Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रिमॅच्युअर बेबी : एका माणसाने कशी वाचवली मुदतपूर्व अर्भकांची एक संपूर्ण पिढी?

प्रिमॅच्युअर बेबी : एका माणसाने कशी वाचवली मुदतपूर्व अर्भकांची एक संपूर्ण पिढी?
, बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (19:03 IST)
मुदतपूर्व प्रसूतिद्वारे जन्माला आलेल्या बालकांचे जीव वाचवण्याचा फारसा प्रयत्न अमेरिकेतील डॉक्टर करत नसत तेव्हाची ही गोष्ट आहे. अशा परिस्थितीत अडचणीत अडकलेल्या पालकांना एका ठिकाणी मदतीची शाश्वती राहत असे- हे ठिकाण म्हणजे कॉनी आयलंड भागातील एक प्रदर्शन. तिथे एका माणसाने हजारो जीव वाचवले, आणि अखेरीस अमेरिकी वैद्यकीय विज्ञानाची दिशा बदलली, त्याबद्दल लिहीत आहेत क्लेरी प्रेन्टिस.
 
विसाव्या शतकारंभी कॉनी आयलंड भागाला भेट देणाऱ्या लोकांना काही असाधारण लक्षवेधी गोष्टी पाहायला मिळत असत. फिलिपाइन्सवरून आणलेली एक जमात, "छोट्या प्रारूपातील गावं", एक हजार अनुभवी सैनिकांनी केलेलं बोअर युद्धाचं नाट्यमय सादरीकरण, आणि धडकी भरवतील अशा रोलर-कोस्टर राइड. पण अमेरिकेतील या अग्रगण्य करमणूक केंद्रामध्ये 40 वर्षं, म्हणजे 1903 पासून ते 1943पर्यंत, खरोखरचा जीवनमरणाचा संघर्षही सुरू होता.
 
मार्टिन कॉवनी यांनी उपलब्ध करून दिलेली इन्फन्ट इन्क्युबेटर केंद्राची सुविधा कॉनी आयलंडमधील सर्वाधिक लोकप्रिय प्रदर्शनस्थळ ठरली होती. या केंद्राच्या प्रवेशद्वारावर लिहिलेलं: 'जगातील सर्वांचाच लहान मुलांवर जीव असतो' (ऑल द वर्ल्ड लव्ह्ज अ बेबी). आतमध्ये मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू असायचा, त्यांच्या सेवेत वैद्यकीय कर्मचारी असायचे. ही मुलं पाहण्यासाठी 25 सेन्ट भरावे लागत. उबवणी-पेटीत ठेवलेल्या या लहानखुऱ्या जीवांपासून प्रेक्षक सुरक्षित अंतरावरच राहावेत, यासाठी रेलिंग लावलेलं होतं.
 
मुदतपूर्व प्रसूतिद्वारे जन्मलेल्या बालकांना आता नवजात विभागामध्ये काळजीपूर्वक ठेवलं जातं, मग तेव्हा करमणूक म्हणून त्यांचं प्रदर्शन का भरवलं जात असेल?
हे प्रदर्शन चालवणारा माणूस होता मार्टिन कॉवनी. ते 'इन्क्युबेटर डॉक्टर' म्हणून ओळखले जात होते- आणि ते प्रदर्शनं चालवत असले, तरी त्यांच्या शस्त्रक्रिया प्रगत होत्या.
 
कॉवनी यांनी परिचारिकांचा व दायींचा एक चमूच कामावर ठेवला होता, या कर्मचारी स्त्रिया तिथेच राहत असत. त्यांच्या सोबत दोन स्थानिक डॉक्टरही होते.
 
मुदतपूर्व जन्म झालेली बालके जनुकीयदृष्ट्या कमी क्षमतेची 'दुबळी' असतात, त्यांचं नशीब ईश्वरावर सोडून द्यावं, अशी अमेरिकेतील तत्कालीन अनेक डॉक्टरांची धारणा होती. त्यामुळे कोणत्याही वैद्यकीय हस्तक्षेपाविना अशी मुलं मरून जात.
 
