Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे : विधानसभेच्या निकालानंतर मनसेचं इंजिन पुन्हा एकदा यार्डात?

राज ठाकरे : विधानसभेच्या निकालानंतर मनसेचं इंजिन पुन्हा एकदा यार्डात?
, शनिवार, 26 ऑक्टोबर 2019 (10:43 IST)
विधानसभा निवडणुकीच्या निकालातून महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला कौल दिल्याचं स्पष्ट झालं. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसोबतच इतर पक्षांनीही या निवडणुकीत राज्यातलं आपलं स्थान आजमावण्याचा प्रयत्न केला.
 
मात्र प्रमुख चार पक्ष सोडता इतर पक्षांना या निवडणुकीत फारसे यश मिळालेले उदाहरण दिसत नाही. हे राजकीय पक्ष एखाद्या प्रदेशापुरते मर्यादित असल्याचं दिसून आलं. मात्र मनसेला केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघात यश मिळाले आहे.
 
निकालाचा विचार करता इतर पक्षांमध्ये एमआयएम पक्षाला दोन जागांवर तेही खान्देशात यश मिळाले आहे. मुंबई किंवा मराठवाडा तसेच सोलापूर या एमआयएमला मतं मिळू शकतील अशा भागामध्ये त्या पक्षाला यश मिळालेले नाही.
 
बहुजन विकास आघाडीने वसई-विरारजवळ आपलं स्थान कायम राखलं आहे. या पक्षाला तिथं तीन जागांवर विजय मिळाला आहे.
 
प्रहार जनशक्ती आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी 2 जागा मिळाल्या आहेत. बाकी इतर लहान पक्षांना एकेका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. यामध्ये माकप, जनसुराज्य शक्ती, क्रांतीकारी शेतकरी पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष, स्वाभिमान पक्ष, यांचा समावेश आहे.
 
शेतकरी कामगार पक्षाला यंदा रायगड जिल्ह्यात एकही जागा मिळालेली नाही. नांदेड जिल्ह्यात लोहा इथं या पक्षाला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. तर 13 अपक्षांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आहे.
 
मनसेचं पुन्हा 'एकला चलो रे'
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना 2006 साली झाली. त्यानंतर झालेल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत म्हणजे 2009 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 13 जागा जिंकता आल्या. एका नवख्या पक्षाला इतक्या जागा मिळालेल्या पाहून तेव्हा सर्वच राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
 
परंतु ही स्थिती पुढे टिकली नाही. 2014 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा केवळ एकच आमदार जिंकून विधानसभेत गेला. जुन्नर मतदारसंघात शरद सोनवणे यांचा विजय झाला होता. शरद सोनवणे यांनी मनसे सोडून शिवसेनेत प्रवेश केला. (या निवडणुकीत शरद सोनवणे यांचा शिवसेनेच्या तिकिटावर पराभव झाला.)
 
राजू रतन पाटील
कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेच्या राजू पाटील यांना 93818 मते मिळाली तर शिवसेनेच्या रमेश म्हात्रे यांना 86668 मते मिळाली आहेत. राजू पाटील यांच्या मतांचा विचार केल्यास त्यांना 47.46 टक्के मते मिळाल्याचे दिसून येते.
 
रमेश म्हात्रे यांना 43.84 टक्के मते मिळाली आहेत तर वंचित बहुजन आघाडीच्या अमोल केंद्रे यांना 6189 मते मिळाली आहेत.
 
मनसेच्या भूमिकेतील बदल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेमध्ये सातत्य नाही असा त्यांच्यावर आरोप होतो. प्रत्येक निवडणुकीमध्ये बदलणारी भूमिका, निवडणूक लढणार की नाही याबद्दल साशंकता यामुळे अनेकदा पक्षाच्या भूमिकेबाबत अनिश्चितता निर्माण होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळेस राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टी यांच्याविरोधात घेतलेली आक्रमक भूमिका निवडणूक संपताच विरून गेली.
 
त्यानंतर विधानसभा निवडणुकीची घोषणा होईपर्यंत मनसेकडून फारशी हालचाल झाली नाही असं निरीक्षण लोक नोंदवत होते. राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आल्य़ावर मुंबई आणि परिसरात मोठं गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. त्यांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जाण्याला प्रसिद्धीही मिळाली. मात्र त्यानंतरही राज ठाकरे यांनी त्या चौकशीबाबत फार स्पष्टपणे भूमिका मांडली नाही किंवा निवडणूक प्रचारात त्यामुळे आक्रमकता आणली नाही. ही सर्व अनिश्चितताच पक्षाच्या यशात अडथळे आणत असावी असं मत राजकीय विश्लेषक नोंदवतात.
 
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यावर लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं, "राज ठाकरेंनी जर ही निवडणूक लढवली नसती, तर ते आत्महत्येचं पाऊल ठरलं असतं. कारण पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी 13 आमदार दिले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा एकच आमदार निवडून आला होता. पण चढउतार प्रत्येक पक्षात येतातच. पण पक्षाचा जिवंतपणा टिकवण्यासाठी निवडणूक लढवणं, ही एक अपरिहार्य बाब आहे. कारण आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेत निवडणुकीला सर्वात जास्त महत्त्व असतं. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे."
 
मनसेनं निवडणूक लढवली तर त्यांचा प्रभाव असेल्या प्रदेशात त्यांना फायदा होऊ शकतो असं मत पात्रुडकर यांनी व्यक्त केलं होतं.
 
त्यांनी म्हटलं होतं, "आता जरी त्यांच्यावर आरोप, ईडीची चौकशी असे विषय असले तरी राज ठाकरेंविषयीचं तरुणांच्या मनातलं आकर्षण कमी झालेलं नाही. नाशिक, पुणे, औरंगाबादचा शहरी भाग यामध्ये तरुणांच्या मनात राज ठाकरेंविषयी आकर्षण आहे. आज ना उद्या हा माणूस आपल्याला चांगलं नेतृत्त्वं देईल, असं तरुणांच्या मनात आहे. त्या भावनेचं भांडवलं करून बऱ्याच ठिकाणी तरुणांची मतं निर्णायक ठरू शकतात. कारण विधानसभेची आघाडी चार हजार - तीन हजार इतकी कमी असते. बऱ्याचदा छोट्या फरकाने विजय होतो. ज्याठिकाणी मनसेचा प्रभाव आहे किंवा निर्माण होईल त्याठिकाणी मनसेची मतं महत्त्वाची - निर्णायक ठरू शकतात."
 
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मनसेने निवडणूक लढवण्याने काही फरक पडणार नाही असं मत व्यक्त केलं होतं.
 
"ही निवडणूक नेत्यांची नाही तर सैनिकांची"
मनसेच्या या निवडणुकीबाबत 'दगलबाज राज' या पुस्तकाचे लेखक कीर्तिकुमार शिंदे यांनी बीबीसी मराठीकडे आपलं मत व्यक्त केलं.
 
त्यांनी म्हटलं, "लोकसभा निवडणूक मनसेने लढवली नाही, मात्र तरीही संपूर्ण प्रचाराच्या केंद्रस्थानी राज ठाकरे हेच एकमेव नेते होते. विधानसभा निवडणुकीत मात्र असं चित्र दिसलं नाही. विधानसभा निवडणूक ही मनसेचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जोरावर लढवलेली निवडणूक आहे, असं माझं निरीक्षण आहे. राजू पाटील वगळता मनसेच्या एकाही नेत्याने निवडणूक लढवली नाही. याउलट 2014मध्ये मनसेचे अनेक नेते, सरचिटणीस निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता आणि सामाजिक-राजकीय प्रतिष्ठा होती, ज्यांचे चेहरे लोकांना परिचित होते, अशांनी निवडणूक का लढवली नाही, हा एक प्रश्नच आहे."
 
"या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मनसेची दुसरी फळी आपोआप पुढे आली. मनसेचे विभाग अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचे नाव प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत, मीडियापर्यंत पोहोचले. माझ्या मते, ह्या निवडणुकीने मनसेला काय दिलं असेल, तर पक्षाला नवे चेहरे दिले. हेच चेहरे भविष्यात पक्षाचे नगरसेवक- आमदार बनलेले आपल्याला दिसतील," असंही शिंदे यांनी म्हटलं.
 
प्रचाराला जास्त वेळ मिळाला नाही
निवडणूक लढविण्याचा निर्णय उशीरा जाहीर झाल्यामुळे मनसैनिकांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही, असं मतही कीर्तिकुमार शिंदे व्यक्त करतात.
 
ते म्हणतात, "मनसेच्या उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाला. मनसे नेतृत्वाने निवडणूक लढण्याचा निर्णय लोकसभेनंतर लगेचच जाहीर केला असता, तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं."
 
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर तात्काळ नेत्यांना दिशा देणार, थेट विचार स्पष्ट करणारं वक्तव्य केलं असतं किंवा उमेदवार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला असता तर चित्र वेगळं असतं असंही मत ते व्यक्त करतात.
 
इथं थोडा जोर लावला असता तर....
मनसेला केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघात यश मिळालं असलं तरी इतर अनेक मतदारसंघात या राजकीय पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत.
 
या नऊ मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आदित्य ठाकरे: शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस खरंच एकत्र आले तर मुख्यमंत्रिपद कुणाला?