Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाकिस्तानात कबर खोदून मुलीच्या मृतदेहावर बलात्कार? वाचा- काय आहे सत्य?

Webdunia
- मोहम्मद सुहैब
मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका कबरीवर लोखंडी गेट बसवल्याचा फोटो व्हायरल होतोय.
 
अनेक माध्यमांनी असं म्हटलंय की ही कबर पाकिस्तानमधील एका मुलीची आहे. मुलींच्या कबरी खोदून त्यांच्यावर बलात्कार होत असल्यामुळे कबरीवर गेट लावलं आहे.
 
फॅक्ट चेक करणाऱ्या ऑल्ट न्यूज या प्लॅटफॉर्मने या व्हायरल सोशल मीडिया पोस्टची सत्यता पडताळली असून ही एक फेक न्यूज असल्याचं त्यांनी म्हटलंय. सदर कबर ही पाकिस्तानमधील नसून हैदराबाद येथील असल्याचं ऑल्ट न्यूजने म्हटलंय.
 
सत्यता न पडताळता बातम्या प्रकाशित केल्याबद्दल भारत आणि पाकिस्तानातील माध्यमांवर सडकून टीका केली जात आहे.
 
यात एएनआय, एनडीटीव्ही, वर्ल्ड इन वन न्यूज, हिंदुस्तान टाईम्स, टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडिया टुडे यांसारख्या या डिजिटल प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. या माध्यमांनी ही बातमी प्रसिद्ध केली होती.
 
ही फेक न्यूज व्हायरल कशी झाली?
हारिस सुलतान या ट्विटर यूजरने पहिल्यांदा ही बातमी ट्विट केली होती. ऑल्ट न्यूजने या बातमीची सत्यता तपासल्यानंतर सुलतानने त्याचं ट्विट हटवलं आणि माफीही मागितली. शिवाय एएनआय या वृत्तसंस्थेने देखील आपली बातमी मागे घेत याविषयीचं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
ऑल्ट न्यूजने या बातमीची सत्यता पडताळल्यानंतर कोणत्या गोष्टी समोर आल्या ते जाणून घेऊ.
 
या कबरीवर लोखंडी गेट लावलं कारण..
हैदराबादमधील या कबरीवर हिरव्या रंगाचा लोखंडी गेट बसवण्यात आलंय. त्याला एक कुलूप देखील लावण्यात आलंय. या कबरीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं.
 
सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाल्यानंतर ही कबर पाकिस्तान मध्ये असल्याचे दावे करण्यात आले. यासंदर्भात काहींनी ट्विट करत म्हटलं की, मुलींच्या मृत्यूनंतरही काही लोकं कबरी खोदून त्यांच्यावर बलात्कार करीत आहेत. याच भीतीने त्यावर गेट आणि कुलूप बसवण्यात आलेत.
 
काही माध्यमांनी या ट्वीटचा आधार घेऊन बातम्या प्रकाशित केल्या. पण ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांनी याची चौकशी केल्यावर या कबरी मागचं खरं सत्य समोर आलं.
 
हैदराबादमधील कबर
ऑल्ट न्यूजने केलेल्या पडताळणीत काही गोष्टी उघड झाल्या. त्याप्रमाणे हैदराबाद शहरातील मदानापत भागातील दाराब जंग कॉलनीत सालार मलिक मशिदीसमोर असलेल्या दफनभूमीत ही कबर आहे.
 
ऑल्ट न्यूजने या परिसरात राहणाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क केला. त्यांनी मशिदीच्या मुअज्जिन म्हणजेच अजान देणाऱ्या व्यक्तीशी संपर्क केल्यावर त्यांना कबरीविषयी माहिती मिळाली. या कबरीला भेट देऊन त्यांनी एक व्हीडिओ बनवला. यात मुअज्जिन यांनी सांगितलं की, कबरीवर गेट बसविण्याचा मुद्दा मस्जिद कमिटीसमोर आला होता.
 
