Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट

माझ्या डोळ्यांसमोर भावाचा तडफडून मृत्यू झाला', तामिळनाडूत विषारी दारुचे 47 बळी-ग्राउंड रिपोर्ट
, शुक्रवार, 21 जून 2024 (21:20 IST)
कल्लाकुरिची मधील स्थानिक न्यायालयाच्या मागच्याच बाजूस असलेल्या करुणापुरम या परिसरात आल्यावर आपल्याला फक्त मृत पावलेल्यांच्या शोकाकुल नातेवाईकांचा टाहो ऐकू येतो.
 
"माझ्या डोळ्यादेखत माझा मोठा भाऊ तडफडत मृत्यू पावला," असं मणी रडत सांगतात.
 
त्यांचा भाऊ सुरेश हा कल्लाकुरिचीमध्ये विषारी दारू प्यायल्यानंतरचा पहिला बळी ठरला होता.
 
"माझा भाऊ सुरेश या निकृष्ट प्रतीच्या दारूचा पहिला बळी होता. माझ्या डोळ्यादेखत तो तडफडत मरण पावला. सुरूवातीला त्यानं मला सांगितलं की त्याचा हात दुखतो आहे आणि नंतर त्याचा हात सुन्न पडला.
 
त्यानंतर त्याच्या पोटात प्रचंड दुखू लागल्यानं तो ओरडू लागला. तेव्हा मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी प्रयत्न करूनसुद्धा तो वाचू शकला नाही. मृत्यूपूर्वी त्याचं पोट फुगलं होतं आणि अखेर तो मरण पावला."
"निकृष्ट प्रतीची दारू प्यायल्यानंतर काय होतं याच्या धक्क्यातून मी अजूनही सावरलेलो नाही,"
 
असं सांगताना मणीच्या आवाजात वेदना होती.
 
मणीप्रमाणेच कल्लाकुरिची जोगियर रस्ता आणि करुणापुरम गावच्या परिसरातील अनेकांनी त्यांचे प्रियजन गमावले आहेत. काही कुटुंबामध्ये तर आई-वडील दोघांचाही मृत्यू झाला आहे. तर काही प्रकरणांमध्ये या बेकायदेशीर दारूमुळे काहींच्या कुटुंबातील एकमेव कर्ता माणूस गेला आहे.
 
नेमकं काय घडलं?
मृतांच्या नातेवाईकांनी सांगितलं की बेकायदेशीररित्या बनवलेली देशी दारू प्यायल्यामुळं कल्लाकुरिचीजवळील करुणापुरममधील 4 जणांचा बुधवारी (19 जून) मृत्यू झाला.
 
नातेवाईकांनी बीबीसीला सांगितलं की खासगी हॉस्पिटलमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्या सर्वांनी सोमवारी (17 जून) संध्याकाळी या निकृष्ट दारूचं सेवन केलं होतं.
 
बुधवारी मध्यान्ही करुणापुरम आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील गावं अशा चार गावांमधील बनावट दारू प्यायलेले अनेकजण कल्लाकुरिची सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गर्दी करू लागले. या सर्वांना प्रचंड जुलाब (डायरिया) आणि हात-पाय सुन्न होण्याचा त्रास होत होता.
 
या हॉस्पिटलमध्ये एकाचवेळी 20 पेक्षा जास्त अॅम्ब्युलन्स आल्या होत्या. त्यामध्ये या निकृष्ट दारूला बळी पडलेले लोक होते.
 
त्यातील काहीजणांना सलेम, पुदुचेरी आणि विल्लीपुरम सारख्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. कारण कल्लाकुरिचीमधील हॉस्पिटलमध्ये बनावट दारू प्यायलेल्या रुग्णांची प्रचंड गर्दी झाली होती.
 
दारूमध्ये मिथेनॉलची भेसळ करण्यात आल्यामुळे दारू पिणाऱ्यांवर ही परिस्थिती ओढवल्याचं नंतर समोर आलं होतं.
 
