ऐंशीच्या दशकात फूलन देवीच्या नावाची शोलेमधल्या गब्बर सिंहपेक्षाही जास्त दहशत होती. फूलन देवीचा नेम अचूक होता आणि ती अतिशय पाषाणहृदयी होती, असं लोक म्हणायचे.
पण तिचं आयुष्य अभ्यासणाऱ्यांच्या मते परिस्थितीनं तिला इतकं निष्ठुर बनवलं होतं. बहमईमध्ये जेव्हा तिने 22 ठाकुरांना एका रांगेत उभं करून ठार मारलं, तेव्हा तिला जराही वाईट वाटलं नाही.
1980 च्या दशकाच्या सुरूवातीला फूलन देवी सुरुवातीला चंबळच्या खोऱ्यातील सर्वाधिक दहशत असलेली डाकू मानली जायची. तिच्या आयुष्यावर अनेक चित्रपटही आले.
पण तिला नेहमीच पोलिसांची भीती वाटत राहायची. ठाकूरांसोबत असलेल्या वैमनस्यामुळेही तिला सतत आपल्या जीवाला धोका असल्याचं वाटत राहायचं. चंबळच्या खोऱ्यात सतत पोलिस आणि ठाकूरांपासून स्वतःचा जीव वाचवत जगायला ती थकली असावी, म्हणूनच तिने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला असावा. पण ही गोष्ट तितकी सोपी नव्हती.
आत्मसमर्पण केल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिस आपल्याला कोणत्या ना कोणत्या पद्धतीने संपवेल, अशी भीती तिला होती. म्हणूनच मग तिने मध्य प्रदेश सरकारसमोर आत्मसमर्पणाचा प्रस्ताव मांडला.
मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अर्जुन सिंह यांच्यासमोर फूलन देवीने एका कार्यक्रमात आत्मसमर्पण केलं. त्यावेळी त्यांना पाहण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केली होती.
त्या काळात फूलन देवीची लोकप्रियता कोणत्याही फिल्म स्टारपेक्षा कमी नव्हती.
ऐतिहासिक घटना
फूलन देवीने कपाळावर लाल रंगाचं कापड बांधलं होतं. हातात बंदूक घेऊन जेव्हा ती स्टेजच्या दिशेने गेली, तेव्हा सर्वांनी श्वास रोखून धरला होता.
'जर फूलनने या क्षणी गोळी चालवली तर...' पण असं काही झालं नाही. तिने आपली बंदूक कपाळाला टेकवली आणि नंतर अर्जुन सिंह यांच्या समोर ठेवली.
हाच तो क्षण ज्यावेळी फूलन देवीने आपल्या पूर्वायुष्यापासून फारकत घेतली होती.
तिचा स्वभाव अतिशय चिडखोर होता. ती विशेष कोणाशी बोलायची नाही आणि जेव्हा केव्हा बोलायची तेव्हा तोंडातून एखादी शिवी तरी हमखास बाहेर पडायची.
पत्रकारांशी बोलणं ती टाळायचीच.
फूलन देवीचं आत्मसमर्पण एक ऐतिहासिक घटना होती, कारण त्यानंतर चंबळच्या खोऱ्यात डाकूंच्या टोळ्यांची दहशत हळूहळू संपुष्टात यायला लागली होती.
चंबळच्या खोऱ्यात काही ठिकाणी सक्रीय असलेले डाकू सरकारसाठी डोकेदुखी बनले होते. काही भागांमध्ये तर त्यांचा शब्द ओलांडण्याची कोणाची हिंमत नसायची.
चित्रपट आणि संसद प्रवेश
फूलन देवीने 1983 मध्ये आत्मसमर्पण केलं आणि 1994 पर्यंत तुरूंगातच होती. या दरम्यान तिला कधीही उत्तर प्रदेशमधील तुरूंगात पाठविण्यात आलं नाही.
1994 साली तुरूंगातून सुटल्यानंतर 1996 मध्ये तिने लोकसभेची निवडणूक लढवली आणि मिर्झापूरमधून खासदार म्हणून निवडून आली.
दिग्दर्शक शेखर कपूर यांनी फूलन देवींच्या आय़ुष्यावर बँडिट क्वीन हा चित्रपट काढला.
समाजवादी पक्षानं जेव्हा फूलन देवींना तिकीट देत असल्याची घोषणा केली, तेव्हा प्रचंड टीका झाली होती. एका डाकूला संसदेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळी करून दिला जात असल्याचं म्हटलं गेलं.
1994 साली दिग्दर्शक शेखर कपूर यांनी फूलन देवींच्या आयुष्यावर 'बँडिट क्वीन' नावाचा चित्रपट बनवला. या चित्रपटातील काही दृश्यं आणि फूलन देवींची भाषा यावरूनही वाद निर्माण झाला होता.
चित्रपटात फूलन देवींची व्यक्तिरेखा समाजातील चुकीच्या प्रथांविरोधात लढणाऱ्या नायिकेची दाखवली होती.
वैयक्तिक आयुष्य
फूलन देवींचा जन्म उत्तर प्रदेशमधील एका गावात 1963 साली झाला होता. वयाच्या 16 व्या वर्षी काही डाकूंनी त्यांचं अपहरण केलं होतं.
त्यानंतर त्यांनीही तेच आयुष्य स्वीकारलं आणि 14 फेब्रुवारी 1981 ला बहमईमध्ये 22 ठाकूरांची हत्या केली.
यानंतरच त्यांचं नाव गाजायला लागलं. फूलन देवींनी म्हटलं होतं, की या हत्या त्यांनी सूड घेण्यासाठी केल्या होत्या.
ठाकूरांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केला होता आणि त्याचा सूड उगवण्यासाठीच आपण या हत्या केल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
1998 मध्ये फूलन देवींनी पुन्हा लोकसभेची निवडणूक लढवली. मात्र त्यांचा पराभव झाला. मात्र त्याच्या पुढच्याच वर्षी झालेल्या 13 व्या लोकसभा निवडणुकीत त्या पुन्हा एकदा निवडून आल्या. 25 जुलै 2001 साली त्यांची हत्या करण्यात आली.