इंग्लंडमधील एका बहुचर्चित साखळी बलात्कार प्रकरणातील आरोपीला कोर्टाने 'अभूतपूर्व' अशी 33 जन्मठेपांची शिक्षा सुनावली आहे.
जोसेफ मॅक्केन याने 11 ते 71 वर्षं वयोगटातील एकूण 11 जणांवर बलात्कार केले. यात महिलांसह लहान मुलांचाही समावेश आहे.
यातील तीन महिलांचं त्याने इंग्लंडच्या रस्त्यावरून जात असताना चाकूचा धाक दाखवून अपहरण केलं आणि त्यांच्यांवर वारंवार बलात्कार केले.
एकूण 37 प्रकरणांमध्ये त्याच्यावर गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्याला किमान 30 वर्षं तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
निकाल देताना न्यायमूर्ती जस्टिस एडीस यांनी जोसेफ मॅकेन "महिला आणि लहान मुलांसाठी धोकादायक" असून तो "एक पिडोफाईल" असल्याचं म्हटलं आहे.
जोसेफ मॅकेन हा "क्लासिक सायकोपॅथ" आहे, "त्याच्यासारखा दुसरा मनोरुग्ण नाही," असं न्यायमूर्तींनी म्हटलं. तसंच या प्रकरणातील पीडितांचं "रक्षण करण्यास यंत्रणा अपयशी का ठरली," याची "स्वतंत्र आणि पद्धतशीर" चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
जोसेफला यापूर्वी घरफोडीच्या गुन्ह्यातही शिक्षा झाली होती. फेब्रुवारी महिन्यात त्याची सुटका झाली होती. फेब्रुवारीमध्ये तरुंगातून बाहेर आल्यावर एप्रिलपासून 34 वर्षांच्या जोसेफने महिलांना लक्ष्य करायला सुरुवात केली.
21 एप्रिल रोजी वॅटफोर्डमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्यानंतर पुढचे दोन आठवडे त्याने एकापाठोपाठ एक बलात्कारांचा सपाटाच लावला होता.
निकाल देताना न्यायमूर्ती एडीस म्हणाले, "मॅक्केन भ्याड, हिंसक गुंडगिरी करणारा आणि पिडोफाईल (लहान मुलांवर बलात्कार करणारा) आहे."
मॅक्केनच्या अत्याचाराला बळी पडलेल्या "पीडिता कधीच या धक्क्यातून पूर्णपणे सावरू शकणार नाहीत," असंही न्यायमूर्तींनी म्हटलं. "ही बलात्कार, हिंसाचार आणि अपहरणाची एक अशी मोहीम होती, जी यापूर्वी मी कधीही बघितली नाही किंवा ऐकली नाही."
तब्बल 14 तास जोफेसच्या ताब्यात असलेल्या 25 वर्षांच्या पीडित महिलेने या घटनेमुळे आपल्याला मोठी हादरा बसल्याचं कोर्टात सादर केलेल्या जबाबात म्हटलं आहे.
इंग्लंडच्या NHS म्हणजेच नॅशनल हेल्थ सर्व्हिसअंतर्गत निधी मिळण्यासाठी आठ महिने ते वर्षभराचा वेळ लागत असल्यामुळे उपचाराचा खर्च आपण स्वतःच करत असल्याचं सांगत त्यांनी पीडितांना आरोग्य सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडत असल्याबद्दल टीका केली.
व्होडका बॉटल
21 एप्रिलपासून या साखळी बलात्काराला सुरुवात झाली होती. त्या रात्री जोसेफ मॅक्केनने वॅटफोर्डमधल्या एका नाईटक्लबमधून बाहेर पडलेल्या 21 वर्षाच्या तरुणीचं चाकूचा धाक दाखवत अपहरण केलं आणि तिच्याच घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.
चारच दिवसांनंतर मॅक्केनने ईस्ट लंडनमधून मध्यरात्री घरी परतणाऱ्या 25 वर्षांच्या तरुणीचं अपहरण केलं. मॅक्केनने पुढचे अनेक तास वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच दिवशी मॅक्केनने नॉर्थ लंडनच्या रस्त्यावरून आपल्या बहिणीसोबत जाणाऱ्या 21 वर्षांच्या तरुणीचं अपहरण केलं.
त्यानंतर या दोन्ही तरुणींना कारमध्ये डांबून तो वॅटफोर्डकडे निघाला. तिथे त्याने एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. मात्र, दोघींपैकी एकीने कारमधल्या व्होडकाच्या बॉटलने मॅक्केनच्या डोक्यावर वार केला. तो जखमी झाल्यानंतर दोघींनीही तिथून पळ काढला.
5 मेच्या पहाटे मॅक्केनने ग्रेटर मॅन्चेस्टरमधल्या एका बारमध्ये ओळख झालेल्या महिलेच्या घरात प्रवेश मिळवला.
घरात आल्यानंतर त्याने महिलेला बेडला बांधलं आणि तिच्या 11 वर्षांचा मुलगा आणि 17 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. तो म्हणत होता, "तुम्ही आता माझे आहात. उद्या तुम्ही युरोपला जाणार आहात."
देहविक्रीच्या व्यवसायात ढकललं जाण्याच्या भीतीने धास्तावलेल्या या मुलीने निर्वस्त्र असतानाच खिडकीतून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. तिने पळत शेजाऱ्यांकडे जाऊन पोलिसांना घडलेला प्रकाराची माहिती दिली.
यानंतर मॅक्केन याने रस्त्यावरून जाणाऱ्या 71 वर्षांची महिला आणि 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून त्यांच्यावरही बलात्कार केला.
5 मे रोजी मॅक्केनने 14 वर्षांच्या दोन मुलींचं चाकूने तुकडे-तुकडे करण्याची धमकी देत अपहरण केलं. या दोन मुलींना कारमधून पळवून नेताना पोलिसांच्या गाडीने मॅक्केनचा पाठलाग सुरू केला. वेगाने गाडी चालवताना मॅक्केनच्या गाडीला धडक बसली आणि तो कार तिथेच सोडून पळला. अखेर पोलिसांच्या हेलिकॉप्टरला मॅक्केन एका झाडावर चढून बसल्याचं दिसलं आणि त्याला अटक करण्यात आली.
होम अफेअर्स प्रतिनिधी डॅनी शॉ यांचं विश्लेषण
जोसेफ मॅक्केनवरचे सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायमूर्तींनी सांगितलं. यानंतर तीनच दिवसात ज्युरीमधले सर्वच्या सर्व 12 न्यायमूर्ती जोसेफला शिक्षा सुनावण्यासाठी पुन्हा एकदा ओल्ड बेली कोर्टात जमले.
खरंतर या सर्वांना कोर्टात हजर राहण्याची गरज नव्हती. मात्र, या अत्यंत घृणास्पद आणि हादरवून सोडणाऱ्या खटल्याची सांगता त्यांना प्रत्यक्ष हजर राहून बघायची होती.
यावेळी मॅक्केनच्या अत्याचाराला बळी पडलेली एक किशोरवयीन मुलगी आणि तिची आई या दोघीही उपस्थित होत्या. या खटल्याच्या निकालासाठी त्या नॉर्थ-वेस्ट इंग्लंडहून लंडनला आल्या होत्या.
स्वतःला मॅक्केनच्या तावडीतून सोडवून आई आणि भावाची सुटका करण्यासाठी पहिल्या मजल्यावरच्या खिडकीतून निर्वस्त्र उडी मारणाऱ्या या मुलीच्या धाडसाचं न्यायमूर्तींनीही कौतुक केलं.
मॅक्केनच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडलेल्या सर्व पीडितांचे जबाब आपण वाचल्याचं आणि त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी, यासाठी आपण त्या सर्वांना शुभेच्छा देत असल्याचं न्यायमूर्ती एडीस यांनी म्हटलं.
ते म्हणाले, "त्यांच्यासाठी (पीडितांसाठी) परिस्थिती खरंच बदलेल का, याविषयी आपल्या सर्वांच्या मनात शंका आहे. मात्र, ती बदलेल, अशी आपण सर्व आशा करूया."
फेब्रवारीमध्ये तुरुंगातून बाहेर आल्यावर तो 10 वेळा प्रोबेशन अधिकाऱ्यांना भेटला होता. शेवटची भेट तर बलात्काराचा पहिला गुन्हा करण्याच्या तीन दिवस आधीच झालेली होती. यावरूनच मॅक्केनला कायद्याचं भय नसल्याचं स्पष्ट होतं.
मॅक्केनला यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली होती. यात बलात्काराचा समावेश नसला तरी जोडीदाराला मारझोड करणे, घरगुती हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश होता.
मॅक्केन एका तरुणीशी लग्न करणार होता, मात्र, त्याने याविषयीची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. घरगुती हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्यामुळे मॅक्केनने नव्या जोडीदाराविषयची माहिती पोलिसांना न दिल्याने प्रोबेशन अधिकाऱ्यांनी त्याला समजही दिली होती.
मॅक्कनने आपल्यावरच्या साखळी बलात्कारातले सर्वच्या सर्व 37 आरोप फेटाळले होते. मात्र, तो कुठलाही पुरावा सादर करू शकला नाही. इतकंच नाही तर तो कधीच कोर्टात हजर झाला नाही.
ज्या दिवशी शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्यादिवशीही 'पाठदुखी'चं कारण देत तो कोर्टात गैरहजर होता.