मिथेनॉल हे एकप्रकारचं रसायन असतं आणि ते फक्त औद्योगिक कामासाठीच वापरलं जातं. मात्र काहीवेळा स्थानिक मद्यविक्रेते उद्योगांकडून बेकायदेशीरपणे मिथेनॉलची खरेदी करतात आणि त्याचा वापर दारू बनवण्यासाठी करतात. याच प्रकारच्या दारूमुळे अनेकांचा जीव गेला होता.
 
बेकायदेशीररित्या दारू बनवून विकणारे अनेकदा दारूमध्ये मिथेनॉलची भेसळ करतात. दारूची तीव्रता वाढवण्यासाठी मिथेनॉलची भेसळ केली जाते. मिथेनॉल हा अल्कोहोलचा अत्यंत विषारी प्रकार आहे. कधीकधी त्याचा वापर अॅंटी-फ्रीझ घटकाच्या स्वरुपात म्हणजे दारू घट्ट होऊ नये म्हणून करतात.
 
मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन असल्यामुळं अगदी छोट्या प्रमाणात जरी त्याचं सेवन झालं तरी त्यामुळे आंधळेपणा, यकृताला अपाय होणं आणि मृत्यू होणं यासारखे परिणाम होऊ शकतात.
शोकाकुल कुटुंबं
कल्लाकुरिचीमध्ये बनावट दारू प्यायल्यामुळं 47 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं फक्त कल्लाकुरिचीच नव्हे तर संपूर्ण तामिळनाडू राज्य हादरलं आहे.
 
ज्या लोकांवर हे संकट कोसळलं आहे त्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी बीबीसीनं प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली.
 
आमची बीबीसीची टीम जेव्हा करुणापुरम गावात पोहोचली तेव्हा आम्हाला दिसलं की, रस्त्यावर शीतपेट्यांमध्ये मृतदेह शेजारी-शेजारी ठेवलेले होते.
 
त्या रस्त्यावरील जवळपास प्रत्येक घरासमोर ताडपत्रीचं तात्पुरतं एक छत तयार करण्यात आलं होतं. त्याखाली शीतपेट्यांमध्ये त्यांच्या प्रियजनांचे मृतदेह ठेवण्यात आले होते. आपल्या नातेवाईकाच्या मृत्यूची बातमी ऐकून तिथे आलेल्या अनेकजणांचा गोंधळ होत होता की नेमकं कुठे जावं. कारण त्या एकाच रस्त्यावर राहणाऱ्या अनेकांचा बनावट दारू प्यायल्यामुळं मृत्यू झाला होता.
 
एकाच कुटुंबातील पती आणि पत्नीचा मृत्यू
दोन शालेय विद्यार्थी आम्हाला रडताना दिसले. सर्व रस्ताभरच लोक रडत होते, शोक करत होते. तरीदेखील त्या मुलांचा आवाज तिथे असणाऱ्यांच्या काळजाच्या आरपार जात होता.
 
यातील एक 10 वी ची विद्यार्थिनी होती. रडत रडत तिनं सांगितलं की, तिची आई वादिवुकरसी आणि तिचे अपंग वडील सुरेश या दोघांचाही ती भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे मृत्यू झाला आहे.
 
"आता काय करायचं हे आम्हाला माहित नाही. मला एक मोठी बहीण आहे. तीसुद्धा 11 वीत शिकते. आमच्या आईवडीलांशिवाय आम्ही काय करणार आहोत हे मला माहित नाही."
त्यांच्या घराजवळ कंदनचा देखील मृत्यू झाला होता. त्याच्या म्हाताऱ्या आईशी याबद्दल बोलल्यावर त्या म्हणाल्या, "कंदनला दोन मुलं आहेत. मी आता काय करायचं? कंदन रोजंदारीवर मजुरी करून त्याच्या कुटुंबाचं पोट भरत होता. या वयात मी आता कामावर कसं जाणार," अशी व्यथा त्यांनी मांडली.
 
करुणापुरम गावच्या जवळपास सर्वच घरांमध्ये असाच उद्वेग आणि वेदना होती.
 
