Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लोकसभा 2019: ‘शरद पवार यांना EVM हॅकिंगचा संशय, 'त्यांना पराभव दिसू लागलाय’ - भाजपची टीका

लोकसभा 2019: ‘शरद पवार यांना EVM हॅकिंगचा संशय, 'त्यांना पराभव दिसू लागलाय’ - भाजपची टीका
, बुधवार, 24 एप्रिल 2019 (10:01 IST)
"सध्या भाजपच्या विरोधात लाट आहे, पण EVM हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मतदान संपायला आलं तेव्हा केला आहे.
 
या निवडणुकीपूर्वीही असे आरोप अनेकदा झाले आहेत. शिवाय, 18 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या वेळीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही असेच आरोप केले होते.
webdunia
पण EVM हॅक केले जाऊ शकत नाहीत, असं निवडणूक आयोगातर्फे वारंवार सांगण्यात आलं आहे.
 
दरम्यान, या आरोपांमध्ये तथ्य नाही आणि पवारांनी पराभवाची कारणं लिहायला सुरुवात केलीय, असं हल्ला भाजपने केला आहे.
 
भाजप नेते आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "ज्यावेळेस पराभव दिसतो, त्यावेळेला EVM हे एकच कारण विरोधकांना मिळतं. ज्या EVMवर ते पंजाबमध्ये सरकारमध्ये येतात, कर्नाटकात सत्तेत येतात, तिथं मात्र यांना EVMमध्ये प्रॉब्लेम दिसत नाहीत. भाजपच्या जागा आल्या की यांना EVMमध्ये प्रॉब्लेम दिसायला लागतो. नाचता येईना, अंगण वाकडे असंच हे धोरण आहे."
 
चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पलटवार केला आहे. ते म्हणतात, "लोकशाही वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे EVMमध्ये काही बिघाड होत असेल तर कोर्टानं VVPAT आणली आहे. त्यानुसार 50 टक्के पेपर मोजावेत. पण जर ही मोजणी होत नसेल तर 9 हजार कोटी रुपये खर्च करण्याचा फायदा काय?"
 
पण जिथं जिंकलात तिथं तुम्ही EVMबद्दल काही बोलत नाही, असा चंद्रकांत पाटलांचा आरोप आहे. यावर ते सांगतात, "आम्ही जिथं जिंकलो तिथं भाजपनं अंदाज घेऊन EVM हॅक केली, म्हणून त्यांचा निसटता पराभव झाला, नाहीतर ते भूईसपाट झाले असते."
 
"बारामतीची जागा भाजप 100 टक्के जिंकणार आहे. लीड फक्त मोजायचा बाकी आहे," असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.
 
यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचा पराभव अशक्य आहे. ज्या चंद्रकांत पाटलांनी आयुष्यात एकही निवडणूक लढवली नाही, त्यांनी याबद्दल बोलू नये."
 
EVM खरंच हॅक होऊ शकतात का?
EVMबद्दलची चर्चा निरर्थक आहे, असं 'महाराष्ट्र टाईम्स'च्या पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर सांगतात.
 
"शरद पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यांचा राजकीय अर्थ कसाही निघू शकतो. पण EVMबद्दल यापूर्वीही अनेकदा आक्षेप घेण्यात आले आहेत. यात नवीन काही नाही. त्यामुळे EVMबद्दलची चर्चा निरर्थक आहे. आताच हा मुद्दा का काढला जात आहे, हा एक प्रश्न आहे.
 
"बारामती मतदारसंघ पवारांना नवीन नाही. त्यांना तिथली नस अन् नस माहिती आहे. त्यामुळे त्यांना पराभव दिसायला लागला, असं लगेच म्हणणं योग्य ठरणार नाही," ते पुढे सांगतात.
 
ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे यांच्या मते EVM बद्दल आक्षेप घेण्याच्या दोन शक्यता असू शकतात.
 
"एक म्हणजे पवारांना पराभव दिसू लागलाय, असं असू शकतं आणि दुसरं म्हणजे या माध्यमातून ते एक प्रकारचा गोंधळ निर्माण करू इच्छित असावेत. कोणतंही बटण दाबलं की मत कमळालाच जातं, हा तो गोंधळ. यातून राजकीय लाभ मिळवण्याची त्यांची इच्छा असू शकते," परांजपे सांगतात.
 
EVM hackingचा आरोप का होतो?
पराभूत होणारे पक्ष नेहमीच EVM हॅक करण्यात आली असून, मतांमध्ये फेरफार होत आहे, असा आरोप करताना दिसतात.
 
पण मशीनच्या आगमनानंतर मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. मतदान प्रक्रियेतील मानवी चुकांचं प्रमाण कमी होणं लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे.
 
शिशिर देबनाथ, मुदित कपूर आणि शमिका रवी या संशोधकांनी 2017 निवडणुकांमध्ये मशीन्सचा परिणाम किती, याचा अभ्यास केला. त्यांच्या अभ्यासात काही बाबी स्पष्ट झाल्या.
 
मशीन्समुळे मतदान प्रक्रियेतील घोटाळ्यांचं प्रमाण कमी झालं आहे. मशीन्सचा वापर सुरू झाल्यापासून गरीब आणि उपेक्षित वर्गांतील लोकांची मतदानाला उपस्थिती वाढली आहे तसंच मतदान प्रक्रियेचा वेग वाढून ती अंर्तबाह्य बदलली आहे.
 
मशीन्सच्या आगमनानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतांमध्ये घट झाल्याचं निरीक्षणही या अभ्यासगटानं नोंदवलं आहे.
 श्रीकांत बंगाळे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राहुल गांधी यांची अमित शाह आणि त्यांच्या पुत्रावर टीका