Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 25 April 2025
webdunia

लक्ष्मीपूजनच्या दिवशी इथं घराघरात रंगतात पत्त्यांचे डाव

On the day of Lakshmipujan
, सोमवार, 28 ऑक्टोबर 2019 (15:30 IST)
श्रद्धा दामले

मंद दिवे, हलक्या आवाजातलं संगीत, फुलांची सजावट, पणत्या आणि दिव्यांच्या माळा सोडलेल्या.. दिवाळीचंच वातावरण. पण महाराष्ट्रातलं नाही. इथलं दिल्लीचं. दिल्लीच्या पार्टीतलं.
 
दिल्लीत स्थिरावतोय तोच, इथल्या दिवाळी पार्टीला हजेरी लावण्याचा योग आला. घरातली सजावट पाहून मन सुखावलं पण पुढच्याच क्षणी मराठी मनाचे डोळे विस्फारले गेले. कारण होतं, पार्टीच्या यजमानानांच्या घरच्या टेबलावर पत्त्यांचा रंगलेला डाव.
 
दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर टेबलं लावून आणि छान जाजमं पसरून नटूनथटून आलेल्या पाहुण्यांना पत्ते खेळायची सोय केलेली होती. बाजूला खाण्या-पिण्याची रेलचेल. पण सगळ्या पाहुण्यांचं लक्ष होतं समोर पडणाऱ्या पत्त्यावर. एका टेबलावर रमीचा डाव सुरू होता आणि दुसऱ्या टेबलावर तीन पत्ती रंगली होती.
 
दिल्लीतल्या या पत्त्यांच्या परंपरेची ओळख ही अशी झाली. यानंतर अनेक दिल्लीकरांशी बोलल्यावर त्याचा उलगडाही होत गेला.
 
दिल्लीतला घामेजणारा पावसाळा संपून, हलकीशी थंडी पसरायला लागली की दिल्लीकरांना वेध लागतात ते थंडीचे. थंडीची चाहूल लागते न लागते तोच दिवाळी जवळ आलेली असते. खूप रोषणाई, मिठाया, खरेद्यांसाठी भरून वाहणारे दिल्लीतले बाजार... याबरोबरच दिवाळीत रंगणाऱ्या इथल्या दिवाळी पार्ट्यांची नियोजनं कानावर पडायला लागतात.
 
शास्त्र असतं ते. प्रत्येकानं हेच सांगितलं. लक्ष्मीपूजनाला म्हणजेच उत्तर भारतातल्या बडी दिवाळीला घराघरांमध्ये पत्ते खेळण्याची प्रथा आहे. कुटुंबाबरोबर बसून, नातेवाईकांना बोलावून पत्ते खेळणं, पैसे लावून तीन पत्ती खेळणं शुभ मानतात.
 
"दिवाळीच्या दिवशी घरात अंधार असू नये. दिवे रात्रभर पेटते राहिले पाहिजेत. मग त्यावर सारखं लक्ष ठेवणं आलं. तर मग नुसतं दिव्यांपाशी का बसायचं आणि कसं जागायचं. म्हणून मग पत्ते खेळायला सुरुवात झाली. ज्यामुळे जागरण सुसह्य झालं.
 
कुटुंबाला एकत्र वेळ घालवता येऊ लागला. हळूहळू ही प्रथाच पडली आणि आता तर त्याचं दिवाळी पार्टी म्हणून आयोजन केलं जातं," पंचकुलाला राहणाऱ्या शिवानी सांगत होत्या.
 
त्या त्यांच्या कुटुंबाबरोबर बडी दिवाळीला नेहमी पत्ते खेळतात. या दिवशी लहान मुलांना पण पत्ते खेळायला परवानगी असते. त्यांच्या घरी जवळचे नातेवाईक जमतात. थोडेफार पैसे लावून खेळायला मजा येते, असंही शिवानी सांगत होत्या.
 
