Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोन्याच्या तस्करीत भारताला मागे टाकणारा पाकिस्तानचा 'गोल्ड किंग

सोन्याच्या तस्करीत भारताला मागे टाकणारा पाकिस्तानचा 'गोल्ड किंग
, बुधवार, 13 जानेवारी 2021 (19:07 IST)
एप्रिल 1958. लाहोरला जाणाऱ्या एका प्रवाशाला कराची विमानतळावर अडवण्यात आल्यावर त्याच्याकडून 3100 तोळे सोनं सापडलं.
 
कराची कस्टम्स अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात 2000 तोळे सोनं जप्त केल्याचं म्हटलं होतं. पण पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या या प्रवाशाने पोलिसांची चूक लक्षात आणून देत आपल्याकडे 2000 नाही तर तब्बल 3100 तोळे सोनं असल्याचं सांगितलं.
 
या माणसाला लवकरच तुरुंगातून सोडण्यात आलं आणि पाचच महिन्यांनंतर ही व्यक्ती कसूरजवळच्या सीमेलगतच्या गावात दिसली. अमृतसर पोलिसां पासून दूर पळताना या व्यक्तीला सोन्याच्या 45 विटा मागे सोडून द्याव्या लागल्या.
 
सहा वर्षांनंतर दिल्ली पोलिसांनी या माणसाला अटक करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही व्यक्ती पुन्हा एकदा चर्चेत आली. ही व्यक्ती त्यावेळी चांदणी चौकातल्या मोती बाजारात एका व्यापाऱ्यासोबत सोन्याचा व्यवहार करत होती.
 
पोलिसांना चकवत पळून जाण्यात हा माणूस यशस्वी झाला पण त्याचा एक साथीदार पकडला गेला आणि पोलिसांनी त्याच्याकडून सोन्याच्या 44 विटा जप्त केल्या.
 
लाहोरमधून प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्राने 1977मध्ये या व्यक्तीचं वर्णन केलं होतं - "सोनं चोरणारा एक चलाख भामटा, वेषांतर करण्यात पारंगत आणि कोल्ह्यासारखा धूर्त."
 
पाकिस्तान आणि इंटरपोलच्या यादीत या व्यक्तीचा समावेश होता आणि तो अनेकदा दिल्ली, दुबई आणि लंडन पर्यंतचा प्रवास करायचा.
 
या व्यक्तीचं नाव - सेठ आबिद.
 
पाकिस्तानात सेठ आबिद यांना 'गोल्ड किंग' म्हणून ओळखलं जायचं. सोन्याची तस्करी करून गडगंज श्रीमंत झालेल्यांपैकी ते एक होते. 8 जानेवारीला वयाच्या 85व्या वर्षी त्यांचं निधन झालं.
 
सोन्याचा बादशाह
तस्करीच्या धंद्यामध्ये ज्या कुणाला 'सोन्याचा बादशाह' व्हायचं असेल त्याला सीमेच्या पलिकडे स्वतःचं नेटवर्क तयार करावं लागतं. देशातले उच्चभ्रू आणि सरकारी अधिकाऱ्यांशी साटंलोटं करावं लागतं. याशिवाय समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी नैतिकेच्या आधारे आपली एक चांगली प्रतिमा तयार करणारी यंत्रणा उभी करावी लागते.
भारत आणि पाकिस्तानच्या सीमा आखल्या गेल्या तेव्हाच सेठ आबिद यांचाही उदय झाला.
 
कसूर जवळच्या सीमा भागात त्यांचा जन्म झाला आणि तिथेच ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या कबिल्यातले लोक भारताचं विभाजन होण्यापूर्वी कलकत्यातल्या व्यापाऱ्यांसोबत चामडयाचा व्यापार करत.
 
त्यांच्या वडिलांनी कराचीतल्या सराफा बाजारात सोनंचांदीचा व्यवसाय सुरू केल्यावर 1950मध्ये सेठ आबिद कराचीला गेले होते. दुबईहून सोन्याची तस्करी करणाऱ्या काही मासेमारांशी गाठ पडली आणि सेठ आबिद यांनी तस्करीच्या जगात पहिलं पाऊल टाकलं.
 
