Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शबनम: स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच ज्या महिलेला फाशी दिली जातीये, तिचा गुन्हा काय होता? - ग्राउंड रिपोर्ट

शबनम: स्वतंत्र भारतात पहिल्यांदाच ज्या महिलेला फाशी दिली जातीये, तिचा गुन्हा काय होता? - ग्राउंड रिपोर्ट
, शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (19:45 IST)
शहाबाज़ अनवर
अमरोहाहून, बीबीसीसाठी
प्रेमसंबंधांमध्ये अडथळा ठरलेल्या आपल्याच नातलगांबद्दल तिरस्कार वाटून एकाच रात्री सात जणांचे प्राण घेतले गेले. यामागची कहाणी जीवाचा थरकाप उडवणारी होती.
शबनमने तिचेच आईवडील, भाचे, दोन भाऊ, एक वहिनी व एक दूच्या नात्यातली बहीण यांना दुधात बेशुद्धीचं औषध घालून पाजलं, आणि त्या सगळ्यांची शुद्ध हरपल्यानंतर रात्री एक-एक करून सर्वांना कुऱ्हाडीने मारून टाकलं.
 
14 एप्रिल 2008- उत्तर प्रदेशात पश्चिमेला असणाऱ्या अमरोहामधील हसनपूर तालुक्यातील बावनखेडी गावातील लोक ही तारीख कधीच विसरू शकणार नाहीत.
 
शबनमच्या घराच्या आसपास सात थडगी आहेत आणि तिथल्या भिंतींवर आजही कायम असलेले रक्ताचे डाग या भयंकर हत्याकांडाची आठवण करून देत असतात.
शबनमला तिच्या गुन्ह्याची शिक्षा खूप आधीच मिळायला हवी होती, असं बहुतांश गावकऱ्यांना वाटतं.
 
या प्रकरणी पोलिसांनी तपासानंतर सांगितलं होतं की, शबनमने तिचा प्रियकर सलीम याच्या मदतीने तिचे वडील, आई, दोन भाऊ, एक वहिनी, भाचे व दूरच्या नात्यातली बहीण यांचा खून केला.
 
या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शबनम व सलीम या दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली आणि राष्ट्रपतींनी या गुन्हेगारांचा दयेचा अर्ज फेटाळून लावला व फाशीची शिक्षा कायम ठेवली.
 
'हा गुन्हा माफी देण्यासारखा नाही'
शबनमचे काका सत्तार या घटनेच्या आठवणीने अस्वस्थ होतात. ते म्हणतात, "शबनमला फाशीची शिक्षा सुनावण्यासाठी उशीर झाला आहे. तिने केलेला गुन्हा माफी देण्यासारखा नाहीये."
 
ते म्हणतात, "माझं आणि शबनमचे वडील शौकत यांच्या कुटुंबाचं कामकाज सोबतच असायचं. शौकत 2000 सालच्या आधी ताहरपूरला राहत होता. तिथे इंटर कॉलेजमध्ये तो शिक्षक होता. नंतर त्याने बावनखेडीला घर बांधलं."
 
शबनमच्या प्रेमप्रकरणाविषयी सत्तार सांगतात, "शबनम आणि सलीम यांच्यातलं नातं कधी सुरू झालं माहीत नाही. ही घटना घडली तेव्हा रात्री काही गावकरी ताहरपूरला माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या हत्याकांडाबद्दल सांगितलं.
 
मी आणि माझी पत्नी तिथे गेलो, तर माझ्या पायातील ताकदच गेली. समोरचं दृश्यं धडकी भरवणारं होतं. तिथे प्रेतं पडलेली होती, त्यांची डोकी नि शरीरं कापलेली होती. भय्या-भाभी, एक अविवाहित पुतण्या, मोठा पुतण्या आणि त्याची बायको नि मुलगा यांची प्रेतं कापलेल्या अवस्थेत पडलेली होती."
 
सत्तार यांची पत्नी फातिमाही तिथेच बसल्या होत्या. त्या मधे म्हणाल्या, "शौकत यांना आम्ही त्यांच्या मुलीबद्दल आधीही सावध केलं होतं, पण त्यांनी आमच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नाही."
 
या घटनेबद्दल फातिमा म्हणतात, "आम्ही बावनखेडीला पोचलो तेव्हा तिथे पाय ठेवायलाही जागा नव्हती. प्रेतांना एक-एक करून घराबाहेर आणण्यात आलं, तेव्हा आम्ही आतून हादरलो होतो. शबनमने सगळ्यांना कुऱ्हाडीने कापलं होतं. पण तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं की, तिथे रडत बसलेली शबनमच या सगळ्यांची मारेकरी आहे."
 
