कटकारस्थान करत आहेत. त्यामुळे तो नेहमी त्याच्या साथीदारांसोबतच असायचा. दोन जण गप्पा मारत असतील तर त्याला वाटायचं की आपल्याच विरोधात हे कट रचत आहेत. तो महिला असो की पुरुष कुणीही वस्तीमध्ये मोकळ्या गप्पा मारताना दिसलेलं त्याला पटत नसे. इतकंच काय तो लहान मुलांना खेळू देखील द्यायचा नाही.
 
या अहवालात अक्कू यादवबद्दल एक घटना माया जांभुळकर नावाच्या महिलेनी सांगितली आहे. माया सांगतात की अक्कू आमच्या घरी आला आणि त्याने माझ्या नवऱ्याचे कपडे उतरवले आणि मला नाचायला भाग पाडलं. मी नकार दिला तर त्याने माझ्या नवऱ्याच्या मांडीला सिगरेटचे चटके दिले. आमच्या मुलीसमोरच मला नाचायला त्याने भाग पाडलं.
 
अमेरिकेतील नॉफ प्रकाशन संस्थेनी प्रकाशित केलेल्या 'हाफ द स्काय' - टर्निंग ओप्रेशन इंटू ऑपॉर्च्युनिटी फॉर वूमन वर्ल्डवाईड या पुस्तकात वस्तीतील रहिवाशांनी अक्कू यादवबद्दल सांगितलेल्या घटनांच्या काही नोंदी आहेत.
 
अक्कू यादवने एका नववधूवर बलात्कार केला होता. दुसऱ्या घटनेत केवळ दहा दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म दिलेल्या ओल्या बाळंतिणीवर त्याने आणि त्याच्या साथीदारांनी सामूहिक बलात्कार केला होता. या घटनेचा धक्का तिला इतका तीव्र बसला की स्वतःच्या अंगावर केरोसिन टाकून तिने स्वतःला पेटवले, असा उल्लेख या पुस्तकात आहे.
 
वस्तीतच राहणाऱ्या आशा भगत या महिलेची हत्या करून त्याने त्यांचे स्तन कापले होते, सर्व शरीर छिन्न-विछन्न केले होते. त्यानंतर तो कुणालाही धमकी देताना सांगायचा की, तुझी पण अवस्था मी अशीच करेन. आधी बलात्कार करून तुझे तुकडे तुकडे करीन अशी धमकी तो महिलांना द्यायचा.
 
आशा भगतच्या हत्येची माहिती पोलिसांना देण्यासाठी गल्लीतील एक दुसरा युवक तयार झाला. हा युवक त्याच्यासोबतही असायचा आणि त्याचे आशा भगतशी देखील चांगले संबंध होते. अक्कूने त्याचाही खून केला, असं 'हाफ द स्काय' पुस्तकात म्हटले आहे.
 
त्यानंतर तो तुरुंगात गेला पण काही महिन्यांनी तो तुरुंगातून जामिनावर सुटून परत आला. तुरुंगात त्याचे आणखी मोठ्या गुंडासोबत संबंध आले. त्यातून त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याची दहशत आणखी पसरत गेली. त्याच्याविरोधात कुणी तक्रार करण्यासही धजावत नसे.
 
अक्कूविरोधात ठिणगी पडली
कस्तुरबा नगरमध्ये 30 जुलै 2004 रोजी घडलेल्या घटनेनी अक्कूविरोधात ठिणगी पडली.
 
'हाफ द स्काय' या पुस्तकानुसार, अक्कूने एका तेरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि तो उषा नारायणे यांच्या शेजारी रत्ना डुंगरी यांच्याकडे पैसे मागायला आला. उषा नारायणे या तेव्हा हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स शिकत होत्या. त्या वस्तीमध्ये असलेल्या खूप कमी सुशिक्षित लोकांपैकी त्या एक होत्या. रत्नाच्या घरी सुरू असलेली गडबड त्यांनी ऐकली आणि त्यांनी रत्ना यांना म्हटले की अक्कूविरोधात पोलिसांत तक्रार दाखल कर. रत्ना पोलिसांकडे गेल्या नाही पण उषा यांनी तक्रार दाखल केली.
 
नंतर पोलिसांपैकी कुणीतरी एकाने अक्कूला सांगितलं की उषा नारायणे तक्रार घेऊन आल्या होत्या. हे ऐकून अक्कू चिडला.
 
अंदाजे 40 गुंडांसोबत तो उषा यांच्या घरी गेला. त्यांच्या घरावर जोराजोरात थाप मारू लागला आणि तुझ्या तोंडावर अॅसिड फेकतो अशी धमकी त्याने दिली. तू जर भेटली पुन्हा तर सामूहिक बलात्कार तर काहीच नाही, तुझी काय हालत करेन हे तू पाहशीनच असं ही तो बोलला.
 
