पंकजा मुंडेंनी ट्वीटर अकाउंटवरुन भाजप हा शब्द हटवला : 12 डिसेंबरला काय निर्णय घेणार?

सोमवार, 2 डिसेंबर 2019 (11:12 IST)
माझ्या भविष्यातील वाटचालीबद्दल 12 डिसेंबरला बोलेन असं पंकजा मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिल्यानंतर अनेक तर्क-वितर्कांना सुरूवात झाली होती.
 
आता पंकजा यांनी आपल्या ट्वीटर अकांऊटवरून भाजप हा शब्दच हटविल्याने त्यांची पुढची वाटचाल पक्षासोबत होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
पंकजा यांनी ट्वीटर प्रोफाईल अपडेट केल्यानंतर कट्टा न्यूजचे संपादक सुधीर सूर्यवंशी यांनी ट्वीट करून पंकजा मुंडे आणि एकनाथ खडसे हे कोणत्याही क्षणी भाजपला सोडचिठ्ठी देऊ शकतात असं म्हटलं आहे. पक्षानं आपल्यावर अन्याय केल्याची भावना दोन्ही नेत्यांच्या मनात असल्याचं सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, पंकजा मुंडेंच्या फेसबुक पोस्टनंतरही सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा काय असू शकते याच्या शक्यता वर्तवणारं ट्वीटही केलं होतं. सूर्यवंशी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, की पंकजा त्यांच्या 12 समर्थक आमदारांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. दुसरी शक्यता म्हणजे त्यांना विधानपरिषदेवर विरोधी पक्षनेतेपद दिलं जाईल आणि तिसरी शक्यता म्हणजे भाजप त्यांना महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद देऊ शकतं.
 
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे,
 
निवडणुका झाल्या. निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्वजण आपण पाहात होतात. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर येऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जबाबदारी माझी आहे.
 
दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. आधी देश, नंतर पार्टी आणि शेवटी स्वत: हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्या मृत्यूनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.
 
पाच वर्षं सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. ताई आम्हाला भेटायला वेळ द्या. ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या. किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली.
मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. मला याची पूर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनतेप्रती असलेल्या जबाबदारी म्हणून राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल, या सगळ्या बदलत्या संदर्भाचा विचार करून आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.
 
आपण मला वेळ मागत आहात. मी आपल्याला वेळ देणार आहे. आठ ते दहा दिवसांनंतर. हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचंय. आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.
 
12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त... जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे. नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?
 
12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू.
 
येणार ना तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की!!!
 
पंकजा वेगळा विचार करणार?
''पंकजा मुंडे यांच्या पोस्टमध्ये शेवटी 'मावळे' येतील असा उल्लेख आहे. आतापर्यंत भगवानगडासंदर्भात मावळे असा उल्लेख कधी झाला नव्हता. मात्र आज लिहिलेल्या पोस्टमध्ये मावळे येतील असं त्यांनी म्हटलं आहे. मावळे हा उल्लेख शिवसेनेसंदर्भात केला जातो. त्यामुळे मावळे हा शब्द सूचक आहे. पंकजाताई काही वेगळा डाव मांडू शकतात'', असं लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख यांनी सांगितलं.
 
ते पुढे म्हणाले, ''भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापन झालं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाली होती. धनंजय मुंडे हे पंकजा मुंडे यांचे कट्टर विरोधक आहेत. विरोधकांशी चर्चा करण्याआधी स्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करावीशी वाटली नाही का? असा संदेश पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना गेला''.
 
''पंकजा मुंडे या भाजपचा महत्वपूर्ण ओबीसी चेहरा आहेत. भाजपला त्यांना डावलणं शक्य नाही. अंतर्गत धुसफूस असू शकते मात्र भाजप नेतृत्वाला त्यांना बाजूला सारता येणार नाही'' असं त्यांनी सांगितलं.
 