कॉवनी याबाबतीत अनपेक्षितरित्या अग्रगण्य प्रयोग करणारे ठरले. ते कुठल्या महान विद्यापीठातले प्राध्यापक नव्हते किंवा एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात शिकवणारे शल्यविशारदही नव्हते. प्रस्थापित वैद्यकीय व्यवस्थेने वाळीत टाकलेला हा एक जर्मन ज्यू स्थलांतरित होता आणि अनेकांनी त्यांना प्रसिद्धीलोलुप व भोंदू वैदू ठरवलं होतं.
 
पण त्यांनी ज्या मुलांचा जीव वाचवला त्या पालकांसाठी आणि हे प्रदर्शन पाहायला गर्दी करणाऱ्या लाखो लोकांसाठी ते चमत्कार घडवणारे जादूगार होते.
 
कॉवनी यांनी वापरलेल्या उबवणी-पेट्या अत्याधुनिक होत्या. ते थेट युरोपातून या पेट्या आयात करत असत. त्या काळी मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांच्या वैद्यकीयसेवेबाबत अमेरिका काही दशकं मागे होती, पण फ्रान्स याबाबतीत आघाडीवर होता.
 
यातली प्रत्येक उबवणी-पेटी पाच फुटांहून अधिक उंच होती, ती पोलाद व काच यांनी बनवलेली असायची आणि ही पेटी उभी राहण्यासाठी पाय असायचे. बाहेरच्या बाजूला पाणी उकळवलं जात असे, हे गरम पाणी एका पाइपद्वारे पेटीतल्या बारीक जाळीच्या खालून फिरवलं जायचं व त्या जाळीवर बाळाला झोपवलं जात असे, पेटीतल्या तापमानाचं नियमन करणारं मापनयंत्रही तिथे बसवलेलं असायचं. बाहेरची ताजी हवा उबवणी-पेटीत जाण्यासाठी दुसरा एक पाइप जोडलेला असायचा. ही हवा शुद्ध व्हावी म्हणून दोन चाळण्यांमधून आत यायची- आधी द्रवशोषक लोकरीची चाळणी होती- ती अँटिसेप्टिक पाण्यातून काढलेली असायची, त्यानंतर कोरड्या लोकरीची चाळणी होती. डोक्यावर एक चिमणीसारखं उपकरण बसवलेलं होतं, त्यातला फिरता पंखा पेटीतली हवा बाहेर टाकण्याचं काम करायचं.
 
मुदतपूर्व प्रसूतीतून जन्मलेल्या बालकांची काळजी घेणं महागडं होतं. कॉवनी यांच्या सुविधाकेंद्रात 1903 साली प्रत्येक बाळासाठी दिवसाकाठी 15 डॉलर (आजचे 405 डॉलर) इतका खर्च यायचा.
 
पण या वैद्यकीय सेवेसाठी कॉवनी पालकांकडून एक छदामही घेत नसत- हा खर्च लोकांकडून भरून निघत असे. या प्रदर्शनासाठी लोक इतक्या प्रचंड संख्येने यायचे की, कॉवनी यांचा कामकाजाचा सर्व खर्च भरून निघायचा, ते कर्मचाऱ्यांना चांगला पगारही द्यायचे आणि तरीही त्यांच्याकडे पुढील प्रदर्शनांच्या नियोजनासाठी रक्कम उरलेली असायची. दरम्यान, या सगळ्यातून कॉवनी श्रीमंतही होत गेले.
 
मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांचे जीव वाचवणं, एवढंच काम कॉवनी यांनी पत्करलेलं नव्हतं, तर या बालकांचा कैवार घेऊन बाजू मांडणंही त्यांना आवश्यक वाटत होतं. मुदतपूर्व जन्म होऊन पुढे ख्याती प्राप्त केलेल्या व थोर कामगिरी पार पाडलेल्या माणसांची नावं ते भाषणांमधून सांगत असत. मार्क ट्वेन, नेपोलियन, व्हिक्टर ह्यूगो, चार्ल्स डार्विन व सर आयझॅक न्यूटन आदींचा यात समावेश होता.
 
