Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 27 March 2025
webdunia

पूजा चव्हाण प्रकरण: संजय राठोड यांच्या पाठीशी बंजारा समाज, पोहरादेवी बैठकीत निर्णय

पूजा चव्हाण प्रकरण: संजय राठोड यांच्या पाठीशी बंजारा समाज, पोहरादेवी बैठकीत निर्णय
, गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (18:32 IST)
नितेश राऊत
बीबीसी मराठीसाठी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर गेल्या आठवड्याभरापासून आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणातील काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत.
 
पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्या मंत्र्याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. बंजारा समाज तुमच्या मागे आहे असं विधान महंत कबिरदास महाराज यांनी आज केलं आहे.
 
दुसऱ्या बाजूला संजय राठोड मात्र गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे.
 
शिवसेना आपल्या मंत्र्याला पाठिशी घालते आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.
 
पोहरादेवी भेटीसंदर्भातील बैठक संपली
संजय राठोड यांच्या पोहरादेवी भेटीची संदर्भातली महत्वाची बैठक संपली. पोहरादेवी संस्थानच्या महंतांमध्ये ही बैठक झाली. महंत कबिरदास महाराज यांनी या बैठकीची माहिती माध्यमांना दिली.
 
पोहरादेवी संस्थांमधील संत महंत संजय राठोड यांच्या पाठीशी, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही राजकीय पक्षाला बळी न पडता संजय राठोड यांच्यावर दबाव न आणता निष्पक्ष चौकशी करावी आणि न्याय द्यावा ही मागणी बैठकीत करण्यात आली.
पूजा चव्हाण यांच्या आई वडिलांची तक्रार नाही. त्यामुळं या कोणत्याही षडयंत्राला मुख्यमंत्र्यांनी बळी न पडता चौकशी करावी. संपूर्ण बंजारा समाज आणि संत महंत संजय राठोड यांच्या पाठीशी आहे.
 
संजय राठोड यांनी सहपरिवार पोहरादेवी मंदिराला भेट द्यावी, विकास कामे बघावी अशी विनंती महंतांनी केली आहे. संजय राठोड येण्याची तारीख निश्चित झाल्यावर माध्यमांना त्याची सूचना देण्यात येईल अशी माहिती महंतांनी दिली.
 
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो," असा आरोप भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
 
एका बाजूला पूजा चव्हाण प्रकरणात तात्काळ चौकशी करावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणाशी ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा संबंध असल्याचा आरोप भाजपच्या इतर नेत्यांकडून केला जात आहे.
या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असून तथ्य आढळल्यास कारवाई करू असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले असले तरी आपल्या पक्षातील मंत्र्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांसंदर्भात मात्र त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
 
तेव्हा शिवसेना संजय राठोड यांना पाठिशी घालत आहे का? या प्रकरणाकडे राजकीय दृष्टीनेच पाहिले जात आहे का? संजय राठोड प्रकरणी शिवसेना स्पष्टीकरण देणार की राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच शिवसेनाही आपल्या मंत्र्याच्या बाबतीत सावध भूमिका घेणार? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
 
काय आहे प्रकरण?
परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
 
पूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती.
 
सोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही तिला समजावून सांगा असे म्हणत आहे. तर तरुणीने आत्महत्या केल्यानंतर अरुण नावाचा एक कार्यकर्ता त्या तरुणीच्या मृतदेहाजवळ होता. त्यावेळी कथित मंत्र्याने त्या तरुणीचा मोबाईल ताब्यात घेण्यास सांगितल्याचे दुसऱ्या ऑडिओ क्लिपमधून समोर आलं आहे.
 
"पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहाता प्रकरणाचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो. पोलिसांनी स्यूमोटो घेऊन मंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा," अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे.
 
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहून याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
 
शिवसेना पक्षाचे यवतमाळ जिल्ह्यातील आमदार व आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेल्या नेत्याचे नाव याप्रकरणी पुढे आले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या नावे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन,याप्रकरणी तात्काळ विशेष शोध पथकाकडून (एसआयटी) चौकशी करावी.' असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.
 
उद्धव ठाकरे सावध भूमिका घेत आहेत का?
या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपकडून सतत आरोप होत आहेत. पण स्वत: संजय राठोड, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसंच शिवसेना पक्षाकडूनही यासंदर्भात कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही.
 
