Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

समीर वानखेडे : 'मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा काही लोकांचा प्रयत्न'

समीर वानखेडे : 'मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा काही लोकांचा प्रयत्न'
, रविवार, 24 ऑक्टोबर 2021 (23:23 IST)
"मला असा संशय आहे की मला खोट्या प्रकरणात गुंतवण्यासाठी काही लोक प्रयत्न सुरू केले आहेत," अशी चिंता एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी व्यक्त केलीय. त्यांनी तसं पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांना लिहिलं आहे.
 
"ड्रग्ज प्रकरणात झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी NCB पोलीस महासंचालकांना माझ्या वरिष्ठांनी पत्र पाठवलंय. मला जेलमध्ये टाकण्याची आणि सेवेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आलीय," असं समीर वानखेडेंनी पत्रात म्हटलंय.
 
तसंच, "माझी तुम्हाला विनंती आहे की खोट्या प्रकरणात कारवाई करू नये," असंही वानखेडे म्हणालेत.
 
आर्यन खान ड्रग्जप्रकरणी समीर वानखेडेंची चौकशी होणार का?
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानं आता नाट्यमय वळणं घेण्यास सुरुवात केलीय. या प्रकरणातील साक्षीदर असलेल्या प्रभाकर साईल यांनी NCB चे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडेंवर खंडणीचे आरोप केल्यानंतर आता NCB चे उपमहासंचालक अशोक मुथा जैन यांनी प्रसिद्धीपत्रक जारी केलंय.
 
या पत्रकात अशोक मुथा जैन यांनी म्हटलंय की, प्रभाकर साईल यांचे आरोप एनसीबीचे मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी फेटाळले आहेत.
 
तसंच, प्रभाकर साईल साक्षीदार असल्याने त्यांनी हे प्रतिज्ञापत्र कोर्टासमोर दाखल करायला हवं होतं, असंही ते म्हणाले.
 
मात्र, "प्रभाकर साईल यांच्या प्रतिज्ञापत्रातील माहिती दक्षतेशी (Vigilance Matter) संबंधित असल्यानं मी हे NCB च्या महासंचालकांना पाठवतोय आणि त्यांना पुढील कारवाईची विनंती करतोय," असंही अशोक मुथा जैन म्हणाले.
 
त्यामुळे येत्या काळात एनसीबीकडूनच समीर वानखडेंची चौकशी होणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
 
प्रभाकर साईल कोण आहेत?
प्रभाकर साईल असं या साक्षीदाराचं नाव असून त्यांचं नाव NCB कडून जाहीर करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात 9 साक्षीदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावरच होतं.
 
प्रभाकर यांनी या प्रकरणी NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर 8 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला आहे.
 
प्रभाकर साईल यांच्या व्हीडिओत काय आहे?
साक्षीदार प्रभाकर साईल यांचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं.
 
या व्हीडिओमध्ये प्रभाकर साईल यांनी फक्त समीर वानखेडेच नव्हे, तर किरण गोसावी आणि सॅम नामक एका व्यक्तीचा उल्लेख केल्याचं दिसून येतं.
 
साक्षीदार प्रभाकर साईल यांनी त्यांच्या व्हीडिओतून अनेक गंभीर आरोप केले आहेत.
 
प्रभाकर साईल यांची बाजू जशीच्या तशी:
"मी मूळचा मुंबईचा आहे. 22 जुलै 2021 पासून मी किरण गोसावी यांच्याकडे बॉडीगार्ड म्हणून कामास रुजू झालो. 30 जुलै रोजी मी ठाण्यात हिरानंदानी परिसरातील विजयनगरी भागात गोसावी यांच्याकडेच राहण्यासाठी गेलो. 8 सप्टेंबरला ते घर सोडून आम्ही वाशीला सेक्टर 28 ला शिफ्ट झालो.
 
27 सप्टेंबरला किरण गोसावी अहमदाबादला निघून गेले. 1 ऑक्टोबरला रात्री अचानक त्यांचा फोन आला. आम्ही अहमदाबादवरून बाय रोड निघालो असून तू रेडी राहा, असं मला गोसावी यांनी सांगितलं.
 
2 ऑक्टोबरला सकाळी 7.30 वाजता किरण गोसावी यांचा फोन आला. त्यांनी मला CST ला पोहोचायला सांगितलं. लोकेशन NCB ऑफिसचं होतं
 
मी गेलो तर गोसावी यांची वर मिटिंग सुरू आहे, असं मला सांगण्यात आलं.
 
सकाळी पावणे दहाच्या NCB चे अधिकारी खाली आले.
 
ते इनोव्हामध्ये बसले. त्यानंतर समीर वानखेडे आणि इतर अधिकारी बसले व सरकारी गाडीतून निघून गेले.
 
नंतर सव्वाबाराच्या सुमारास गोसावी खाली आले. आपल्याला फ्रँकी घ्यायचं आहे, असं त्यांनी सांगितलं. आम्ही फ्रँकी, थम्स अप, पाण्याच्या बाटल्या घेऊन चालत ग्रीन गेटकडे गेलो.
 
तिथं गेल्यावर मला कळलं की इथूनच क्रूझकडे जाण्यासाठी प्रवेश दिला जातो. आम्ही विमानतळावर जातो, त्याप्रमाणे बोर्डिंगच्या ठिकाणी गेलो. तिथं सगळे अधिकारी बसले होते.
 