कासिम भट्टी नावाच्या एका मासेमाराच्यासोबत मिळून 1950च्या दशकाच्या अखेर पर्यंत त्यांनी पाकिस्तानातल्या सोनं तस्करीवर एकहाती वर्चस्व प्रस्थापित केलं होतं.
 
पाकिस्तानशी संबंधित सोनं तस्करी आणि तस्करीच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या स्मगलर्समध्ये सेठ आबिद यांची गणना केली जाते.
 
कराची बंदर, पंजाबची सीमा, सरकारी प्रशासन आणि राजकीय वर्तुळांमध्ये ते प्रभावी होतेच पण सीमेच्या पलिकडे आणि त्याही पुढे त्यांच्या कारवाया सुरू होत्या.
 
लंडन, दिल्ली आणि दुबईमध्ये संपर्क निर्माण करत सेठ आबिद यांनी 1950 पासून 1980पर्यंत सोन्याच्या तस्करीतलं भारताचं वर्चस्व संपुष्टात आणलं.
 
लंडनपर्यंत पसरलेलं नेटवर्क
1950चं दशक संपे पर्यंत सेठ आबिद यांच्या तस्करीच्या नेटवर्कने लंडन, दिल्ली आणि कराचीमधल्या एजंट्सना आकर्षित करायला सुरुवात केली आणि हे जाळं भारत - पाकिस्तानदरम्यानच्या पंजाब सीमेपर्यंत पसरलं.
 
सुरुवातीला फक्त जवळच्या नातेवाईकांपुरतं हे नेटवर्क मर्यादित होतं. त्यांचा अरबी भाषा अस्लखितपणे बोलणारा भाऊ हाजी अशरफ दुबईमध्ये रहायचा. त्यांचा जावई - गुलाम सरवर नेहमी दिल्लीला जाऊन सोनं तस्करी करणाऱ्या हरबन्स लाल यांना भेटायचा.
 
1963मध्ये 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीमुळे सेठ आबिद यांचं नाव पहिलांदा भारतीय माध्यमांमध्ये झळकलं. पाकिस्तानच्या गोल्ड किंगचे भारतामध्ये संबंध असून त्यांच्या लहान बहिणीच्या पतीला दिल्लीमध्ये सोन्याच्या 44 विटांसह अटक करण्यात आल्याची बातमी 'टाईम्स ऑफ इंडिया'ने छापली.
 
ब्रिटीश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या चार्ल्स मेलॉनीना ब्रिटनमधला सेठ आबिदचा 'फॅसिलिटेटर' करण्यात आलं. सेठ आबिद दरवर्षी हजला जात आणि त्याचवेळी तिथल्या अरब शेख ऑपरेटर्ससोबत व्यापारी संबंध तयार करत.
 
तस्करीचा हा व्यवसाय वाढायला लागल्यावर त्यांनी पंजाबच्या सीमेलगतच्या गावांमध्ये राहणाऱ्या काही एजंट्सना सोनं तस्करीची फ्रेंचायजी दिली. यामध्ये प्रामुख्याने घरकी दयाल आणि एवान समुदायातल्या लोकांचा समावेश होता.
 
सेठ आबिद यांना अनेक प्रतिस्पर्धी होते. पण त्यांच्यापैकी कोणाकडे आबिद यांच्यासारखं कौशल्य, कनेक्शन्स आणि पैसा नव्हता. सेठ यांच्या दीर्घ कारकीर्दीदरम्यान त्यांच्यावरच्या आरोपांवर कधीही शिक्कामोर्तब झालं नाही. पण त्यांच्याविरोधात अनेक FIR मात्र दाखल करण्यात आल्या होत्या.
 
सरकारकडून मिळालेलं संरक्षण
 
1950 आणि 1960च्या दशकामध्ये सेठ आबिद यांच्या तस्करी व्यवसायाची जगभरात भरभराट होत होती. आणि यामध्ये कधीकधी त्यांना सरकारकडूनही संरक्षण मिळत असे. लाहोर, कराची, दुबई आणि लंडनमध्ये गुंतवणूक आणि संपत्ती असल्याने त्यांचा समावेश पाकिस्तानातल्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये करण्यात आला होता.
 