उषा यांनी आपल्या किचनमध्ये असलेला गॅस सिलेंडर दरवाजाजवळ आणला आणि फटीतून नळी बाहेर सोडून सांगितले की जर तू गेला नाहीस तर मी सिलेंडर पेटवून देईन. सर्वच जण यात जळून जाऊ.
 
अक्कूविरोधात कुणीतरी आवाज उठवला हीच गोष्ट वस्तीवाल्यांसाठी नवीन होती. जर उषा हे करू शकत असेल तर आपण का नाही, असा एक विचार त्यांच्या मनात आला आणि वस्तीतील लोक घराबाहेर आले. काठ्या, दगड जे काही हातात येईल ते घेऊन ते बाहेर आले. लोकांचा संताप पाहून अक्कूने तेथून धूम ठोकली.
 
अक्कूविरोधात पोलिसांनी त्वरित कारवाई करावी यासाठी उषा नारायणे यांनी 4 ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद सुद्धा बोलवली होती.
 
अक्कू सापडत नाहीये असं पाहून वस्तीतील लोकांनी त्याचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते.
 
तो पुढील काही दिवस बेपत्ता राहिला. नंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या हवाली केले.
 
8 ऑगस्ट 2004 रोजी पहिल्यांदा त्याला कोर्टात आणलं गेलं आणि पुन्हा 13 तारखेला त्याच्या सुनावणीची तारीख देण्यात आली.
 
अक्कू यादवच्या हत्येचा दिवस
13 तारखेला अक्कू यादवची सुनावणी आहे आणि त्याला जामिन मिळणार आहे अशी बातमी सर्व वस्तीत पसरली. जर तो पुन्हा आला तर त्याची दहशत पुन्हा सुरू होईल, असा विचार वस्तीतील महिला करत होत्या.
 
त्यांना काहीही करून अक्कूला संपवायचे होते. घरातील मिरच्या कुटून त्यांनी पूड तयार केली. त्यांच्या हातात जे काही हत्यारे येतील ती त्यांनी घेतली आणि त्या कोर्टात पोहोचल्या.
 
दुपारी 2.30 वाजता अक्कू यादव नागपूरच्या न्याय मंदिर कोर्ट परिसरात पोहोचला. त्याच्या हातात बेड्या होत्या. बेडीच्या दुसऱ्या कडीत राम गेडाम नावाचा एक दुसरा संशयित आणला होता ज्याची कोर्टात त्याच दिवशी सुनावणी होती.
 
'हाफ द स्काय'मध्ये लिहिले आहे की अक्कू पोलिसांच्या व्हॅनमधून उतरला. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही पश्चातापाचे हावभाव नव्हते. घोळक्यातील एका महिलेला त्याने ओळखले आणि त्याने तिला घाणेरड्या शिव्या दिल्या. तुझ्यावर पुन्हा बलात्कार करेन, असं तो म्हणाला. त्या वेळी त्या महिलेनी तिच्या पायातील स्लीपर काढली आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या डोक्यावर मारली.
 
"एक तर आज तू माझा जीव घे नाहीतर तुझा जीव मी घेते," असं ती महिला म्हणाली. त्यानंतर सर्व महिलांनी घोळका केला आणि त्याच्या अंगावर त्या तुटून पडल्या.
 
त्याच्या रक्षणासाठी दोन पोलीस होते. त्यांना देखील काहीच समजले नाही काय होत आहे. त्यांनी कसेतरी अक्कू यादवला कोर्ट नंबर 7 या खोलीत नेले. कोर्टाच्या त्या ठिकाणी देखील त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तो गयावाया करू लागला. आता पुन्हा असं कधी करणार नाही म्हणू लागला पण कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
 
महिलांनी त्याच्या अंगावर मिरचीची पूड टाकली. त्याला मारहाण केली, चाकूने भोसकलं. इतकं त्याच्या शरीरावर एकूण 74 जखमा झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आहे. महिलांचा राग इतका अनावर झाला होता की त्याचे लिंग त्यांनी छाटून टाकले अशी नोंद 'हाफ द स्काय' या पुस्तकात आहे.
 
महिलांनी त्याच्या डोळ्यात, नाकात, तोंडात दगड आणि मिरच्या कोंबल्या होत्या, इतका त्यांचा आक्रोश होता.
 
