एक मोठं जागतिक दस्ताऐवज लीक झाल्यामुळे त्यातून जगातील नेते, राजकारणी आणि अब्जाधीशांची गुप्त संपत्ती आणि व्यवहार उघडकीस आले आहेत.
यात 35 आजी आणि माजी नेते तसंच 300 हून अधिक अधिकाऱ्यांची नावं आहेत. याला पँडोरा पेपर्स असंही म्हणतात.
जॉर्डनच्या राजांनी युके आणि यूएसमध्ये 70 दशलक्ष डॉलर्सची मालमत्ता गुप्तपणे गोळा केल्याचं यात समोर आलं आहे..
ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांच्या पत्नीने लंडन येथील कार्यालय खरेदी करताना स्टॅम्प ड्युटीमध्ये 3 लाख 12 हजार पौंडांची बचत कशी केली, हेसुद्धा या कागदपत्रांत नमूद केलं आहे.
या जोडप्यानं विदेशात एक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीकडे या इमारतीची मालकी होती.
हे दस्तावेज रशियाचे राष्ट्राअध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मोनॅकोमधील गुप्त मालमत्तेकडेही बोट दर्शवतं.
तसंच चेक रिपल्बिकचे पंतप्रधान आंद्रेज बाबिस जे या आठवड्याच्या शेवटी निवडणुकीला सामोरं जात आहे. ते आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात विदेशी गुंतवणूक कंपनी नमूद करण्यास अयशस्वी ठरलेत. या कंपनीनं फ्रान्सच्या दक्षिणेस 12 दशलक्ष पौंडांचे दोन व्हिला खरेदी केले होते.
फिनसेन फाईल्स, पॅराडाइज पेपर्स, पनामा पेपर्स आणि लक्सलीक्स नंतर गेल्या सात वर्षांतील लीक्सच्या साखळीतील ही ताजी घडामोड आहे.
या दस्ताऐवजातील सगळ्या फायलींची तपासणी इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्ट्स (ICIJ) द्वारे करण्यात आली. यात 650 हून अधिक पत्रकारांनी भाग घेतला आहे.
बीबीसी पॅनारोमानं गार्डियन आणि इतर माध्यमांसोबत केलेल्या संयुक्त तपासणीत 1 कोटी 20 लाख कागदपत्रं पाहिली. तसंच ब्रिटिश व्हर्जिन आयलँड, पनामा, बेलिझ, सायप्रस, यूएई, सिंगापूर आणि स्वित्झर्लंड या देशांमधील आर्थिक सेवा पुरवणाऱ्या 14 कंपन्यांमधील फाईल्सही बघितल्या.