"माझं नाव राहुल सावरकर नाही तर राहुल गांधी आहे. सत्य बोललो, त्यासाठी माफी मागणार नाही. मरेन मात्र माफी मागणार नाही," असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं. राजधानी दिल्लीत आयोजित 'भारत बचाओ रॅली'मध्ये बोलताना ते बोलत होते.
इंग्रजांनी सावरकर यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. या शिक्षेत सूट मिळावी म्हणून सावरकरांनी माफी मागितली होती. या संदर्भात राहुल गांधी यांनी हे विधान केलं.
रांचीमधील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले होते, "नरेंद्र मोदी म्हणाले होते, मेक इन इंडिया, मात्र सध्या तुम्ही कुठेही पाहिल्यास 'रेप इन इंडिया' दिसतं.
उत्तर प्रदेशात मोदींच्या आमदारानं महिलेवर बलात्कार केला. नंतर पीडित महिलेचा अपघात झाला. मात्र, नरेंद्र मोदींनी अवाक्षरही काढला नाही." हाच धागा पकडत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपच्या इतर महिला खासदारांनी लोकसभा सभागृहात राहुल गांधींवर शाब्दिक हल्ला चढवला होता.
''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागायला हवी. आधी अर्थव्यवस्था ही आपली ताकद होती. विकासदर 9 टक्के होता. आज अर्थव्यवस्थेची काय स्थिती आहे?" असं राहुल यांनी विचारलं.
"नरेंद्र मोदी यांनी आसाममध्ये आग लावली. देशाला विभाजित केलं जात आहे आणि देशाची अर्थव्यवस्था नष्ट केली जात आहे,'' असं राहुल म्हणाले.
"सत्तेसाठी नरेंद्र मोदी काहीही करू शकतात. ते स्वतःचं मार्केटिंग करतात. ते दिवसभर टीव्हीवर दिसतात. भारतातले इतर नेते दिसत नाही. या जाहिरातींचे पैसे कोण देत आहे? जे लोक तुमचा पैसा लुटत आहे ते जाहिरातींचा पैसा भरत आहे," असं राहुल गांधी म्हणाले.
सोनिया गांधी यांच्या भाषणातील मुद्दे
भारत बचाओ रॅलीमध्ये सोनिया गांधी यांनी भाषण केलं. देशाला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन संघर्ष करावा असं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी म्हणाल्या.
देशाला वाचावायचं असेल तर आपल्याला कठोर संघर्ष करावा लागेल.
बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. युवकांसमोर अंधकार आहे. युवकांच्या भविष्यांसाठी तुम्ही संघर्ष करण्यास तयार आहात की नाही?
जेव्हा मी माझ्या अन्नदाता शेतकरी बांधवांकडे पाहते तेव्हा माझ्या मनाला यातना होतात. त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला देखील मिळत नाहीये.
छोटे व्यापारी, मजूर यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं आहे. मजुरांना, कामगारांना तर काम करून दोन वेळचं जेवण देखील मिळत नाही. या लोकांसाठी तुम्ही संघर्ष करण्यास तयार आहात की नाहीत असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला.
नवरत्न कंपन्या कुणाला विकल्या जात आहेत? सामान्य माणूस आपला पैसा ना बॅंकेत ठेऊ शकत नाहीये. हेच अच्छे दिन आहेत का?
हे लोक संविधान दिवस तर साजरा करतात पण रोज संविधानाचे तुकडे करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामुळे देशाचा आत्माच मारला गेल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या.
मोदी आणि शाह यांचं एक लक्ष्य आहे की लोकांना विभाजित करा आणि सत्तेवर ताबा ठेवा. लोकशाहीच्या संरक्षणासाठी आम्ही कोणतंही बलिदान देण्यास तयार आहोत.
जनतेच्या हक्कासाठी काँग्रेसने नेहमी संघर्ष केला आहे. आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत देश आणि संविधानांचं रक्षण करू असं सोनिया गांधी म्हणाल्या.