पण 1970च्या दशकात जुल्फिकार अली भुत्तो सरकारने सेठ आबिद यांच्या तस्करी कारवायांना काही प्रमाणात खीळ घातली आणि त्यांची काही संपत्ती जप्त करण्यात आली.
1974मध्ये जे घडलं, त्याची कल्पना कोणीही केली नव्हती. लाहोर मधल्या सेठ आबिद यांच्या घरावर पोलिसांनी मोठा छापा टाकला. यामध्ये जवळपास सव्वा कोटी पाकिस्तानी रुपये सापडले. सोबतच 40 लाखांचं सोनं आणि 20 लाखांचं मूल्य असणारी स्विस घड्याळंही जप्त करण्यात आली. बेकायदेशीर सामान ठेवण्यासाठी आणि नेण्या-आणण्यासाठी वापरले जाणाऱ्या तीन गाड्या आणि एक डझन घोडेही या छाप्यामध्ये लाहोर पोलिसांनी ताब्यात घेतले.
 
वर्तमानपत्रांनी याविषयीची बातमी देताना मथळा दिला - 'पाकिस्तानाच्या इतिहासातील स्मगलिंगचं सर्वात मोठं प्रकरण' आणि 'पाकिस्तानचा गोल्ड किंग.'
 
जागतिक पातळीवरील तस्करी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सेठ आबिद यांच्यावर लावण्यात आला.
 
'सेठ आबिद आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणांची' चौकशी करण्यासाठी पंतप्रधान भुट्टो यांनी एका विशेष लवादाची स्थापना केली. या लवादासमोर अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले, पण अनेकवेळा नोटीसा देऊनही सेठ आबिद हजर झाले नाहीत.
 
सेठ यांच्या अटकेचा मुद्दा हा पाकिस्तानातल्या वर्तमानपत्रांमधल्या चर्चेचा विषय तर झालाच पण भुट्टो सरकारसाठी ही केस म्हणजे 'स्टेट रिट' (State Writ)चं उदाहरण बनली.
 
पाकिस्तानात 'मोस्ट वाँटेड'
या 'मोस्ट वाँटेड' व्यक्तीला शोधून काढण्यासाठी पाकिस्तानच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. यासाठी पाकिस्तानी लष्कर, पोलीस, रेंजर्स आणि नौसेनेच्या अधिकाऱ्यांची छापा पथकं तयार करण्यात आली होती.
कराचीतल्या सेठ आबिद यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. तिथून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि सोन्याच्या विटा हस्तगत करण्यात आल्या. सेठ आबिद उत्तर नाजिमाबाद मधल्या त्यांच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी येणार असल्याचं 1977मध्ये कराची कोस्ट गार्डला समजल्यानंतर तिथेही छापा टाकण्यात आला पण त्याआधीच सेठ आबिद तिथून फरार झाले होते.
 
नंतर सप्टेंबर 1977मध्ये सेठ आबिद यांनी 'स्वेच्छेने' झिया उल् हक यांच्या लष्करी सरकारसमोर आत्मसमर्पण केलं आणि जप्त करण्यात आलेली आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी चर्चा केली.
 
जिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर हॉस्पिटल (JPMC) ची उभारणी आणि अब्बासी शहीद हॉस्पिटलचा बर्न वॉर्ड यासाठी शेठ आबिद यांनी लेफ्टनंट जनरल जहांनजेब अरबाब यांच्याकडे 1 लाख 51 हजार रुपयांची देणगी दिल्याचं त्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये लष्करी सरकारने माध्यमांना सांगितलं.
 
यानंतर सेठ यांची गणना व्यावसायिक गुन्हेगार म्हणून न होता समाज आणि देशाच्या भल्यासाठी मोठ्या मनाने देणगी देणारे पक्के 'देशभक्त' म्हणून होऊ लागली.
 
पाकिस्तानातल्या अणुकार्यक्रमाशीही त्यांचं नाव जोडलं गेल्यानंतर त्यांची ही लोकप्रियता आणखीनच वाढली.
 
1985-86मध्ये पाकिस्तानच्या संसदेत 'सेठ आबिद इंटरनॅशनल स्मगलिंग केस'वर चर्चा झाली आणि यानंतर चौधरी निसार अली यांच्या अध्यक्षतेखालच्या नॅशनल असेंब्लीच्या विशेष समितीने - SCNAने या केसची जबाबदारी घेतली.
 
1958मध्ये कराची विमानतळावर सेठ आबिद यांच्याकडून कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेलं 3100 तोळं सोनं परत करण्याची परवानगी 1986 मध्ये पाकिस्तानच्या सेंट्रल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूने दिली.
 