महिलांना अटक आणि सुटका
अक्कू यादवच्या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला पाच महिलांना अटक केली. पण केवळ या पाचच महिला नाही तर आम्हालाही अटक करा असे या कस्तुरबानगरमधील महिलांनी म्हटले. किमान 200 महिलांनी सांगितले की आम्ही अक्कूला मारले. अक्कू यादवच्या हत्येची जबाबदारी घेत आम्हाला अटक करा असे महिलांनी म्हटले.
 
अक्कू यादवच्या हत्येनंतर संपूर्ण राज्यातले वातावरण ढवळून निघाले. देशात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याची दखल घेतली.
 
कायदा हातात घेतल्यामुळे अनेकांनी या गोष्टींचा निषेध केला तर अक्कू यादवला मारण्यावाचून, कायदा हातात घेण्यावाचून कुठलाही पर्याय उरला नव्हता असा एक सूर निघाला.
 
निवृत्त न्यायाधीश भाऊ वहाने यांनी महिलांची बाजू घेतली.
 
"महिला ज्या परिस्थितीतून गेल्या ती पाहता अक्कूला संपवण्याशिवाय त्यांच्याकडे कुठलाच पर्याय शिल्लक नव्हता. महिलांनी सातत्याने पोलिसांकडे आपल्या रक्षणाची मागणी केली पण पोलीस त्यांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले," असे न्या. भाऊ वहाने यांनी द गार्डियन या वृत्तापत्राला सांगितले होते.
 
कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व्ही. चंद्रा या देखील या महिलांच्या मदतीला धावल्या आणि ही हत्या नसून न्यायच आहे असं त्या म्हणाल्या. NDTV साठी ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांनी एक रिपोर्ट केला होता.
 
या रिपोर्टमध्ये व्ही. चंद्रा म्हणतात की, "जो गुंडा रात्रंदिवस लोकांना लुटत असे, महिलांवर बलात्कार करत असे, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध अशांवर तो चाकुसुऱ्याने हल्ला करत असे, 14 वर्षांच्या मुलीपासून ते सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेवर जो बलात्कार करत असे, त्याचा अन्याय जेव्हा लोकांनी 10 वर्षं सहन केला, तेव्हा लोकांनी हे पाऊल उचलले. न्यायव्यवस्था, प्रशासन आणि पुरुषप्रधान समाजाची व्यवस्था रसातळाला गेली आणि त्या विरोधात कस्तुरबा नगरच्या लोकांनी आपल्या आत्मसंरक्षणासाठी केलेलं हे कृत्य आहे," असं चंद्रा सांगतात.
 
पुढे व्ही. चंद्रा सांगतात, "जर शिक्षा द्यायची असेल तर आम्हाला सर्वांना द्या, असं कस्तुरबा नगरच्या महिलांचा निर्णय आहे. या गोष्टीची जबाबदारी घेण्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत असा महिलांचा निर्णय आहे."
 
सर्व आरोपींची निर्दोष सुटका
2004 पासून 2014 पर्यंत अक्कू यादवच्या हत्येचा खटला चालला. अक्कू यादवच्या हत्येतील 21 जणांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावेळी कोर्टाने निरीक्षण मांडलं की संशयितांचा या प्रकरणात असलेला सहभाग निर्विवादित नाही. हे देखील स्पष्ट होत नाहीयेे की या प्रकरणातील साक्षीदारांनी खरंच काही पाहिले आहे की नाही.
 
न्यायालयाने म्हटले की जे पोलीस अक्कू यादवच्या सोबत त्या दिवशी होते त्यांच्या कपड्यांवर रक्ताचा एकही थेंब नव्हता. त्या पोलिसांवरच सध्या आपली ड्युटी सोडून गेल्याबद्दल विभागीय चौकशी सुरू आहे. तेव्हा साक्षीदारांच्या जबाबांवर कसा विश्वास ठेवणार असं न्यायालयाने म्हटलं होतं.
 
सर्वांची निर्दोष सुटका झाल्यानंतर कस्तुरबा नगरमध्ये उत्सवाचेच वातावरण होते.
 
अक्कू यादव का तयार होतात?
अक्कू यादवने काय केलं आणि त्याचा अंत कसा झाला हे आपण समजून घेतलं पण एक गोष्ट मनात येत राहते की हे असं का घडलं असेल. तो घडला कसा असेल, त्याला कायद्याची भीती वाटली नसेल का असे अनेक प्रश्न येतात.
 
नागपूरमध्ये त्या काळात गुन्ह्याचे प्रमाण कसे वाढले होते याबद्दल लेखक आणि मुक्त पत्रकार जयदीप हार्डिकर सांगतात, की "नागपूरमध्ये त्या काळात दोन प्रक्रिया होत होत्या. की मध्य प्रदेश, छत्तीसगड या भागातून लोक येऊन वास्तव्य करत.
 
