Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 21 March 2025
webdunia

संजय राऊत: 'उद्धव ठाकरे यांचं सरकार 5 वर्षे टिकेल, यावर भाजपचंही एकमत'

संजय राऊत: 'उद्धव ठाकरे यांचं सरकार 5 वर्षे टिकेल, यावर भाजपचंही एकमत'
, बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (10:12 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या राज्यातील मध्यावधी निवडणुकांच्या संकेतांना फेटाळलं आहे. शिवाय, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भातील प्रश्नांना उत्तरं दिली.
 
"मध्यावधी निवडणुका लागतील की नाही, याबाबत बोलण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. चंद्रकांत पाटील यांच्यावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून नवी जबाबदारी आली असेल, तर चांगलं आहे, स्वागत आहे," असा टोला संजय राऊतांनी लगावला.
 
तसंच, "उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार ते पूर्ण पाच वर्षाचा कालावधी पूर्ण करेल. यावर सगळ्यांचं एकमत आहे. भाजपचंही एकमत आहे," असं संजय राऊत म्हणाले.
 
यावेळी संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या बैठकीवरही भाष्य केलं.
 
"शरद पवारांना भेटायचो, तेव्हाही काहीजण नाराज होते. या देशात, महाराष्ट्रात जे राजकीय विचारांचे, भूमिकेचे नाहीत, असा घटनेत कायदा केलाय का? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत. हळूहळू राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांचे नाव पाहतो. तरुण नेत्याला मुलाखतीत मतं मांडता येतील. राहुल गांधींचीही मुलाखत घेणार आहे आणि अमित शाह यांनाही विनंती केली आहे," असं संजय राऊत म्हणाले.
 
चंद्रकांत पाटलांनी दिले मध्यावधी निवडणुकांचे संकेत
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट राजकीय होती, असा दावा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, "राजकीय पक्षांचे दोन मोठे नेते जेव्हा भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतेच. दोन ते अडीच तास एकत्र असताना ते काही चहा-बिस्किटावर चर्चा करणार नाहीत. पण या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही."
 
एवढेच नाही तर चंद्रकांत पाटील यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यताही वर्तवली आहे. ते म्हणाले, "यापुढील निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार आहोत. सध्या भाजप कुणासोबत सत्तास्थापन करेल अशीही परिस्थिती नाही. मध्यावधी निवडणुका कुणालाही नको आहेत. पण यावर उपाय काय? शेवटी कुणाचीही कॉम्बिनेशन जुळली नाहीत तर पर्याय राहणार नाही."
 
या भेटीबाबत भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांनी परस्पर विरोधी वक्तव्य केली आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
 
या भेटीत कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले असताना भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मात्र ही भेट राजकीय असल्याचा दावा केला आहे.
 
27 सप्टेंबरला देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली. ही भेट शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'च्या मुलाखती निमित्त होती असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत दोघांकडूनही देण्यात आले.
 
"ही मुलाखत घेण्याबाबत माझ्या काही अटी होत्या. यासाठी मी संजय राऊत यांना भेटलो. ही मुलाखत अनएडिटेड असावी असे मला वाटते. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही," असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
 
तर गुप्त भेट असायला आम्ही काय बंकरमध्ये भेटलो होतो का? असा प्रश्न संजय राऊत यांनी भेटीवरून विचारला होता. ते म्हणाले, "ही भेट गुप्त नव्हती. सामनासाठी मुलाखत घ्यायची होती. ते महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहेत. माजी मुख्यमंत्री आहेत. ही काय भूमिगत भेट नव्हती."
 
राऊत-फडणवीस भेटीनंतर राजकीय घाडमोडींना वेग
शनिवारी (27 सप्टेंबर) भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जवळपास दोन ते अडीच तास भेट झाली.
 
शिवसेना आणि भाजपचा संवाद पुन्हा सुरू झाल्याने सत्तास्थापनेबाबतच्याही अनेक शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या.
 
रविवार (28 सप्टेंबर) म्हणजेच भेटीच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान वर्षा बंगल्यावर दोघांची चर्चा झाली.
 
या भेटी आधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. कृषी विधेयकाबाबत राज्यपालांना निवदेन देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
शिवसेना आणि भाजपच्या दोन मोठ्या नेत्यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे.
 
मराठा आरक्षणावरील स्थगिती, कोरोना आरोग्य संकट, ड्रग्ज प्रकरणांची चौकशी, अर्थव्यवस्था अशा अनेक समस्यांनी ठाकरे सरकारला सध्या घेरले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाबरी विध्वंसप्रकरणी आज सीबीआय कोर्टात अंतिम निर्णय