घरावर हल्ला झाल्याचं शबनमने तेव्हा सांगितलं होतं. पण नंतर पोलिसांच्या तपासात वास्तव समोर आलं.
 
सत्तार सांगतात, "या हत्याकांडात आपल्या दूरच्या नात्यातल्या भावाला अडकावण्याचा प्रयत्न शबनमने केला होता. वडिलांची संपत्ती आपल्या नावावर होईल नि आपण सलीमसोबत राहू, असं तिला वाटत होतं. पण असं काही झालं नाही आणि त्या दोघांना अटक झाली."
 
शबनमचे काका सांगतात की, रोज त्यांच्या भावाच्या घरी एक लीटर दूध घेतलं जात असे, पण या घटनेच्या दिवशी तिने दोन लीटर दूध विकत घेतलं, दुधात काहीतरी बेशुद्धीचं औषध घालून दूध सगळ्यांना दिलं.
 
शबनम सलीमसोबत घरात गेली तेव्हा सगळे लोक बेशुद्ध पडलेले होते, असं पोलिसांच्या तपासात उघड झालं. घटना घडली तेव्हा सलीम शबनमसोबत होता, पण सातही व्यक्तींवर कुऱ्हाडीचे वा शबनमने केले होते. खून करण्यासाठी शबनमला साथ दिल्याबद्दल व कारस्थानात सहभागी झाल्याबद्दल न्यायालयाने सलीमलाही देहदंडाची शिक्षा सुनावली.
 
बावनखेडीमधील या हत्याकांडानंतर बारा वर्षं उलटली असली, तरी गावात अजूनही याची चर्चा होते.
 
धडकी भरवणारं दृश्य होतं
बावनखेडीमधील शहजाद खान घटना घडल्यावर रात्रीच घटनास्थळी पोचले होते.
 
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले, "रात्री पाऊस पडायला लागला होता. अंगणात झोपलेले लोक घरात जायला लागले. लोक आपापल्या खाटा उचलून आत जायला लागले, तेव्हा एकदम गोंगाट ऐकू आला."
शहजाद व त्यांच्या कुटुंबातील लोक घटनास्थळी पोचले तर तिथलं दृश्य बघून ते धास्तावून गेले. सात प्रेतं पडलेली होती आणि शबनम रडत होती. घटनास्थळी पोचल्यावर आपणही असंच दृश्य पाहिल्याचं गावातील एक तरुण अफजाल खान सांगतात.
 
गावातील एक ज्येष्ठ रियासत सांगतात, "घटना घडली तेव्हा रात्री सुमारे दोन वाजता आम्ही तिथे पोचलो. समोरचं दृश्यं बघून आमचे हात-पाय गळून गेले. मला तिथे थांबणं शक्य झालं नाही, त्यामुळे मी परत आलो."
 
शबनम आणि सलीम यांचं नातं
शबनम सलीमवर प्रेम करत होती आणि तिच्या कुटुंबियांना हे पसंत नव्हतं, त्यातूनच कुटुंबातील व्यक्ती व शबनम यांच्यात संघर्ष उत्पन्न झाला, असं गावकरी सांगतात.
शबनमच्या कुटुंबियांचा आक्षेप असा होता की, त्यांच्या घरातील मंडळी शिकली-सवरलेली व संपन्न होती. शबनमदेखील एमएपर्यंत शिकली होती, पण सलीमची सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी अशी नव्हती. तो शिकलेला नव्हता आणि लाकडं कापायचं आरा मशीन चालवून तो उपजीविका साधत होता.
 
घटना घडली तेव्हा सलीमचं वय 25 वर्षं होतं आणि शबनम 27 वर्षांची होती. सध्या शबनमचं वय 39 वर्षं आहे.
 
सलीमचे एक मित्र सांगतात की, त्यांनी सलीमसोबत व्यवसायदेखील केला होता, पण त्यांच्या बोलण्यात कधी शबनमचा उल्लेखही आला नव्हता.
 
शबनमच्या घरातील लोक या दोघांच्या नात्याबद्दल अत्यंत नाराज होते. शबनमच्या आजोबांनी त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये तिच्या हाताने शिजवलेलं अन्न खायचंही बंद केलं होतं.
 
शबनम-सलीम यांच्या प्रेमसंबंधांची माहिती तिचा लहान भाऊ राशिदलाही कळली होती. एकदा चिडून राशिदने शबनमला चापट मारली होती, असं गावकरी सांगतात.
 
सलीम यांच्या शेजारी राहणाऱ्या महमूना सांगतात, "मुलगा तसा ठीक होता. कोणाकडे डोळे वर करून बघायचाही नाही. काय बोलायचं? आता सरकारच न्याय करू शकतं."
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाओमी ओसाका टेनिसः 23 व्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी नाओमी ओसाका तुम्हाला माहिती आहे का?