पंतप्रधान मोदी यांची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केल्याने प्रसिद्ध संगीतकार इलैयाराजा चर्चेत आहेत. एका पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांनी हे म्हटलं आहे.
प्रस्तावनेत इलैयाराजा यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. अनेक द्रविडपंथीय आणि दलित संघटनांनी इलैयाराजा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
इलैयाराजा स्वत:च दलित आहेत हे लक्षात घेणं आवश्यक आहे. पण त्यांनी बहुतांशवेळा ही ओळख दूर ठेवली आहे. इलैयाराजा यांचे वडील कम्युनिस्ट विचारधारेचे अनुयायी असलेले गायक होते.
इलियाराजा काय म्हणाले?
'आंबेडकर अँड मोदी- रिफॉमर्स आयडियाज परफॉर्मर्स इंप्लीमेंटेशन' या पुस्तकाला इलैयाराजा यांनी दोन पानी प्रस्तावना लिहिली आहे. ब्ल्यूक्राफ्ट डिजिटल फाऊंडेशन या संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. डॉ. आंबेडकरांच्या जन्मदिनाच्या औचित्याने 14 एप्रिलला हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं.
इलैयाराजा यांनी डॉ. आंबेडकर आणि पंतप्रधान मोदी यांची एकमेकांशी तुलना केली आहे. त्यांनी दोघांचंही भरभरून कौतुक केलं आहे.
भेदभावाविरुद्धच्या लढाईत डॉ. आंबेडकर यांची प्रज्ञा आणि त्यांनी केलेला संघर्ष याचं इलैयाराजा यांनी प्रशंसा केली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या कार्याची महती आपण सारे जाणतो. राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीयांना महत्त्वपूर्ण अधिकार मिळवून दिले असं इलैयाराजा म्हणाले.
पण डॉ. आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकाळात इतिहास घडवला. असंख्य दशकांनंतरही डॉ. आंबेडकर यांचं साहित्य आजही वाचलं जातं. त्यांच्या विचारांचं पालन करणारे लाखो अनुयायी आहेत.
यापुढे इलैयाराजा म्हणतात, पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकरांसंदर्भात अनेक गोष्टी समजल्या.
"काही वर्षांपूर्वी मी बातम्यांमध्ये वाचलं की पंतप्रधान मोदी यांनी डॉ. आंबेडकरांना देशाच्या पाणी आणि सिंचन व्यवस्थेचं शिल्पकार म्हटल्याचं वाचलं होतं. पाणी आणि सिंचन क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या संस्थांच्या उभारणीत डॉ. आंबेडकरांचं इतकं मोठं योगदान आहे हे मला तेव्हा कळलं. 2016 इन्व्हेस्टमेंट समिट या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या भाषणात डॉ. आंबेडकरांच्या या योगदानाबद्दल तपशीलवार सांगितलं होतं", असं इलैयाराजा यांनी लिहिलं आहे.
ते पुढे लिहितात, "सामाजिकदृष्ट्या वंचित आणि उपेक्षित वर्गाला पंतप्रधान मोदी सरकारने कायदेशीर सुरक्षा मिळवून देतानाच ठोस चौकट निर्माण केली. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या ओबीसी कमिशनच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतला".
ट्रिपल तलाकसारखी वादग्रस्त पद्धत रद्द केल्याप्रकरणी इलैयाराजा यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक केलं आहे. डॉ. आंबेडकरांना पंतप्रधान मोदींचा अभिमान वाटला असता असंही इलैयाराजा यांनी म्हटलं आहे.
ट्रिपल तलाकवर बंदी तसंच बेटी बचाओ बेटी पढाओ या महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण भूमिकांमुळे सामाजिक बदल घडून येत आहे. डॉ. आंबेडकरांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्याचा गौरवच केला असता असं इलैयाराजा यांनी लिहिलं आहे.
राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया
डॉ.आंबेडकर आणि पंतप्रधान मोदी यांची तुलना केल्याने तामिळनाडूत वादाची राळ उडाली आहे. भाजप आणि सहकारी पक्षांनी इलैयाराजा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी द्रविडपंथीय आणि दलित संघटनांनी इलैयाराजा यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं आहे.