मोठ्या संख्येनं मृत्यू झाल्यामुळे तिथे मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेट्यांना मोठी मागणी होती. त्यामुळे काही घरांना मृतदेह ठेवण्यासाठी शीतपेटी मिळू शकली नाही. म्हणून त्यांनी त्यांच्या घरासमोर एका लाकडी खाटेवरच मृतदेह ठेवले होते.
 
बनावट दारू चोवीस तास उपलब्ध
तिथे जमलेल्या अनेक महिलांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं, ज्याप्रमाणे घरोघर तांदूळ मिळावा तशी ही बनावट दारू इथं चोवीस तास उपलब्ध असते.
 
इतर सर्वसाधारण वस्तूंप्रमाणे ही दारू ऑटोरिक्षा आणि दुचाकींवरून विकली जाते. या परिसरातील लोक सांगतात की पुरुष आणि महिला दोघेही ही बनावट दारू विकत घेतात आणि पितात.
 
करुणापुरमच्या लोकांचा पोलिसांवर आरोप आहे की अनेकवेळा तक्रार दाखल करूनसुद्धा त्यांनी यावर कोणतीही कडक कारवाई केली नाही. बनावट दारूमुळे ही शोकांतिका घडल्यानंतर तामिळनाडू सरकारनं कल्लाकुरिची जिल्ह्याच्या पोलिस अधिक्षकांसह 10 इतर पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर जिल्हाधिकाऱ्यांची सुद्धा तत्काळ बदली करण्यात आली.
 
बीबीसीनं प्रत्यक्ष घटनास्थळी तपास केल्यानंतर असं आढळलं आलं की करुणापुरम परिसरात राहणारे दोन जण मागील अनेक वर्षांपासून नियमितपणे ही बनावट दारू विकत आहेत.
 
मजुरांची बहुसंख्या
या परिसरात राहणारे बहुतांश लोक आदिवासी आणि अनुसूचित वर्गातील आहेत. यातील अनेकजण रोजंदारीवर काम करतात. यात बाजारात गोण्या किंवा इतर सामान उचलण्यासारखी कामं असतात.
 
हे मजूर सकाळी कामावर जाताना आणि कामावरून घरी परतताना वर उल्लेख केलेल्या दोन दारू विक्रेत्यांकडून दारू विकत घेतात आणि पितात. त्यांच्या घराजवळच दारू उपलब्ध असल्यामुळे ती विकली जाते.
याबरोबरच, राज्य सरकारद्वारे संचालित सरकारी दारू दुकान त्या परिसरात असताना तेही बनावट दारू का विकत घेतात आणि पितात, याचं उत्तर देखील या परिसरातील लोक देतात.
 
"जर तुम्हाला सरकारी दारू दुकानात मिळणारी दारू प्यायची असेल त्यासाठी 150 रुपये मोजावे लागतात. मात्र या बनावट दारूच्या एका बाटलीसाठी फक्त 50 रुपयेच लागतात. या लोकांना रोजच्या मजूरीतून 300 ते 500 रुपये मिळतात. त्यामुळे हे लोक ही बनावट दारूच विकत घेऊ शकतात," असं स्थानिकांनी सांगितलं.
 
प्रकरणाचा तपास
बनावट दारू प्यायल्यामुळं 47 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणाचा तपास CBCID (क्राईन ब्रॅंच, क्राईम इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंट) कडे देण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यत 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका महिलेचाही समावेश आहे. ही महिला दारू विक्रेत्याची पत्नी आहे.
 
तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मृतांसाठी 10 लाख आणि जे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
 
त्याचबरोबर तामिळनाडू सरकारनं बेकायदेशीररित्या चालणारा दारूचा धंदा आणि ही दारू प्यायल्यामुळे झालेल्या मृत्यूंचा तपास करण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे आदेश सुद्धा दिले आहेत. यासाठी एकसदस्यीय आयोगाची नियुक्ती करण्यात आली असून या आयोगानं आजपासून त्यासंदर्भातील कामदेखील सुरू केलं आहे.
 