कॉनी आयलंडवरील कॉवनी यांचं हे सुविधाकेंद्र 40 वर्षं सुरू होतं. त्यांनी अटलान्टिक सिटीमध्ये अशाच प्रकारचं दुसरं केंद 1905 साली सुरू केलं, तेही 1943सालापर्यंत कार्यरत होतं. कालांतराने त्यांनी हे प्रदर्शन इतर करमणूक स्थळांच्या ठिकाणीही नेलं. अमेरिकेत सर्वत्र 'वर्ल्ड्स फेअर्स अँड एक्सपोझिशन्स'द्वारे हे प्रदर्शन पोचलं.
 
कॉवनी यांना अमेरिकेत ख्याती व पैसा प्राप्त झाला असला, तरी पहिल्यांदा त्यांना युरोपात 'शो-मॅन' म्हणून प्रसिद्धी मिळाली होती. 1897 साली त्यांनी अर्ल्स कोर्ट इथे 'व्हिक्टोरियन एरा एक्झिहिबिशन' या उबवणी-पेट्यांचं प्रदर्शन लावलं आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्याच दिवशी सुमारे 3600 लोकांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि लॅन्सेट या ब्रिटिश वैद्यकीय नियतकालिकाने त्याबद्दल प्रशस्तीपर टिपण प्रकाशित केलं.
 
त्यानंतरच्या वर्षी कॉवनी यांनी ओमाहा, नेब्रास्का इथे 'ट्रान्स-मिसिसिपी अँड इंटरनॅशनल एक्पोझिशन'द्वारे अमेरिकेत त्यांनी पहिल्यांदा असं प्रदर्शन ठेवलं. अमेरिकेत सतत कुठे ना कुठे जत्रा किंवा प्रदर्शन भरतच असतं, त्यामुळे इथे आपल्यासारख्या माणसाला मोठी संधी आहे, हे लक्षात घेऊन ते तिथे स्थलांतरित झाले.
 
1903 सालापासून त्यांनी कॉनी आयलंडवर मुख्य तळ ठोकला, पण मागणीनुसार ते देशभरात प्रवास करत असत.
 
मार्टिन कॉवनी, 1869-1950
 
कॉवनी यांचं तंत्र त्या काळाच्या हिशेबाने प्रगत होतं. त्यात स्तनपानाद्वारे दूध देण्यावर आणि स्वच्छतेवर काटेकोर भर दिला जात असे. पण त्यांच्या काही पद्धती अपारंपरिक होत्या. संसर्गाचा धोका कमीतकमी राहावा यासाठी मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना संपर्कापासून दूर ठेवावं, असं बहुतांश रुग्णालयांमधील डॉक्टरांना वाटत असे. पण परिचारिकांनी बालकांना उबवणी-पेटीतून बाहेर काढून मिठीत घ्यावं, त्यांच्या पाप्या घ्याव्यात, यासाठी कॉवनी प्रोत्साहन देत असत. असं मायेने वागवल्यावर मुलंही त्याला सकारात्मक प्रतिसाद देतील, अशी त्यांची धारणा होती.
 
कॉनी आयलंडवरील अधिक विचित्र घटकांपासून अंतर राखण्यासाठी कॉवनी यांनी स्वतःचं सुविधाकेंद्र हे प्रदर्शन नसून छोटेखानी रुग्णालय असल्याचं सांगितलं. तिथल्या परिचारिका स्टार्च केलेले पांढरे गणवेश वापरायच्या. स्वतः कॉवनी व त्यांच्या चमूमधील डॉक्टर त्यांच्या सूटवरतील फिजिशियनांसारखे पांढरे कोट घालायचे.
 
उबवणी-पेट्या कायम काटेकोरपणे स्वच्छ केल्या जात. दायांना पौष्टिक अन्न मिळावं यासाठी कॉवनी यांनी एक आचारी नेमला होता. कोणी धूम्रपान करताना, मद्यपान करताना किंवा हॉट-डॉगसारखे पदार्थ खाताना दिसलं, तर त्या व्यक्तीला कॉवनी तत्काळ कामावरून काढून टाकत.
 
