Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं?

ही आहेत टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं?
न्यूझीलंडने टीम इंडियाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही. ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर इथं झालेल्या सेमी फायनलच्या लढतीत न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली. पावसाचा फटका बसलेल्या या लढतीत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 239 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाचा डाव 221 धावात आटोपला. काय आहेत टीम इंडियाच्या पराभवाची कारणं?
 
टॉप ऑर्डरचं अपयश
बॅटिंग करताना सुरुवातीची 45 मिनिटं आमच्या पराभवाला कारणीभूत ठरली असं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितलं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा भन्नाट फॉर्मात होता. प्राथमिक फेरीत रोहितने पाच शतकांसह 647 धावांचा डोंगर उभारला. रोहितने पाच शतकं झळकावताना टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला होता. सेमी फायनलच्या लढतीत रोहितकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला सलामीला बढती देण्यात आली होती.
 
सेमी फायनलच्या लढतीत बॉल खेळायचा की सोडायचा अशा द्विधा मनस्थितीत राहुल अडकला आणि बॉल बॅटची कड घेऊन गेला. जगभरात सगळीकडे सातत्याने धावांच्या राशी ओतणारा विराट कोहली सेमी फायनलमध्ये अपयशी ठरतो असा इतिहास होता. 2011 आणि 2015 वर्ल्ड कपमध्ये विराट डावखुऱ्या फास्ट बॉलरसमोर आऊट झाला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत विराट डावखुऱ्या ट्रेंट बोल्टच्या वेगवान आणि टप्पा पडून आत आलेल्या चेंडूसमोर निरुत्तर झाला. या तिघांनी मिळून प्रत्येकी एका धावेचं योगदान झालं आणि टीम इंडियाची अवस्था 5 बाद 3 अशी झाली. या धक्क्यातून टीम इंडिया सावरलीच नाही.
 
मिडल ऑर्डर क्रायसिस
वर्ल्ड कपसाठी संघनिवड जाहीर वेळेपासून चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार याविषयी प्रचंड चर्चित होता. निवडसमितीने चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरच्या नावाला पसंती दिली. विजय हा थ्री डायमेन्शल प्लेयर आहे असं निवडसमितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी सांगितलं. विजय बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही विभागात योगदान देतो असं प्रसाद यांचं म्हणणं होतं. शंकरची निवड करताना निवडसमितीने अंबाती रायुडूला डच्चू दिला. 2015 ते 2019 या कालावधीत रायुडूची कामगिरी उत्तम होती. वर्ल्ड कप आधीच्या दौऱ्यांमध्ये रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळत होता. मात्र आयत्यावेळी निवडसमितीने विजय शंकरला मधल्या फळीचा भाग बनवलं. त्याचवेळी दिनेश कार्तिक आणि केदार जाधव यांचीही निवड केली.
 
वर्ल्ड कपमध्ये राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शिखर धवन दुखापतग्रस्त झाला. ही दुखापत गंभीर असल्याने शिखर वर्ल्ड कपमध्येच खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. यामुळे चौथ्या क्रमांकावरून सलामीला बढती देण्यात आली. विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. पाकिस्तानविरुद्धचा अपवाद सोडला तर त्याला गोलंदाजीही देण्यात आली नाही. दुखापतीमुळे विजय शंकर वर्ल्ड कप खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं आणि त्याच्या जागी अनुनभवी ऋषभ पंतला घेण्यात आलं. पंत चौथ्या क्रमांकावर खेळला. मात्र त्याला मोठी खेळी करता आली नाही. सेमी फायनलच्या लढतीततही ऋषभने दर्जेदार माऱ्यासमोर आश्वासक सुरुवात केली. मात्र स्थिरावलाय असं वाटत असतानाच ऋषभ बाद झाला. मधल्या फळीत सुरुवातीला केदार जाधव अंतिम संघात होता. मात्र केदारला लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने दिनेश कार्तिकला संघात घेण्यात आलं. मात्र दिनेश कार्तिकही अपयशी ठरला. महेंद्रसिंग धोनी पाचव्या क्रमांकावर खेळला. त्याला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात यावं अशी ओरड झाली. मात्र तसं झालं नाही. रोहित शर्मा, राहुल आणि विराट कोहली यांच्या तुलनेत मधल्या फळीला एकदाही दमदार कामगिरी करता आली नाही.
 