समीर वानखेडेंना किरण गोसावींनी फ्रँकी दिली. मी इतरांना दिली.
 
त्यानंतर मला ग्रीन गेटकडे उभं राहण्याची सूचना दिली. आम्ही काही वेळाने फोटो पाठवतो. ती व्यक्ती आत आली की ओळखून मला सांगायचं असं ते म्हणाले.
 
गोसावी यांनी मला काही फोटो पाठवले. मी सर्च करू लागलो. मास्कमुळे अडचणी येत होत्या. पण दरम्यान पांढरा टीशर्ट घातलेल्या एका व्यक्तीला मी ओळखलं. त्याची माहिती मी त्यांना दिली. नंतर आम्ही पकडलं आहे, असा मेसेज मला आला. व नंतर 13 जणांना पकडल्याचा मेसेज मला केला.
 
संध्याकाळी मी काही वेळ बाहेरच थांबलो रात्री साडेदहा-पावणेअकराच्या सुमारास मी पुन्हा आत गेलो. त्यावेळी मला समीर वानखेडे दिसले. केबिनमध्ये मला आर्यन खानही दिसला. त्याच्यासोबत आणखी 7-8 जण होते. मी गुपचूप आर्यन खानचे फोटो काढले.
 
साडेअकरा-पावणेबाराच्या दरम्यान आम्ही बाहेर पडलो.
 
किरण गोसावी आर्यन खानसह गाडीत बसून NCB च्या कार्यालयात गेले.
 
मीसुद्धा चालत तिथं गेलो.
 
पावणे एकच्या सुमारास मला वर बोलावून पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून सही करण्यास सांगितलं.
 
वानखेडे यांनी कोऱ्या कागदावर मला सही करायला लावली. 8-10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेण्यात आली. माझं आधारकार्ड मी व्हॉट्सअॅपवर पाठवून दिलं.
 
अडीच पावणेतीनला मी खाली उतरलो. त्यावेळी किरण गोसावी यांना सॅम नामक व्यक्तीचा फोन आला. त्यांची डिल सुरू होती.
 
पहाटे साडेचार वाजता गोसावी आणि सॅम एका गाडीत आणि आम्ही दुसऱ्या गाडीत असे लोअर परेलला एका पुलाखाली थांबलो. तिथं आमच्या मागे निळ्या रंगाची मर्सिडीज आली. त्या गाडीत शाहरूख खानची मॅनेजर बसली होती.
 
तिघांमध्ये मिटिंग झाली. त्यात काय झालं मला कळलं नाही.
 
गाडीतून त्यांनी फोन केला. त्यावेळी 25 चा बॉम्ब टाक. 18 पर्यंत डन करू. 8 वानखेडे साहेबांना जातील. 10 आपण वाटून घेऊ, असं त्यांचं संभाषण झाल्याचं मी ऐकलं. त्यानंतर सुमारे साडेपाचच्या सुमारास आम्ही तिथून निघालो.
 
मंत्रालयाच्या समोर जाऊन आम्ही उभे राहिलो. नंतर पूजा फोन नही उठा रही है असं म्हणून सॅमचा फोन आला. जाऊदे आम्ही घरी जातो म्हणून गोसावी यांनी म्हटल्यानंतर आम्ही तिथून निघालो.
 
मी आंघोळ केली. रात्रभर झोपलो नव्हतो.
 
सरांनी मला कॉल करून पुन्हा महालक्ष्मीला जाण्यास सांगितलं. तिथं एक गाडी येईल, त्यामधून तुला 50 लाख रुपये घ्यायचे आहेत, असं मला गोसावींनी सांगितलं. पांढऱ्या रंगाच्या त्या गाडीतून पैसे घेऊन घरी गेलो. तिथं त्यांची बायको होती. मी बॅग दिली. ते बॅग घेऊन निघून गेले. मला घरीच थांबायला सांगितलं.
 
त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता मला वाशी ब्रिजकडे पुन्हा बोलावलं. इनॉर्बिट मॉलजवळ पुन्हा माझ्या हातात पैशांची बॅग दिली. चर्चगेटला जाऊन पुन्हा सॅम यांना ते पैसे दे, असं ते म्हणाले.
 
आतमध्ये 38 लाख रुपयेच होते. मला त्याबाबत काहीही माहीत नसल्याने मी गोसावींशी बोलून घ्या, असं म्हणालो.
 
सॅम आणि गोसावी यांच्यात बोलणं झालं. बाकीचे 12 लाख दोन दिवसांत देतो, असं गोसावींनी सांगितलं.
 
त्यानंतर मी माझ्या घरी निघून आलो. नंतर मी गोसावींचे व्हीडिओ पाहिले. पुण्यातले प्रकरण वगैरे..
 
आज मी हा व्हीडिओ तयार करत आहे, कारण समीर वानखेडे यांची मला भीती वाटू लागली आहे.
 
कारण माझ्या पत्नीचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तिला पोलिसांचे चौकशीसाठी फोन गेले होते. माझ्या कुटुंबाला काही झालं तर मी कुणासाठी जगायचं.
 
समीर वानखेडे यांची मला भीती वाटत असल्यामुळेच मी हे सगळं तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत आहे"
 
दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

INDvsPak : पाकिस्तानचा ऐतिहासिक विजय; बाबर-रिझवानची वादळी सलामी