Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RFO दीपाली चव्हाण यांची DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या?

RFO दीपाली चव्हाण यांची DFO विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या?
, शुक्रवार, 26 मार्च 2021 (19:43 IST)
नितेश राऊत
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरीसाल रेंजच्या RFO दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. सायंकाळी 7 च्या सुमारास त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचामुळे आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोट मध्ये लिहून ठेवलंय.
याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे DFO विनोद शिवकुमार यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी धारनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना आता नागूपरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
यापूर्वीही शिवकुमार यांच्यावर एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप झाला आहे.
दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशन तसेंच शिवसेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे.
DFO शिवकुमार यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दीपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी केली आहे.
ते म्हणाले "शिवकुमार दिपालीला प्रचंड त्रास द्यायचे. ती वारंवार माझ्याकडे सांगायची. पण तिची दखल वरिष्ठ अधिकारी घेत नव्हते. तिच्यावर अॅट्रोसिटीचा खोटा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
अॅट्रोसिटी संदर्भात दीपाली आणि शिवकुमार यांच्यात झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग माझ्याकडे अजूनही आहे. त्यात त्यांनी भारी शिवीगाळ केली होती. त्यांच्या जाचामुळे दिपालीने आत्महत्या केली आणि ते पसारही झाले. त्यांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे," अस मोहिते म्हणाले.
"काही महिन्यांपूर्वी दीपाली पतीसह बदली संदर्भात मला भेटायला आल्या होत्या. मेडिकल कारणासाठी त्या सुट्टीवर होत्या. ड्युटीवर रुजू झाल्या नव्हत्या, त्यानंतर हरीसाल वरून बदली साठी त्या माझ्या ऑफिसला मला भेटल्या होत्या," अशी प्रतिक्रिया मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांनी दिली आहे.
"मी त्यांना बदलीसाठी रीतसर अर्ज करायला सांगितला. बदली प्रक्रिया माझ्या हाती नसून यासंदर्भातले निर्णय शासनाकडे असल्याचं मी त्यांना सांगितले. DFO शिवकुमार त्रास देत असल्याच त्यांनी तोंडी सांगितले होते. तशी लेखी तक्रार त्यांनी केली नव्हती," असा दावा रेड्डी यांनी केलाय.
"कारवाई करायची का असं म्हटल्यानंतर नको सर ते आणखी त्रास देतील अस म्हणत त्या निघून गेल्या," असं पुढे रेड्डी यांनी सांगितलं.
RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने वन विभागात चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चार पानांच्या स्यूसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक खुलासे दीपाली चव्हाण यांनी केले आहे.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अप्पर मुख्य प्रधान वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना स्यूसाईड नोट लिहून त्यात DFO विनोद शिवकुमार त्रास देत असल्याच लिहून ठेवलंय.
धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी स्यूसाईड नोटबद्दल माहिती दिली आहे.
"DFO विनोद शिवकुमार हे गावकरी आणि इतर कर्मचाऱ्यासमोर अश्लील शिवीगाळ करतात, अपमान करतात. करण नसताना रात्री भेटायला बोलावतात. त्यांचं ऐकलं नाही की निलंबनाची धमकी देतात," अस दीपाली चव्हाण यांनी चार पानांचा स्यूसाईड नोट मध्ये लिहून ठेवलंय.
"यापूर्वी रेड्डी यांच्याकडे वारंवार तक्रार करूनही कुठलीच कारवाई केली नसल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करण्यात आला आहे. IFS अधिकारी ही IFS अधिकाऱ्यांचीच बाजू घेणार असाही उल्लेख चिट्ठीत करण्यात आला आहे. गर्भवती असतांना मला ट्रॅकवर बोलावलं जायचं. गर्भवती असतांनाही मालूरच्या कच्च्या रस्त्यावरून मुद्दामून फिरवलं जायचं. त्यामुळं माझा गर्भपात झाला. तरीही मला ड्युटीवर बोलावण्यात आलं. 'अट्रोसिटीच्या' धमक्या मिळायच्या. चार महिने जेलमध्ये गेल्यावर कस वाटेल अशाही धमक्या दिल्या जायच्या," असं त्यांनी स्यूसाईड नोटमध्ये म्हटलंय.
"DFO शिवकुमार हे नेहमी माझं आर्थिक आणि मानसिक नुकसान कस होणार याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचे. अनेकदा त्यांनी मला एकटं बोलावून माझ्या एकटेपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या मर्जीने वागत नसल्यामुळे ते त्रास द्यायचे. माझं वेतन त्यांनी रोखून धरलय. माझ्या मृत्यूनंतर तरी रोखलेले वेतन तात्काळ काढावं आणि याचा लाभ माझ्या आईला द्यावा," अशी विनंती दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या स्यूसाईड नोट मध्ये केली आहे.
पती राजेश मोहिते यांना शेवटच्या कॉलवर तुमच्यासाठी खिचडी करून ठेवते तुम्हाला शेवटच बघायचं आहे, असं म्हणून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हिमंत बिस्व सरमा : 'ईशान्य भारताचे अमित शहा' आसामचे मुख्यमंत्री होणार का?