शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या आरोपांना आज (16 फेब्रुवारी) भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं. रश्मी ठाकरेंनी अलिबागमधल्या 19 बंगल्यांचा कर भरल्याचं ते म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले, "रश्मी ठाकरेंचे बंगले नाही तर त्यांनी कर कसा भरला? अलिबाग मधील 19 घरांचा टॅक्स रश्मी उद्धव ठाकरे यांनी भरला आहे. तसंच मनिषा वायकर यांनीही टॅक्स भरला. बंगला जर ठाकरेंच्या नावावर नाही तर टॅक्स का भरला?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
12 नोव्हेंबर 2020 रोजी रश्मी उद्धव ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी या 19 बंगल्यांचा टॅक्स कोरलाई ग्रापंचायतीला भरला आहे. दोन वर्षांचा मालमत्ता कर भरला आहे. याआधीचा सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांच्या नावे आहे. संजय राऊत तुम्ही कोणाला जोड्याने मारणार आहात? असा उलट प्रश्न सोमय्यांनी आता केला आहे.
किरीट सोमय्या यांनी आरोप केला होता की ठाकरे कुटुंबाचे अलिबाग येथे 19 बंगले आहेत, त्यांनी मला हे बंगले दाखवावेत असं आव्हान संजय राऊत यांनी सोमय्यांना दिलं होतं. त्यांना प्रतिआव्हान देत सोमय्या म्हणाले, "अलिबागला 19 बंगले आहेत की नाही हे पहायला रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांना घेऊन जा."
"11 नोव्हेंबर 2020 ला अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे व्यवसायिक संबंध मी उघड केले होते. अन्वय नाईक यांनी 2008 मध्ये बांधले होते. हा ठाकरे सरकारनेच दिलेला रेकॉर्ड आहे. 2009 पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे," असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
माझ्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर खुशाल चौकशी करा, मी एक दमडीची चूक केलेली नाही अंसही सोमय्या यांनी म्हटलं आहे.
कोव्हिड केंद्रातील घोटाळ्यातील आरोपींना अटक का केली नाही असाही प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.