त्यांनी पुढे सांगितलं की, गेट बसविण्याचं पहिलं कारण म्हणजे काही लोकांनी आमची परवानगी न घेता आधीच अस्तित्वात असलेल्या कबरी खोदून मृतदेह पुरले आणि त्यावर कबर बांधली. तर दुसरं कारण म्हणजे ही कबर दफनभूमीच्या अगदी समोरच असल्याने लोक त्यावर चढून आत येऊ नयेत अशी भीती होती.
 
ऑल्ट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, ही कबर 70 वर्षांच्या एका महिलेची असून लोखंडाचं हे गेट त्यांच्या मुलाने बसवलं आहे.
 
ऑल्ट न्यूजचे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर यांनी या बातमीची सत्यता तपासल्यानंतर भारतातील लोकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. पण यानिमित्ताने भारतातील पत्रकारितेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. तर दुसरीकडे काही लोकांनी मोहम्मद जुबेरवर पाकिस्तानचा बचाव करत असल्याचे आरोप केले आहेत.
 
फेक न्यूजचा वाढता ट्रेंड आणि विभागलेल्या राजकीय विचारसरणीमुळे पत्रकार मोहम्मद झुबेर आणि त्यांची संस्था ऑल्ट न्यूजला बऱ्याचदा लक्ष्य करण्यात आलंय.
 
मागच्या वर्षी मोहम्मद जुबेर यांनी धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.
 
ज्या ट्विटर अकाऊंटवरून कबरीचा फोटो ट्वीट करण्यात आला ते अकाऊंट हारिस सुलतान नामक व्यक्तीचं आहे. त्यांनी स्वत:ची ओळख पूर्वाश्रमीचे मुस्लिम अशी करून दिली आहे, शिवाय यासंदर्भात एक पुस्तकही लिहल्याचं सांगितलं आहे.
 
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, "पाकिस्तानी समाज वासनांध झाला असून दफन केलेल्या मुलींना बाहेर काढून त्यांच्यावर बलात्कार केले जात आहेत. यापासून वाचण्यासाठी कबरींना कुलूपं लावली जात आहेत."
 
एका यूजरने लिहिलंय की, "इस्लामविरोधी व्यक्तीने हा दावा केल्यानंतर भारतीय माध्यमांनी प्रॉपोगन्डा निर्माण करण्यासाठी या फेक न्यूजचा वापर केला."
 
हा फोटो भारतात तर शेअर झालाच होता, पण पाकिस्तानातही हा फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला. कारण यापूर्वी पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी महिलांच्या मृतदेहांवर बलात्कार झाल्याच्या बातम्या दिल्या होत्या.
 
मारिया नामक एका युजरने ट्वीट करत म्हटलंय की, "ज्या पाकिस्तानी लोकांनी हा फोटो शेअर करत आपल्या देशाला नरक म्हटलंय त्यांनी याविषयी खेद व्यक्त केला पाहिजे."
 
अनस नावाच्या एका युजरने म्हटलंय की, "अशा गोष्टींमुळे बातम्यांची सत्यात तपासली पाहिजे. कारण आपल्याला जे सत्य वाटतं त्या प्रत्येक गोष्टीचं आपण समर्थन करतो."
 
तजय्यन नामक एका युजरने मोहम्मद झुबेर यांचं ट्वीट-थ्रेड शेअर करत म्हटलंय की, "हा थ्रेड अशा सर्व लोकांसाठी आहे जे बातम्यांची पडताळणी न करता लगेचच चुकीच्या बातम्या पसरवतात."
 
पत्रकार फरजाना शाह यांनी पाकिस्तानी नेत्यांवर टीका करताना म्हटलंय की, मागील दोन वर्षांपूर्वी ईयू डीएस इन्फोलॅबने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात म्हटलंय की, भारताची एएनआय ही वृत्तसंस्था पाकिस्तानविरोधी प्रचार करते आहे. याविषयी बीबीसीने सविस्तर अहवालही प्रकाशित केला होता.
 
फरजाना शाह म्हणतात, "पाकिस्तानी नेते आपल्या कामाच्या मागे लागलेत. पण एएनआय मात्र पुन्हा एकदा खोटा प्रचार करण्यात यशस्वी झाली आहे."

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments