Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काश्मीरमध्ये कलम 144 ; ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन नजरकैदेत

काश्मीरमध्ये कलम 144 ; ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती, सज्जाद लोन नजरकैदेत
, सोमवार, 5 ऑगस्ट 2019 (08:44 IST)
जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आलं आहे. नॅशनल कॉन्फरन्स तसंच पीडीपीच्या आजीमाजी नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं आहे.
 
नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीचे अध्यक्ष महबूबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.
 
जमावबंदीच्या आदेशामुळे लोकांच्या एकत्रित येण्यावर बंदी असेल. या आदेशामुळे सर्व शैक्षणिक संस्था जमावबंदीच्या काळात बंद राहतील. 144 च्या अन्वये काश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
webdunia
ओमर अब्दुल्ला यांनी ट्वीटच्या माध्यमातून स्थानबद्धतेसंदर्भात माहिती दिली.
 
'माझ्यासह काश्मीरमधील नेत्यांना स्थानबद्ध करण्यात येत आहे. यासंदर्भात खरं काय हे जाणून घेण्यासाठीही कोणतीही व्यवस्था नाही', असं ओमर यांनी म्हटलं.
webdunia
ओमर अब्दुल्ला यांच्या ट्वीटला काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पाठिंबा दिला आहे. 'ओमर अब्दुल्ला तुम्ही एकटे नाही. लोकशाहीवर विश्वास असणारा प्रत्येक भारतीय तुमच्या पाठिशी उभा असेल. संसदेचं सत्र सुरू आहे. आमचा आवाज रोखला जाऊ शकत नाही', असं थरूर यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान काश्मीरसाठी आम्ही एकजूट राहू असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. परिस्थिती अवघड आहे परंतु आमच्या निष्ठेचा कोणीही प्रतिवाद करू शकत नाही.
 
काश्मीरमधील परिस्थितीवर ओआईसी अर्थात 'ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज'ने चिंता व्यक्त केली आहे.
 
काश्मीरमध्ये सशस्त्र सैनिकांची वाढती उपस्थिती, क्लस्टर बाँबविषयी चर्चा हे काळजीचं कारण आहे.
webdunia
दरम्यान, कलम 35 अ आणि कलम 370 रद्द करण्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. काश्मीरसाठी एकजूट राहू असं या नेत्यांनी सांगितलं.
 
35अ, कलम 370 संदर्भात कोणतीही घटनाबाह्य कारवाई होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू तसंच लडाखच्या लोकांसाठी काम करू असं बैठकीत ठरल्याचं ओमर अब्दुल्ला यांनी सांगितलं.
 
या बैठकीआधी काश्मीर खोऱ्यात कट्टरतावाद्यांकडून हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली. भाविक तसंच पर्यटकांना परत जाण्यास सांगण्यात आलं आहे.
 
स्थानिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन करण्यात आलं. मात्र परिस्थिती पाहता जीवनावश्यक वस्तूंचा साठा करायला नागरिकांनी सुरुवात केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तुम्हाला चांद्रयान २ चे चंद्रावरील लँडिंग पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत पाहता येणार पण कसे तर वाचा