पण कॉवनी प्रदर्शनकर्त्यांच्या काही क्लृप्त्या वापरायलाही तयार होते. बालकं किती लहान आकाराची आहेत हे अधोरेखित होण्यासाठी त्यांना खूप जास्त आकाराचे कापडे घालायच्या सूचना त्यांनी परिचारिकांना केल्या होत्या. या ढगळ कपड्यांभोवती बांधलेला मोठा बो आणखी परिणामकारक ठरत असे.
 
जीवनदान देणारं हे कार्य कॉवनी करत असले, तरी मुलांसंबंधी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, डॉक्टर व आरोग्यविषयक अधिकारी या 'इन्क्युबेटर डॉक्टर'वर सातत्याने आरोप करत असत. प्रदर्शनासाठी या बालकांचा वापर होतो आहे आणि असं प्रदर्शन थाटल्याने मुलांचा जीव धोक्यात टाकला जातो, अशी टीका या मंडळींकडून कॉवनी यांच्यावर केली जात होती. त्यांचं सुविधाकेंद्र बंद पाडायचे प्रयत्नही वेळोवेळी होत असत.
 
पण सरत्या काळानुसार कॉवनी यांनी बालकांचे जीव वाचवून केलेली कामगिरी आणि त्यांचा प्रामाणिकपणा यामुळे मुख्यप्रवाही वैद्यकक्षेत्रातून त्यांना समर्थकही मिळाले. त्यांनी 1914 साली शिकागोमध्ये प्रदर्शन भरवलं तेव्हा स्थानिक बालरोगतज्ज्ञ ज्युलिअस हेस यांच्याशी त्यांची गाठ पडली. पुढे डॉक्टर हेस हे अमेरिकी 'निओनेटॉलॉजी'चे जनक म्हणून ख्यातनाम झाले. 1914 साली कॉवनी व हेस यांच्यात सुरू झालेली मैत्री त्यांच्या आयुष्यअखेरपर्यंत टिकली आणि त्यांच्यात महत्त्वाचे व्यावसायिक संबंधही प्रस्थापित झाले. शिकागो वर्ल्ड फेअर इथे 1933/34 मध्ये दोघांनी एकत्र येऊन अर्भक उबवणीकेंद्राची सुविधा चालवली होती.
 
काही डॉक्टर अडचणीत सापडलेल्या बालकांना कॉवनी यांच्याकडे पाठवत असत. त्यांच्या सुविधाकेंद्रात बालकांना मिळणाऱ्या दर्जेदार सेवेची अस्फुट कबुली यातून दिली जात होती.
 
सुमारे अर्धा शतकाच्या कारकीर्दीत आपण 6500 बालकांचा जीव वाचवल्याचा दावा कॉवनी यांनी केला. या उपचारांदरम्यान आपल्याला 85 टक्के वेळा यश मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.
 
मुदपूर्व जन्मलेल्या बालकांना वाहिलेली सुविधाकेंद्र सुरू करण्यात अमेरिकेतील रुग्णालयं मागे पडली होती. कॉवनी यांच्या सुविधाकेंद्राची सुरुवात झाल्यानंतर 36 वर्षांनी, 1939 साली न्यूयॉर्कमध्ये पहिल्यांदा असं केंद्र सुरू झालं.
 
कॉवनी यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीचा आढावा घेणारा विख्यात पत्रकार ए. जे. लिएब्लिंग यांचा लेख 1939 साली न्यूयॉर्करमध्ये प्रकाशित झाला होता. त्यात ते म्हणतात: "या क्षेत्रात अनुभवी डॉक्टर व परिचारिका पुरेशा संख्येने नाहीत. मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांना वैद्यकीय सेवा पुरवायची तर ते प्रचंड खर्चिक काम होतं... त्यात आईच्या दुधासाठी दर दिवसाला सहा डॉलर खर्च होतो... शिवाय उबवणी-पेटी व रुग्णालयातील खोली, ऑक्सिजन, डॉक्टरांच्या व्हिजिट यासाठीचा खर्च असतो आणि तीन पाळ्यांमध्ये काम करणाऱ्या परिचारिकांसाठी दर दिवशी पंधरा डॉलर खर्च करावे लागतात."
 
या असुरक्षित अवस्थेतील बालकांचा जीव वाचवण्यासाठी किफायतशीर प्रारूप तयार करणं न्यूयॉर्कमधील उत्तमोत्तम वैद्यकतज्ज्ञांना शक्य झालं नाही. पण 40 वर्षांपूर्वी युरोपातून आलेल्या स्थलांतरित तरुणाने फारसा अनुभव नसतानाही असं प्रारूप उभं करून दाखवलं.
 
आज कॉवनी यांच्या वारशाची पुनर्तपासणी डॉक्टर करत आहेत आणि कॉवनी यांची अनेक 'मुलं' त्यांच्या समर्थनार्थ अभिमानाने बोलत आहेत.
 
केरॉल बॉयस हेइनिश यांचा 1942 साली मुदतपूर्व जन्म झाला होता आणि त्यांना न्यूजर्सीमधील अटलान्टिक सिटी अथे असणाऱ्या कॉवनी यांच्या प्रदर्शनात नेण्यात आलं. "मार्टिन कॉवनी हा विलक्षण माणूस होता. त्यांच्या कामगिरीसाठीच त्यांना प्रसिद्धी प्राप्त व्हायला हवी. त्यांनी माझ्यासारख्या हजारो मुलामुलींचे प्राण वाचवले," असं त्या म्हणतात. गुलाबी मण्यांपासून केलेलं ओळखीचं नेकलेस अजूनही त्यांच्याकडे आहे, त्यावर पांढऱ्या मण्यांमध्ये त्यांचं नावही ओवलेलं आहे. उबवणी-केंद्रातच त्यांना हे नाव देण्यात आलं होतं.
 
"माझा जीव वाचवण्यासाठी कोणाकडे काहीही उपाय नव्हता," असं बेथ अॅलन म्हणतात. 1941 साली ब्रूकलिन इथे त्यांचा मुदतीच्या तीन महिने आधी जन्म झाला. तिला कॉनी आयलंडमध्ये घेऊन जावं, असं एका डॉक्टरने सुचवलं, तेव्हा त्यांच्या आईने नकार दिला आणि आपली मुलगी 'अनैसर्गिक' नाही असं आईने ठामपणे सांगितलं. शेवटी कॉवनी त्या रुग्णालयात आले आणि या मुलीची काळजी आपल्याला घेऊ द्यावी यासाठी तिच्या पालकांचं मन वळवलं. दर 'फादर्स डे'ला बेथ यांचे पालक त्यांना घेऊन कॉवनी यांच्याकडे जात असत. 1950 साली कॉवनी यांचं निधन झालं, तेव्हा हे कुटुंब अंत्यसंस्कारालाही उपस्थित होतं. "मार्टिन कॉवनी नसते, तर मला हे आयुष्य मिळालं नसतं," असं त्या म्हणतात.
 
मुदतपूर्व जन्मलेल्या बालकांचं प्रदर्शन मांडणं आणि त्यांना बघण्यासाठी प्रेक्षकांकडून शुल्क घेणं, या कृती आज अनैतिक मानल्या जातील, असं डॉ. रिचर्ट शॅन्लर म्हणतात. ते कोहेन चिल्ड्रन्स मेडिकल सेंटर, न्यूयॉर्क व नॉर्थवेल हेल्थ इथे नॉओनेटल सर्व्हिसेस विभागाचे संचालक आहेत. "पण आपण त्या काळाच्या संदर्भात याचा विचार करायला हवा," असं ते म्हणतात.
 
"आता नवीन तंत्रज्ञान आलेलं असल्यामुळे आपण नियंत्रित स्वरूपात चाचण्या करतो. पूर्वीच्या काळी हे शक्य नव्हतं, त्यामुळे उबवणी-पेट्यांचे लाभ दाखवून देण्यासाठी प्रदर्शनांचा वापर होत असे... कॉवनी व त्यांनी केलेल्या कामाचं बरंच ऋण आपल्यावर आहे." 

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IndvsEng: 5 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेल बद्दल तुम्हाला माहिती आहे का?