समाजकार्य
पाकिस्तानातला अणु कार्यक्रम विकसित करण्यासाठी मदत करत, आपली तस्कर म्हणून असणारी ओळख पालटवणारी व्यक्ती म्हणून सेठ आबिद यांना पाकिस्तानात ओळखलं जातं. यामुळे त्यांना एका 'लिजंड'ची ओळख मिळाली.
 
मूकबधीर मुलांसाठी काम करणाऱ्या हमजा फाऊंडेशन संस्थे सोबतच सेठ आबिद यांनी लाहोर मधलं शौकत खानम कॅन्सर हॉस्पिटल यासारख्या अनेक समाजसेवी संस्थांना आर्थिक मदत दिली.
आयुष्यभर सेठ आबिद यांनी स्वतःची प्रसिद्धी करणं टाळलं पण तरीही त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यांचं नाव राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय झालं. एका टीव्ही शोमध्ये झालेल्या लिलावा मध्ये त्यांनी त्यांच्या मुलासाठी पाच लाखांची एक क्रिकेट बॅट विकत घेतली होती. शारजा मधल्या खेळी दरम्यान जावेद मियांदाद यांनी वापरलेली ही बॅट होती.
 
यानंतरच्या त्यांच्या जीवनात वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या या त्यांच्या गुन्हेगारी कारवायांबद्दलच्या नव्हत्या. पण त्यांच्या मालकीच्या लाहोरमधल्या एअरलाईन हाऊसिंग सोसायमटीमध्येच त्यांच्या मुलाची - सेठ हाफिज अयाज अहमद याची हत्या झाल्याने ते पुन्हा एकदा बातम्यांमध्ये आले.
 
पाकिस्तानच्या निर्मितीनंतर सेठ यांनी ज्याप्रकारे बेकायदेशीर पद्धतीने संपत्ती जमा केली तशी देशाच्या सुरुवातीच्या काळात इतर कोणीही केली नाही.
 
या बेकायदेशीर व्यापार कारवायांदरम्यान त्यांनी तस्कर, सोनं व्यापारी, स्टॉक मार्केट एक्सचेंजर, दानशूर व्यक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रियल इस्टेट क्षेत्रातली बडी आसामी अशा वेगवेगळ्या भूमिका बजावल्या.
 
गडगंज संपत्ती
1990चं दशक येईपर्यंत सेठ आबिद यांची लाहोरच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भरपूर प्रॉपर्टी झाली होती. ते शहरातले सर्वात जास्त जमीन असणारे प्रॉपर्टी डेव्हलपर - विकासक होते.
 
कराचीतही त्यांची मोठी मालमत्ता होती आणि पनामा लेकमध्ये नाव आल्यानंतर त्यांनी त्यांची संपत्ती ब्रिटीश व्हर्जिन आयलंडला हलवली.

त्यांच्या कारवायांचे अनेक किस्से तस्करीच्या जगात ऐकायला मिळतात. वर्तमानपत्रं आणि सोशल मीडिया आजही सेठ आबिद यांचं वर्णन रोमँटिक पद्धतीने करतो आणि त्यांचं पलायन आणि ग्लॅमरस आयुष्य यांच्या रसभरीत कहाण्या सांगितल्या जातात.
 
'कुख्यात पाकिस्तानी गोल्ड किंग तस्कर' असं त्यांचं वर्णन वर्तमानपत्रांनी केल्यावर सेठ यांनी त्याचा विरोध केला आणि 'सामान्य लोकांसाठी सोने खरेदी सुलभ करणारा माणूस' म्हणून स्वतःची छबी निर्माण केली.
 
लाहोर मधल्या एका वर्तमानपत्राच्या संपादकाला सेठ आबिद यांनी सांगितलं होतं, "मला कुख्यात सोनं तस्कर का म्हटलं जातं? मी माझ्या बहिणी आणि लेकींच्या लग्नासाठी स्वस्तात सोनं उपलब्ध करून देतो. मी समाज आणि देशासाठी मोठी सेवा करतोय. माझं कौतुक होण्या ऐवजी माझ्या पदरी बदनामी आली."

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धनंजय मुंडें यांच्यावरील आरोपांमुळे एनडी तिवारींच्या 'त्या' प्रकरणाची आठवण का?