Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नादिया व्हिटोम: ब्रिटनच्या लेबर पार्टीची खासदार, जी ख्रिसमसपूर्वी नोकरीसाठी वणवण फिरत होती

नादिया व्हिटोम: ब्रिटनच्या लेबर पार्टीची खासदार, जी ख्रिसमसपूर्वी नोकरीसाठी वणवण फिरत होती
, शनिवार, 28 डिसेंबर 2019 (13:08 IST)
कुठलंही छोटं-मोठं काम मिळावं, यासाठी वणवण करणाऱ्या व्यक्तीला अचानक काहीतरी मोठं पदरी पडल्यावर जे वाटेल त्याच भावना आहेत ब्रिटनच्या नादिया व्हिटोम यांच्या.
 
23 वर्षांच्या नादिया यांनी ब्रिटनमध्ये नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नॉटिंघम ईस्ट मतदारसंघातून 17,393 मतांनी विजय मिळवला.
 
मात्र, खासदारपदी विराजमान झालेल्या याच नादिया ख्रिसमस आधी छोटी-मोठी नोकरी मिळवण्यासाठी वणवण फिरत होत्या.
 
क्रिस लेस्झली यांनी लेबर पक्षाला रामराम ठोकून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पक्षाने नादिया यांना उमेदवारी दिली. खासदारकीच्या आपल्या वेतनातील मोठा वाटा स्थानिक सामाजिक कामांसाठी देणार असल्याचं नादिया यांनी सांगितलं आहे.
 
निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर ज्या वेगाने घडामोडी घडल्या त्याने आपण आश्चर्यचकित झाल्याचं नादिया सांगतात. त्या म्हणाल्या, "काही महिन्यांपूर्वी मी ख्रिसमसच्या काळात तात्पुरत्या नोकरीसाठी अर्ज करत होते, तेव्हा मला वाटलंही नव्हतं की ख्रिसमसपर्यंत मी खासदार होईन आणि मला नोकरीची गरज उरणार नाही."
 
नादिया यांना त्यांच्या आईने एकटीने मोठं केलं. 2013 मध्ये आपण पहिल्यांदा राजकारणात सक्रीय सहभागी झाल्याचं त्या सांगतात. "सरकारने लावलेल्या बेडरूम टॅक्समुळे मी राजकारणाकडे ओढले गेले."
 
"मी द मिडोजमध्ये राहायचे. अजूनही तिथेच राहते आणि त्यावेळी सरकारने उचललेल्या काटकसर धोरणांचा (austerity measures) आम्हाला थेट फटका बसत होता. रोजचं अन्न मिळवण्यासाठी माझ्या शेजाऱ्यांना, मित्रांना, कुटुंबीयांना किती त्रास व्हायचा, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. यातूनच मला प्रेरणा मिळाली मी टोरी सरकारच्या विरोधातील लढ्यात सहभागी झाले."
 
नादिया यांनी द्वेषातून घडणाऱ्या गुन्हेगारी अर्थात Hate Crimes विरोधातही काम केलं आहे.
 
ब्रिटनमध्ये खासदाराला 79,468 युरो इतका भत्ता मिळतो. यातला मोठा वाटा आपण समाजाला परत करणार असल्याचं नादिया यांनी सांगितलं आहे.
 
त्या म्हणतात, "नॅशनल स्टॅटिस्टिकने 35,000 युरो एवढं सरासरी कामगार वेतन ठरवलेलं आहे. तेवढाच पगार घेणार असल्याचं वचन मी दिलं आहे.
 
"उरलेलं वेतन मी स्थानिक कामांसाठी देणार आहे. त्यात चॅरिटी, संपासाठी निधी आणि काटकसर धोरणामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांसाठी मी हे वेतन खर्च करणार आहे."
 
लेबर पक्षाच्या जाहीरनाम्याचं त्या समर्थन करतात. मात्र, जेरेमी कॉर्बिन यांच्याऐवजी कुणाला पक्षाध्यक्ष करावं, याविषयावर त्यांनी कुठलंही मत व्यक्त केलेलं नाही. निवडणुकीत लेबर पक्षाच्या पराभवानंतर जेरेमी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
नादिया म्हणतात, "आम्ही अतिडावे आहोत म्हणून आम्ही निवडणूक हरलो, हे खरं नाही. निवडणुकीत ब्रेक्झीटचा असलेला वरचष्मा यामुळे पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला."
 
"मला वाटतं आमच्या पक्षात उत्तम नेतृत्त्व गुण असलेले अनेक खासदार आहेत. अध्यक्षपदासाठी कोण उभं राहणार, याची मला अजूनतरी कुठलीही कल्पना नाही."
 
सर्वांत तरुण खासदार
23 वर्षांच्या नादिया ब्रिटनच्या संसदेतील सर्वात तरुण खासदार आहेत.
 
ब्रिटनमध्ये सर्वांत तरुण खासदाराला 'Baby of the House' म्हणतात. या उलट सर्वांत ज्येष्ठ खासदाराला Father of the House म्हणून संबोधलं जातं.
यापूर्वी जो स्वीनसन, डेव्हिड लॅमी, स्टिफन डोरेल आणि चार्ल्स केनेडी यांना ही उपाधी मिळाली आहे.
मात्र Father of the House किंवा Baby of the House ही उपाधी असणाऱ्या खासदारांना कोणतेही विशेषाधिकार किंवा कर्तव्यं नसतात.
ख्रिस लेस्ली यांनी पक्ष सोडल्यामुळे नादिया यांना लेबर पक्षाने उमेदवारी दिली. त्याच ख्रिस लेस्ली 1997 साली शिप्लेमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांनाही ही उपाधी मिळाली होती.
SNP पक्षाच्या म्हाईरी ब्लॅक ब्रिटनच्या संसद इतिहासातील आजपर्यंतच्या सर्वात तरुण खासदार ठरल्या आहेत. 2015 साली वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्या खासदार झाल्या होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

येत्या काही दिवसांमध्ये उत्तर भारतात पसरणार थंडीची लाट