डॉट बॉलचं प्रेशर
टीम इंडियाला 300 चेंडूत 240 धावा हव्या होत्या. रुढार्थाने हे सोपं समीकरणं होतं. मात्र न्यूझीलंडने तब्बल 180 डॉट बॉल टाकत टीम इंडियाला अडचणीत टाकलं. ट्रेंट बोल्ट (36), मॅट हेन्री (42), लॉकी फर्ग्युसन (36), कॉलिन डी ग्रँडहोम (4), जेम्स नीशाम (22) आणि मिचेल सँटनर (40) या सगळ्यांनी मिळून टीम इंडियाला मुक्तपणे धावा करून दिल्या नाहीत.
 
न्यूझीलंडने अक्षरक्ष टीम इंडियाला जखडून ठेवलं. निर्धाव चेंडूंचं प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त झाल्याने रनरेट वाढतच गेला आणि वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न दूरच राहिलं.
 
न्यूझीलंडचं बेसिक्स घोटीव
वर्ल्ड कपमध्ये सातत्याने सेमी फायनल गाठणाऱ्या संघांमध्ये न्यूझीलंडचा समावेश होतो. काहीतरी चमत्कृतीपूर्ण करण्यापेक्षा छोट्या छोट्या गोष्टी चोख करण्याकडे न्यूझीलंडचा भर असतो. कॅचेस, रनआऊट्स आणि फिल्डिंग या गोष्टी दुर्लक्षित राहतात. मात्र न्यूझीलंडचे खेळाडू या बाबतीत नेहमीच उजवे असतात. त्यांच्या हातून सहसा कॅचेस सुटत नाहीत. जिथे दोन धावा मिळू शकतात असं वाटतं तिथे एकच धाव मिळते. मार्टिन गप्तीलने धोनीला केलेलं रनआऊट या मॅचचा टर्निंग पॉइंट होता.
 
महेंद्रसिंग धोनी पिचवर असेपर्यंत काहीही होऊ शकतं याची जाणीव न्यूझीलंडच्या खेळाडूंना होतं. रनिंग बिटवीन द विकेट्सच्या बाबतीत धोनी अव्वल आहे. दुसरी धाव घेण्याचा धोनीचा प्रयत्न गप्तीलच्या अफलातून फेकीने संपुष्टात आणला. फाईनलेगला क्षेत्ररक्षण करणाऱ्या गप्तीलने झपाट्याने चेंडूवर पकड मिळवली आणि वायूवेगाने बॉल स्टंप्सच्या दिशेने फेकला. जेमतेम एक स्टंप दिसत असतानाही गप्तीलने अचूकपणे स्टंप्सचा वेध घेतला आणि धोनी आऊट झाला.
 
आव्हानात्मक पिच
ओल्ड ट्रॅफर्डचं पिच खऱ्या अर्थाने परीक्षा पाहणारं होतं. खेळपट्टी संथ स्वरुपाची होती. त्यामुळे खेळपट्टीवर आल्या आल्या फटकेबाजी करणं अवघड होतं. बॉल स्विंग होत होता. पावसामुळे दोन दिवसात खेळवण्यात आल्याने पिच कव्हर करण्यात आलं होतं. त्याचा फायदा न्यूझीलंडच्या बॉलर्सना मिळाला. खेळपट्टी फिरकीलाही साथ देत होती. त्यामुळे अत्यंत सावध आणि संयमीपणे खेळणं गरजेचं होतं. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तेच केलं. त्यांनी स्थिरावण्यासाठी बराच वेळ घेतला. टीम इंडियाकडून रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनीच खेळपट्टीला अनुसरून खेळ केला. बाकीच्यांनी साथ न दिल्याने टीम इंडियाच्या पदरी पराभव पडला.
 
प्राथमिक फेरीत टीम इंडियाने 9 पैकी 7 सामने जिंकले. भारताने पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि श्रीलंका यांना नमवलं. न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. यजमान इंग्लडविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
 
प्राथमिक फेरीत जबरदस्त प्रदर्शनासह टीम इंडियाने 15 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं होतं. मात्र सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या सर्वसमावेशक कामगिरीने टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आणलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अंधश्रद्धेचा कळस विवाहितेला उपाशी ठेवणे, मध्यरात्री दर्गा साफ करायला लावणे कासवाला आंघोळ