'एव्हिडन्स' या स्वयंसेवी संस्थेचे कथीर यांनी बीबीसी तामीळ सेवेशी बोलताना सांगितलं की, "पंतप्रधान मोदी माझे आवडते नेते आहेत, असं इलैयाराजा म्हणाले असते तर काही हरकत नव्हती. डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी संघर्ष केला. पंतप्रधान मोदी यांचे विचार डॉ. आंबेडकरांच्या विचारांच्या परस्परविरुद्ध आहेत. मोदींची तुलना डॉ. आंबेडकरांशी करणं कसं रास्त ठरू शकतं"? असा सवाल त्यांनी केला.
"इलैयाराजा हे संगीतविश्वातलं नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी तयार केलेली फक्त गाणीच ऐका असं म्हटलं जातं. मी म्हणतो, त्यांनी संगीत साधना थांबवावी. ते राजकारणावर बोलत आहेत. राजकीय भूमिकेसाठी युक्तिवाद करता आला नाही तर मग त्यांना टीकेला सामोरं जावं लागणार", असं ते म्हणाले.
भाजपचा पाठिंबा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी इलैयाराजा यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. "तामिळनाडूतल्या सत्ताधारी पक्षाने देशातल्या सर्वोत्कृष्ट संगीतकारांपैकी एक असलेल्या इलैयाराजा यांची शाब्दिक निर्भत्सना करताना त्यांचा पाणउतारा केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेशी इलैयाराजा यांचे विचार साधर्म्य साधणारे नसल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे", असं नड्डा म्हणाले.
तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष के.अण्णामलाई यांनी इलैयाराजा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावं अशी मागणी केली आहे. इलैयाराजा यांची राज्यसभेवर नियुक्ती होणं हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे असंही ते म्हणाले.
मुलाने घेतली विरोधी भूमिका
इलैयाराजा यांचा मुलगा युवान शंकर राजा याने वडिलांच्या भूमिकेशी फारकत घेतली आहे. तामिळ चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध संगीतकार असलेल्या युवान यांनी इन्स्टाग्रामवर काळ्या टीशर्टमधला एक फोटो शेअर केला. 'डार्क द्रविडिअन, प्राऊड तामिझान' असं या टीशर्टवर म्हटलं होतं.
द्रविड चळवळ आणि काळा यांचं जुनं नातं आहे. युवान यांची पोस्ट म्हणजे इलियाराजा यांच्या भूमिकेशी परस्परविरोधी भूमिका आहे असं स्पष्ट झालं आहे.
इलियाराजा यांचं काय म्हणणं?
मला माझ्या वक्तव्याला राजकीय रंग द्यायचा नाहीये. मोदींना मतदान करा असं मी म्हटलेलं नाही. मी त्यांना मतदान करत नाही असंही मी म्हटलेलं नाही असं इलैयाराजा यांनी त्यांचे बंधू गंगाई अमारन यांना सांगितलं.
इलियाराजा यांची कारकीर्द
कालातीत संगीतासाठी ओळखले जाणारे इलियाराजा शीघ्रकोपी स्वभावासाठी ओळखले जातात. पत्रकार परिषदा तसंच कार्यक्रमांदरम्यानही त्यांचा पारा भडकल्याचं पाहायला मिळालं आहे.
स्वामित्व हक्क असल्यामुळे इलियाराजा यांनी त्यांची गाणी रेडिओ वाहिनीवर ऐकवण्यास मनाई केली होती. लाईव्ह कार्यक्रमातही गायकांना त्यांची गाणी गाण्यापासून रोखलं होतं.
असं सगळं असलं तरी तामीळ जनतेचं इलियाराजा यांच्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यांचा चाहतावर्ग प्रचंड आहे.
संगीताच्या माध्यमातून आयुष्याचे विविध आयाम त्यांनी उलगडले आहेत.
1976 मध्ये इलैयाराजा यांनी अन्नाकली चित्रपटातून संगीतकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात केली. आतापर्यंत त्यांनी 1400हून अधिक चित्रपटांना संगीत दिलं आहे. चीनी कम, पा यासारख्या हिंदी चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिलं आहे.
त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.