Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 31 March 2025
webdunia

'राज ठाकरे दबंग नाही उंदीर, महाराष्ट्राच्या बाहेर कधी निघाले नाहीत' : ब्रिजभूषण सिंह

raj thackeray
, मंगळवार, 10 मे 2022 (15:04 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या 5 जून रोजी अयोध्येचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला असून आज (10 मे) अयोध्येत ते यासंदर्भात शक्तीप्रदर्शन करत आहेत.
 
राज ठाकरे यांना अयोध्येत घुसू देणार नाही, अशी भूमिका आता ब्रिजभूषण सिंह यांनी घेतली आहे. अयोध्येत राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात आज मोर्चा काढण्यात आला आहे. यात साधू-संत सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
 
यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरे यांनी केला होता. त्यांनी माफी मागावी. ही संधी आहे त्यांच्यासाठी. आता त्यांनी माफी मागितली नाही तर पुन्हा उत्तर भारतात येऊ देणार नाही. 5 जूनसाठी आमची तयारी सुरू आहे. यात संतांचाही सहभाग आहे. संत जे सांगतील ते इथे होईल."
 
नवाबगंज ते नंदिनीनगपर्यंत ही रॅली काढली जात आहे. उत्तर भारतात लोक वाट पाहत होते की अशी संधी कधी येईल, असं म्हणत भाजपचे आमदार प्रतीक भूषण सिंह यांनीही राज ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली आहे.
 
ते म्हणाले, "राज ठाकरेंची दादागिरी इथे चालणार नाही. अयोध्यावासी संतांचं म्हणणं आहे की याठिकाणी राजकारण होत आहे. उत्तर भारतीयांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. अपमान केल्याचं त्यांनी मान्य करावं. सात-आठ वर्षं अयोध्येत कडवा संघर्ष झाल्यानंतर आज राज ठाकरे यांना रामाची आठवण झाली का?" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
 
"ते कसले दंबंग नेते? उंदीर आहेत, महाराष्ट्राच्या बाहेर कधी निघाले नाहीत," असं ब्रिजभूषण सिंह यांनी म्हटलंय.
 
ब्रिजभूषण सिंह पुढे म्हणाले, "मी सहा वेळा खासदार बनलो, माझी पत्नी एकवेळ खासदार आहे. मुलगा आमदार आहे. माझी आता कोणतीही राजकीय महत्त्वाकांक्षा नाही. मला मंत्री बनायचं नाही. हे आंदोलन जाती-धर्माशी संबंधित नाही. उत्तर भारतीय म्हणून आम्ही सर्व एकत्र आलोय."
 
माफी मागितली नाही तर झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश या तिन्ही देशात आयुष्यभर त्यांना येऊ देणार नाही. मराठी लोकांना आमचा विरोध नाही, आम्ही त्यांचं स्वागत करू. आमचा विरोध केवळ राज ठाकरेंना आहे, असंही ते पुढे बोलले आहेत.
 
काय आहे प्रकरण?
राज ठाकरे हे हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालण्याआधी उत्तर भारतीयविरोधी नेते म्हणून ओळखले जात होते. मनसेनं मराठी तरुणांच्या नोकऱ्यांवरून आंदोलन करताना अनेकदा मुंबई आणि परिसरातल्या उत्तर भारतीयांना टार्गेट केलं होतं.
 
उत्तर भारतीयांविरोधातल्या वक्तव्यांमुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध होत असल्याचं पहायला मिळत आहे.
 
ब्रिजभूषण सिंह हे भाजपचे खासदार असून त्यांनी राज ठाकरे यांना अयोध्येत पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यापूर्वीही दिला होता. अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 
राज ठाकरे योगी आदित्यनाथ यांचं कौतुक करत असले तरी राज ठाकरे यांनी उशीर केला आहे असंही त्याचं म्हणणं आहे.
 
"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली आहे.
 
"ही माझी वैयक्तिक मागणी आहे, यामागे कुठलही राजकारण नाही. मी स्वतःला रोखू शकत नाही. हे आजचं नाही. हे 2008 पासूनचं आहे. तेव्हापासून मी हे पाहात आहे. आज मुंबईच्या विकासात 80 टक्के योगदान हे बाहेरून आलेल्या लोकांचं आहे. त्यांनी मुंबई सोडली तर काय होईल? राज ठाकरे यांनी आधी चूक केली आहे. त्यांनी चूक सुधारावी अशी आमची मागणी आहे," असं ब्रिजभूषण यांचं म्हणणं आहे.
 
राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबईत सध्या मनसे त्यासाठी मोठ्या प्रमाणावर होर्डिंगबाजी करत आहे.
 
'अयोध्या दौरा हा राष्ट्रीय प्रश्न नाही'
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय नेत्यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलं आहे.
 
अयोध्येला जाणं हा राष्ट्रीय प्रश्न नाही. लोकांचं लक्ष हटवण्यासाठी असे मुद्दे समोर आणले जातात, असं शरद पवार म्हणाले आहेत.
 
शरद पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी नुकताच अयोध्येचा दौरा केला. तर राज ठाकरे येत्या 5 जूनला तर आदित्य ठाकरे 10 जून रोजी अयोध्येला जाणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक शहरात मारहाणीच्या घटनांना ऊत; दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जखमी