नरेंद्र मोदी: 'भारताच्या भूमीवर नजर असलेल्यांना धडा शिकवला गेला '

सोमवार, 29 जून 2020 (13:29 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये भारत-चीन यांच्यामधील तणावावर भाष्य केले. लडाखमध्ये भारताच्या भूमीवर नजर असलेल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असं त्यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितलं.
 
ते म्हणाले, भारताविरोधात कोणतंही पाऊल उचललेलं खपवून घेतलं जाणार नाही हे भारताच्या वीर सैनिकांनी दाखवून दिलं आहे. आमच्या वीर जवानांच्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दाखवलेले धैर्य हीच आमची ताकद आहे.
 
भारत मैत्रीसंबंध जोपासतो तसं भारताला जशास तसे उत्तरही देता येतं. भारतमातेच्या प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही, हे आपल्या वीर जवानांनी दाखवून दिलं आहे.
मोदी म्हणाले, "इतक्या संकटांच्या काळातही शेजारील देशांकडून ज्या हालचाली होत आहेत, त्याच्याशीही आपला देश लढत आहे. भारत नव्याने झेप घेईल. मला या देशाच्या लोकांवर विश्वास आहे. भारतानं ज्याप्रकारे संकटकाळात जगाला मदत केली आहे, त्यामुळे भारताची भूमिका सर्वांना मान्य आहे. ''
 
मोदी म्हणाले, लडाखमध्ये आपल्या ज्या वीर जवानांना हौतात्म्य आले आहे, त्यांच्या शौर्यासमोर संपूर्ण देशभरातले लोक नतमस्तक झाले आहेत. श्रद्धांजली वाहात आहेत. सर्व देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रमाणे सर्व भारतीयांना त्यांच्या जाण्याने दुःख झाले आहे. आपल्या वीर जवानांच्या बलिदानाप्रती त्यांच्या कुटुंबीयांमध्ये जसा गर्व आहे तीच भावना देशामध्ये आहे. हीच तर देशाची ताकद आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्ष ताबारेषेवर चिनी सैन्याशी झालेल्या झटापटीत 20 जवानांचा मृत्यू होण्याबद्दल सांगितले, ज्यांच्या मुलांना हौतात्म्य आले ते आई-वडील आपल्या दुसऱ्या मुलांना, घरातल्या इतर मुलांना सैन्यात पाठवण्याची भाषा करत आहेत.
 
बिहारमध्ये राहाणऱ्या आणि या झटापटीत हौतात्म्य आलेल्या कुंदन कुमार यांच्या वडिलांचे शब्द अजूनही कानात आहेत. ते म्हणाले, आपल्या नातवालाही देशाच्या रक्षणासाठी सैन्यात पाठवू. हेच धैर्य प्रत्येक हुतात्मा जवानांच्या परिवारानं दाखवलं आहे. या कुटुंबांनी केलेला त्याग पूजनीय आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख कोरोना तेलंगाणा: 9 रुग्णालयांनी भरती करण्यास नकार दिल्यानंतर महिलेचा मृत्यू