मागील वर्षी विल्लुपुरम इथं झालेल्या याच प्रकारच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला होता. एडीएमके, भाजपा, पीएमके सह विरोधी पक्षांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
 
बनावट, निकृष्ट दारूच्या विक्रीस आळा घालण्यात तामिळनाडू सरकारला आलेल्या अपयशाविरोधात विरोधी पक्षांनी निदर्शनं करणार असल्याचं म्हटलं आहे.
 
विरोधी पक्षनेते एडापडी पलानीस्वामी यांनी आरोप केला आहे की, "कल्लाकुरिची शोकांतिकेमुळे तामिळनाडू राज्य 1980 च्या दशकापर्यत मागे गेलं आहे."
 
एडीएमके पक्षानं देखील हे प्रकरण न्यायालयात नेलं आहे आणि सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
 
तामिळनाडूतील कल्लाकुरिचीमध्ये बेकायदेशीर दारू प्यायल्यानं झालेल्या मृत्यूंसंदर्भात सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी ऐकल्यानंतर मद्रास उच्च न्यायालयानं त्यावर टिप्पणी केली आहे. न्यायालयानं म्हटलं आहे की बेकायदेशीर दारूची विक्री आणि त्याचं सेवन हा मुद्दा राज्य सरकार हलक्या स्वरुपात घेऊ शकत नाही. कारण या गोष्टीचा लोकांच्या आयुष्यावर परिणाम होत असतो.
 
तामिळनाडू भाजपानं या घटनेला राज्य सरकारचं अपयश ठरवत, 22 जूनला राज्यव्यापी निदर्शनं पुकारली आहेत.
 
तामिळनाडू विधानसभा अधिवेशनात आज विरोधी पक्षांनी सदनात हा मुद्दा उचलून धरल्यानं गदारोळ झाला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी एडीएमके पक्षाच्या आमदारांना बाहेर काढलं आणि विधानसभा अध्यक्षांनी त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं. नंतर मुख्यमंत्री स्टालिन यांनी विधानसभा अध्यक्षांना हे निलंबन रद्द करण्याची विनंती केल्यानंतर हा आदेश मागे घेण्यात आला.
मिथेनॉल शरीरात गेल्यावर काय होतं
मिथेनॉल हे एक अतिशय विषारी औद्योगिक रसायन आहे. मिथेनॉल पोटात गेल्यानंतर त्याचे गंभीर परिणाम उद्भवतात. चेन्नईतील डॉ. जयरामन हे नामवंत फुफ्फुस तज्ज्ञ (pulmonary specialist) आहे.
 
मानवी शरीरात मिथेनॉल गेल्यानंतर होणाऱ्या गंभीर परिणामांबद्दल सांगतात. इथेनॉल हा अल्कोहोलचा सुरक्षित प्रकार असतो आणि त्याचा वापर अनेक नियमन केल्या जाणाऱ्या पेयांमध्ये केला जातो. त्याउलट मिथेनॉल हे अत्यंत घातक असतं.
 
मिथेनॉलचा मानवी शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर विपरित परिणाम होतो. मिथेनॉल शरीरात गेल्यानंतर त्याचा पाचन मार्गावर आणि चेतासंस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होतो. सुरूवातीला पोटात तीव्र वेदना होणं, उलटी होणं, उलटी होताना अनेकदा फेस येणं ही लक्षणं दिसतात.
 
यामुळे मिथेनॉल फुफ्फुसात जाऊ शकतं आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा येऊ शकतो आणि त्यातून अधिक घातक परिणाम होऊ शकतात. याशिवाय मिथेनॉल शरीरातील फॉर्मल्डीहाइड आणि फॉर्मिक अॅसिड या रसायनांच्या संपर्कात येतं.
 
त्यातून शरीरातील अॅसिडचं प्रमाण (metabolic acidosis) प्रचंड वाढतं, दृष्टीमध्ये अडथळे निर्माण होतात आणि शरीरातील मध्यवर्ती चेतासंस्थेसह मेंदूचं कधीही भरून न निघणारं नुकसान होतं.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुजय विखेंनी EVM, VVPAT च्या पडताळणीची मागणी का केली? ही प्रक्रिया काय असते?