कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराचं पाणी ओसरल्यानंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण सलग काही दिवस पुराचं पाणी साठून राहिल्याने सगळीकडेच अस्वछता पसरलीय.
ग्रामीण भागात जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली, पण पाणी ओसरल्याने या मृत जनावरांची विल्हेवाट लावणे गरजेचं आहे. मात्र तोपर्यंत दुर्गंधी येणं, किडे होणं, अशा समस्या उदभवल्या आहेत.
ज्यामुळं अनेक प्रकारचे आजार होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशा वेळी नेमकी काय काळजी घ्यावी लागेल, याबाबत डॉ अधिकराव जाधव यांच्याशी आम्ही चर्चा केली.
त्यानुसार अतिशय साधे सोपे आणि कमी खर्चाचे उपाय तुम्ही तुमच्या घरात आणि परिसरात करू शकता ज्यामुळे रोगराई पसरण्याला आळा घालणे शक्य होणार आहे.
1) निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडरचा वापर अधिक प्रभावी आहे. यासाठी 1 लिटर पाण्यात 50 ग्रॅम ब्लिचिंग पावडर घालून द्रावण करावे. हे द्रावण परिसरात टाकल्याने रोगराई रोखणे शक्य होणार आहे. तसंच अशा पाण्याने हातपाय धुवून घेतल्याने देखील डासांचा त्रास होत नाही.
2) याचसोबत 50 ग्रॅम चुना 10 लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी केल्याने देखील कीटक आणि डासांचा प्रादुर्भाव रोखता येऊ शकतो.
3) बंद घरात पुराच्या पाण्यासोबत सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता अधिक असते. अशा वेळी या प्राण्यांना मारणं गरजेचं नाही. तर त्यांना वाट करून दिल्याने त्यांचा आपल्यावर हल्ला करण्याची शक्यता नसते.
4) पाणी साठून राहिल्याने कीटक, मच्छर,माशा यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो डासांची संख्या वाढल्याने कीटकांचं प्रजोत्पादन वाढतं त्यामुळे साथीचे रोग होऊ शकतात. अशा वेळी साठलेल्या पाण्यात तेलाचे थेंब सोडल्याने ही उत्पत्ती रोखता येऊ शकते.
कोल्हापूरमधील फिजिशियन डॉ विद्या पाटील यांनी देखील नेमकी काय काळजी घ्यावी याबाबत सांगितलं.
पुराचं पाणी घर आणि परिसरात साठून राहिल्याने साथीचे रोग पसरू शकतात. घराच्या भिंती ओल्या असल्याने बुरशीजन्य रोग झपाट्याने होऊ शकतात.
5) त्यासाठी घराची दारं खिडक्या उघड्या ठेवून हवा खेळती ठेवणं गरजेचं आहे. साचलेल्या पाण्यात जाताना उघड्या पायांनी जाऊ नये. जखम असेल तर पूर्णपणे झाकूनच बाहेर पडावं.
6) पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. पूर आल्याने गढूळ पाणी पुरवठा होतो हे पाणी वापरासाठी घेताना देखील काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुरटी फिरवून पाणी स्वच्छ करावं.
7) तसंच बाजारात क्लोरीनच्या गोळ्या मिळतात. त्यादेखील प्रमाणानुसार पाण्यात मिसळून ते पाणी वापरल्याने बऱ्याच प्रमाणात साथीचे रोग रोखता येऊ शकतात. अशा प्रकारे योग्य काळजी घेतली तर रोगराईपासून वाचता येऊ शकतं, असं डॉ. विद्या पाटील यांनी सांगितलं.