शंकर आणि पार्वतीनं द्यूत खेळायला सुरुवात केली, वर्षातल्या ठरावीक दिवशी जो द्यूत खेळेल त्याची वर्षभर भरभराट होईल असं पार्वती मानयची. मग द्यूत जाऊन पत्ते आले आणि आताच्या दिवाळी पार्टीतही त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे, मूळच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि आता गेली बारा वर्षं दिल्लीत स्थायिक झालेल्या मधुरा कुलकर्णी सांगत होत्या.
 
"माझ्या दिल्लीतल्या मैत्रिणींमुळे मला या परंपरेविषयी कळलं. माझ्यासाठीसुद्धा ही परंपरा जरा वेगळी आणि नवीन असल्यामुळे त्यांच्याकडून अधिकाधिक माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा ही शिव-पार्वतीची गोष्ट समजली," मधुरा सांगत होत्या.
 
दक्षिण दिल्लीत राहणारे विकी कक्कड दिवाळीतल्या पत्ते पार्टीबद्दल सांगत होते.
 
"आम्ही लहानपणापासून दिवाळी पार्टीला जातोय. पण त्याचं नेमकं कारण माहीत नव्हतं. लक्ष्मीपूजनाला जो जिंकेल त्याच्यावर वर्षभर लक्ष्मीची कृपा असते, त्यामुळे या दिवशी पैसे लावून पत्ते खेळणं शुभ मानलं जातं. या दिवशी लक्ष्मीची पूजा झाल्यावर घरातले सगळेच लहान मोठे एकत्र येऊन रात्र जागवतात, पत्ते खेळतात, गप्पा- खाणंपिणं मजा असते," असं ते सांगत होते.
 
दिवाळीच्या रोषणाई, फराळ आणि आकाशकंदिलांच्या आठवणीत दिल्लीतल्या पत्ते पार्टीची आणखी एक आठवण जोडली गेली. आजकाल लोकं खूप बिझी असतात. दिवाळीच्या दिवशीही कामावर जावं लागतं. किंवा दुसऱ्या दिवशी कामावर जायचं असतं. मग अशावेळेस बडी दिवाळीला असं पत्ते खेळणं होत नाही. तेव्हा आजकाल दिवाळीच्या दोन-तीन आठवडे आधीपासून सुट्टीच्या आदल्या दिवशी किंवा वीकेण्डला अशा पार्ट्यांचं आयोजन केलं जातं.
 
महाराष्ट्रातही मंगळागौरीचं जागरणं, कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेशन हल्ली वीकेण्डला किंवा सर्वांच्या सोयीनं केलं जातं. तसंच काहीसं वाटलं मला हे दिवाळी पार्टीचं बदलतं रूप.
 
दिवाळी पार्टीला जायचं म्हणजे प्रचंड तयारी असते. नुसती यजमानांची नव्हे तर पार्टी अटेंड करणाऱ्यांचीही धावपळ असते. थीम असेल तर थीमला साजेसे कपडे खरेदी करणं, फॅशनेबल दिसणं, दिवाळी पार्टीच्या आधी पोकरचे क्लास लावणं किमान पोकर शिकून घेणं आदी गोष्टीही केल्या जातात. दिवाळी पार्टी आता दिल्लीतला एक भलाथोरला ट्रेंड झाला आहे.
 
दिल्लीत राहणाऱ्या ज्योती गेहलोत हेच सांगत होत्या.
 
"दिवाळी पार्टी आता घरगुती स्वरूपात राहिलेली नसून, तो एक इव्हेंट झाला आहे. आजकाल अशी पार्टी म्हणजे अतिशय प्रतिष्ठेचा विषय मानला जातो. खूप पैसे खर्च केले जातात. घरचे सदस्य नाही तर इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या ताब्यात याचं कंत्राट दिलं जातं. व्हेन्यू ठरवले जातात. दारू ऑर्डर केली जाते," ज्योती सांगत होत्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ना अजित पवार, ना सुप्रिया सुळे! रोहित होणार शरद पवारांचे राजकीय वारसदार?