"नागपूरमध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली होती पण मोठ्या गिरण्या बंद झाल्या होत्या. शहरात उत्पन्नाचे रोजगाराचे साधन नव्हते. तेव्हा नागपूरची ओळख फक्त एक संथ आणि निवृत्त लोकांचे शहर अशीच होती. कस्तुरबा नगर ही दलित वस्ती आहे आणि बहुतांश महिला या घरकाम करून आपला उदरनिर्वाह करत. शहराच्या 'अंडरबेली'मध्ये ज्या अनेक गोष्टी होतात त्यापैकी ही एक गोष्ट होती."
 
"या घटनेला मी न्यायव्यवस्थेचं अपयश असं म्हणूनच पाहतो. या घटनेनंतर अनेक अभ्यास झाले आहेत त्यातही हेच दिसून आलं आहे की गुन्हेगार का घडतो. जर त्याच्याविरोधात ज्या तक्रारी येत होत्या त्याकडे जर लक्ष दिलं असतं तर कदाचित हे घडलं नसतं. पण ज्या लोकांकडून ही तक्रार येत असे तो समुदाय पारंपरिक समाज व्यवस्थेनुसार शोषितच होता. त्यामुळे पोलिसांनीही त्यावर काही केलं नाही. हे केवळ नागपूरच नाही तर सर्व शहरांमध्ये असं होत असतं. त्यानंतरही गुंडाला ठेचून मारण्याच्या घटना नागपूर शहरात घडल्या," हार्डीकर सांगतात.
 
नागपुरात आतापर्यंत गुंडांना जमावाकडून ठेचून मारण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नईम, फहीम, शेख इक्बाल, आशिष देशपांडे, विजय वागधरे यांच्या हत्या नागपुरात झाल्या होत्या.
 
राज्यघटनेच्या चौकटीतच प्रश्नाचे उत्तर शोधायला हवे
अक्कू यादवची हत्या ही महिलांनी त्यांच्या अन्यायाविरोधात पेटून उठून केली होती असं जरी असलं तरी न्याय हा राज्यघटनेच्या चौकटीतच मिळायला हवा असं ज्येष्ठ पत्रकार आणि इंडिया न्यूजचे सल्लागार संपादक मनीष अवस्थी यांना वाटतं.
 
मनीष अवस्थी हे 2004 मध्ये आज तकचे प्रतिनिधी होते आणि अक्कू यादवच्या हत्येनंतर काही मिनिटांतच ते न्यायालय परिसरात वार्तांकनासाठी पोहोचले होते. ते या प्रसंगाबद्दल सांगतात, "मला एक बातमी आली की जिल्हा न्यायालयात महिलांनी आणि मुलांनी मिळून एका आरोपीला चाकू-सुऱ्यांनी भोसकून मारले. मी तात्काळ तिथे पोहोचलो आणि नेमकं हे कुठल्या कोर्टात झालं हे शोधलं. न्यायालयातल्या त्या खोलीत छिन्नविछिन्न अवस्थेत अक्कू यादवचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसत होता आणि अनेक महिला त्या परिसरात दिसत होत्या."
 
"ज्या ठिकाणी अक्कू यादवच्या जाचातून सुटका होऊन न्याय मिळावा यासाठी जिथं महिलांनी याचना केली, त्याच व्यवस्थेच्या न्यायालयातच अक्कूची हत्या करण्यात आली. आपल्या याचनेला, विनंतीला सातत्याने केराची टोपली मिळत आहे असं दिसल्यानंतर या महिलांनी हे कृत्य केलं. या घटनेनंतर मी या भागातील अनेक महिलांशी बोललो तेव्हा त्यांनी अक्कू यादवच्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला होता आणि त्याचे संपणे हे महत्त्वाचे आहे असं म्हटले होते.
 
"ही खूप वर्षांपूर्वीची घटना आहे. त्यानंतर देशात फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना झाली आहे. महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटनांची सुनावणी जलद व्हावी यासाठी ही घटना डोळे उघडणारी ठरली असं म्हणावे लागेल. असं असलं तरी देशात कुणीही कायदा हातात घेता कामा नये. जगातील अनेक राष्ट्रांमध्ये उठून दिसेल इतके संविधान ( राज्यघटना) आपल्याला मिळाली आहे. तेव्हा राज्यघटनेच्या चौकटीतच सामाजिक प्रश्नांचे उत्तर शोधायला हवे," असं अवस्थी सांगतात.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक : ऋतुजा लटके विजयी, विजयानंतर बोलताना म्हटलं...