"आतापर्यंत मॅच फिक्सिंगचा काळ खूप चालला. पण, आता मात्र सर्वसामान्यांना न्याय मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चार्ज काढण्यासाठी मी प्रदेशाध्यक्षपदाचा चार्ज घेतला आहे," असा टोला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला लगावला. ते नागपुरात एका सभेत बोलत होते.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आहेत. ते केंद्र सरकार तसंच भाजपवर वेळोवेळी सडकून टीका करताना दिसत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी बॉलिवूड कलाकारांवरसुद्धा निशाणा साधला होता.
दरम्यान, नाना पटोले यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यावरही जोरदार टीका केली. "नितीन गडकरी यांनी एक बंदर स्वस्तात विकलं. सध्या देशात फास्टटॅग सुरू करण्यात आलं आहे. या प्रक्रियेतही मोठा भ्रष्टाचार आहे. या विषयावरही आपण दोन-तीन दिवसांत बोलू," असंही नाना पटोले म्हणाले.