दरम्यान पंकजा मुंडे यांचे समर्थक महादेव जानकर यांनी पंकजा मुंडे अन्य काही विचार करतील ही शक्यता फेटाळून लावली. मतदारांशी त्यांचं भावनिक नातं आहे. जिव्हाळा आहे. निवडणूक निकालानंतर जाहीरपणे त्यांनी संवाद साधला नसल्याने पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपलं म्हणणं जनतेसमोर मांडलं आहे. यातून वेगळा अर्थ काढण्याची आवश्यकता नाही असं सांगितलं.
 
''पाच-सहा दिवसांपूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी नेहमीच्या हसतखेळत पद्धतीने संवाद साधला. पण हा संवाद राजकीय गप्पा स्वरुपाच्या नव्हत्या, कौटुंबिक होत्या. त्यांच्या वागण्यात काहीही वेगळं जाणवलं नाही. त्या भाजपच्या मोठ्या नेत्या आहेत, कोअर कमिटीच्या सदस्या आहेत. परळी, बीड परिसरासाठी त्यांनी मोठा निधी मिळवून दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून त्यांना मोठा राजकीय वारसा मिळाला आहे. एखाद्या पराभवाने त्या खचून जातील असे वाटत नाही'', असं आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलं.
पंकजा आणि धनंजय मुंडे-भाऊबहीण प्रतिस्पर्धी
गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.
 
2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.
 
जानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.
 
नंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2013 मध्ये त्यांनी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे.
 
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली.
 
डिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं.
 
तेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.
 
2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.
 
दरम्यान, यावेळेस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.
 
अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केले होते. त्यावेळी पंकजा यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.
 
मात्र पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूक पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला.
 
यंदाही म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच परळीतून सामना रंगला. ज्यात धनंजय मुंडे जिंकले.
 
यंदाच्या निवडणुकीत अटीतटीच्या मुकाबल्यात धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना नमवलं.
 
क्लिपवरून आरोप-प्रत्यारोप
राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत पंकजा मुंडेवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जातोय. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लिपही सोशल मीडियावरून पसरवली जात होती.
 
मात्र, धनंजय मुंडे यांचं हे भाषण नेमकं कुठं झालं आणि त्यातल्या आक्षेपार्ह विधानांबाबत किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. दुसरीकडे, परळीत धनंजय मुंडे यांच्या या भाषणाचा दाखल देत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीकेची तोफ डागली. याच भाषणाच्या शेवटी पंकजा मुंडे व्यासपीठावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यामुळं सभेच्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केलं. धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती.
 
धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या भाषणाच्या क्लिपबद्दल फेसबुक पोस्टच्या माध्यमातून स्पष्टीकरणं दिलं. ते म्हणाले, "शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी."
 
''अशी क्लिप एडिट करणाऱ्यांनी किमान बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा तरी आदर ठेवावा, आपली निवडणूक विकास कार्यावर आहे, ती भावनिकतेवर घेऊन जाताना इतकी खालची पातळी गाठू नका ही कळकळीची विनंती आहे," असंही धनंजय मुंडे म्हणाले.
 
धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी काय गुन्हा केलाय त्यामुळे बहिण-भावाच्या नात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे असं त्यांनी सांगितलं. मला तर जग सोडून जावंसं वाटतंय असं धनंजय मुंडे म्हणाले.
 
''मला तीन मुली आहेत, बहिणी आहेत तेव्हा मी कधी कोणत्याही महिलेबाबत असं वक्तव्य केलं नाही. बहिण-भावाच्या नात्यात विष कालवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर मला शब्द टाकला असता तर मी निवडणुकीतून माघार घेतली असती असं धनंजय मुंडे म्हणाले. पण निवडणूक जिंकण्यासाठी राजकारण इतक्या खालच्या पातळीला जाईल असं वाटलं नव्हतं''.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख उद्धव ठाकरेंच्या मनधरणीसाठी संघ का वळवू शकला नाही भाजपचं मन?