आपल्या मंत्र्यावर झालेल्या आरोपांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कोणतेही भाष्य केलेले नाही. तसंच महिलांवरील अत्याचारांच्या घटनांबाबत सातत्याने आपल्या भूमिका मांडणाऱ्या शिवसेनेच्या महिला नेत्यांनीही गप्प राहणं पसंत केले आहे.
निलम गोऱ्हे, प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मांतोडकर, मनिषा कायंदे यांसारख्या शिवसेनेच्या महिला नेत्यांनी याबाबत एकही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 
राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "शिवसेनेकडून मंत्र्याला पाठिशी घालण्याचा साधारण तसा प्रयत्न चालला आहे असे दिसून येते. सुरुवातीला प्रकरण संदिग्ध होते पण आता अनेक संशायस्पद बाबी समोर आल्या आहेत. तेव्हा मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख यानात्याने उद्धव ठाकरेंनी त्यांचा तुर्तास राजीनामा घेणे अपेक्षित होते."
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून बालात्काराचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा राष्ट्रावादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको अशी भूमिका घेतली होती.
"पण हे प्रकरण वेगळे आहे. मुंडे प्रकरणात त्यांनी स्वत: समोर येऊन स्पष्टीकरण दिले आणि त्यासंबंधी एक केस न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तेव्हा या प्रकरणाकडे महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे पहायला हवे. उद्धव ठाकरेंनी राजकारणापलीकडे याचा विचार करणं गरजेचे आहे," असंही विजय चोरमारे सांगतात.
 
धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांनी थेट भूमिका घेतली असली तरी नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे उद्धव ठाकरे घाईने निर्णय घेत नसावेत असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटते.
 
ते सांगतात, "धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांनी तातडीने भूमिका घेतली पण त्यांना काही तासातच माघार घ्यावी लागली. त्यामुळे उद्धव ठाकरे सबुरीने घेत आहेत असे दिसते."
 
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले आहेत."
 
"उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ राजकीय आहे. पण प्रत्येक प्रकरण स्वतंत्र असू शकते आणि तथ्यांच्या आधारावर सरकारने काही निर्णय तत्काळ घेणं अपेक्षित आहे. यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा खराब होऊ शकते."
 
यापूर्वी भ्रष्टाचार, गुन्हेगारी अशा अनेक प्रकरणांमध्ये राजकीय नेते किंवा मंत्र्यांची नावे अडचणीत आल्यास पक्षाकडून तात्काळ राजीनामा मागितला जात होता.
 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनाही आदर्श प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. याचा काँग्रेसला मोठा फटका बसला. हा निर्णय घाईघाईत घेतला गेला अशी प्रतिक्रियाही नंतर काँग्रेस नेत्यांनी दिली.
 
"संजय राठोड हे यवतमाळमधील शिवसेनेचे आमदार आहेत. त्याठिकाणी बंजारा समाज मोठ्या संख्येने आहे. संजय राठोड यांची स्थानिक पातळीवर लोकप्रियता आहे. यापूर्वी भावना गवळी आणि संजय राठोड यांच्यात स्थानिक राजकारणावरून वाद सुरू होता. त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी स्वत: हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले होते."
आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर अनेक नेत्यांना राजीनामे द्यावे लागले. त्यावेळी एखाद्या मंत्र्यावर आरोप झाला तरी काहूर उठायचे. पक्षाचे प्रतिमा खराब व्हायची आणि नैतिकतेच्या आधारावर राजीनामे मागितले जात होते.
 
अभय देशपांडे सांगतात, "आता मात्र परिस्थिती बदलली आहे. राजीनामा घेतला तरी संबंधित नेत्याची किंवा मंत्र्याची राजकीय उपयुक्तता संपत नाहीत. आता पक्षाचे धोरणही बदलले आहे. नितिमत्तेची व्याख्या बदलली आहे. रेल्वेचा अपघात झाला म्हणून पूर्वी माधवराव शिंदेंना राजीनामा द्यावा लागला होता. आता कोणी या कारणासाठी राजीनामा देत नाही."
 
"गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे सर्वाधिक आरोप होते. पण यामुळे त्यांच्या जागा कमी झाल्या नाहीत. त्यामुळे पक्षाला राजकीय उपयुक्तता पाहून निर्णय घ्यावे लागतात."
 
'मंत्रीपदावरुन काढायचे की नाही हा निर्णय तीन पक्ष मिळून घेतील'
शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मात्र पत्रकार परिषद घेत याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, "चौकशी अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनीही असेच म्हटले आहे. त्यामुळे जे आरोप करत आहेत ते पूजाच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी का गेले नाहीत?" असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांनी उपस्थित केला.
 
"मृत्यू संशयास्पद झाला आहे यात शंका नाही. पण तपास पूर्ण होईपर्यंत निष्कर्ष काढणे योग्य नाही. त्यांना मंत्रीपदापासून दूर करायचे की नाही हा निर्णय तीन पक्ष मिळून घेतील." असंही नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
 
या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणे होईल याची मी ग्वाही देते असंही त्या म्हणाल्या.
 
कोण आहेत संजय राठोड?
संजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.
 
संजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.
 
शिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
 
त्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.
 
अगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. 2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.
 
राठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री आहेत.
 
यापूर्वी भाजप-शिवसेना सरकारमध्ये ते महसूल राज्यमंत्री होते. राज्यमंत्र्यांना काम करू दिलं जात नाही, असं म्हणत राठोड यांनी तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना थेट आव्हान दिलं होतं. त्यासाठी त्यांनी राजीनाम्याचं अस्त्र वापरलं होतं.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नामदार गोपाळ कृष्ण गोखले