मयांक भागवत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांचा 'अॅक्सिडेंटल गृहमंत्री' असा उल्लेख केल्यानंतर, शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये दरी वाढत चालली आहे का? असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे.
राज्यातील दोन मित्रपक्ष आमने-सामने असतानाच शरद पवार आणि अमित शाह यांच्या कथित गुप्तभेटीची बातमी आली.त्यातच, "सगळ्या गोष्टी जाहीरपणे सांगायच्या नसतात," असं सूचक वक्तव्य करून अमित शाह यांनी याबाबतचे संशयाचे वातावरण अधिकच वाढवले . शाह यांच्या वक्तव्याने भाजप-राष्ट्रवादी या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना नेत्यांनी पवार-शाह कथित भेटीची बातमी फेटाळून लावली.
पवारांची केंद्रात मोठं पद मिळवण्याची राजकीय महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिलेली नाही. त्यामुळे प्रश्न असा उपस्थित होतो की या चर्चांमुळे शरद पवारांचा केंद्रात भाजपविरोधी नेतृत्व म्हणून पुढे येण्याचा मनसुबा फोल ठरेल? या चर्चांचा पवारांच्या केंद्रीय राजकारणावर परिणाम होईल?
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, "पवार-शाह भेटीच्या फक्त चर्चाच आहेत. यामध्ये अद्यापही काहीच ठोस नाहीये. फक्त चर्चा सुरू असल्यामुळे याचा फारसा फरक पडणार नाही."
तिसऱ्या आघाडीवर परिणाम होईल?
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत पी.सी. चाको यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
पी. सी. चाको यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी पवारांनी केंद्रात कॉंग्रेस वगळून तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य केलं होतं.
दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, "या देशाला तिसऱ्या आघाडीची गरज आहे. लोकांना वेगळा पर्याय द्यायला हवा यासाठी विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा सुरू आहे."
पवारांच्या या वक्तव्यानंतर केंद्रात भाजपविरोधी तिसऱ्या आघाडीत राज्यातील प्रादेशिक पक्ष सहभागी होतील. या आघाडीचं नेतृत्व शरद पवार करतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
"अमित शाह यांच्यासोबत कथित भेटीच्या चर्चांमुळे पवारांवर अविश्वास निर्माण झालाय. हा अविश्वास कायम राहिला तर भाजपविरोधी मित्रपक्ष त्यांच्यापासून दूर जातील. केंद्रात पवारांचं नेतृत्व मानण्यावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे," असं झी-24 तासचे वरिष्ठ राजकीय पत्रकार दीपक भातुसे सांगतात.
प्रादेशिक पक्ष पवारांकडे संशयाने पाहातील?
पवार-शाह भेटीचं खंडण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाडसारख्या नेत्यांनी केलं.
शरद पवारांनी स्वत: या भेटीचं वृत्त फेटाळलं नाही. उलट अमित शाह यांनी सूचक वक्तव्य करून चर्चांना आणखी उधाण येऊं दिलं.
वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, "शरद पवारांनी स्वत: अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीचं खंडण केलं असतं तर चर्चा संपली असती. पण ते या विषयावर काहीच बोलले नाहीत. त्यात अमित शाह यांनी संशयाचं वातावरण निर्माण केलं."
"पवार यांच्याकडे आता राज्यातील भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांचे नेते संशयाच्या नजरेने पाहातील. त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाकडेही संदिग्ध नजरेने पाहिलं जाईल." असं सुधीर सुर्यवंशी पुढे म्हणतात.
शरद पवारांनी अमित शाह यांच्या कथित भेटीबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही.
दीपक भातुसे सांगतात, "अमित शाह यांच्यासोबतच्या कथित भेटीच्या चर्चेमुळे आघाडीत संभ्रमाचं वातावरण आहे."
वैचारिक कमिटमेंटवर प्रश्नचिन्ह?
शरद पवारांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी भाजपला जाहीर पाठिंबा दिला होता. तर 2019 च्या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसची भाजपसोबत छुपी चर्चा सुरू होती असं सांगितलं जातं.
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी म्हणतात, "पवारांच्या राजकारणाकडे नेहमीच संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. याचा फटका राष्ट्रवादीला अनेकवेळा बसतो. काहीवेळा या संशयाच्या वातावरणाचा फायदाही होतो. पण, भाजपसोबत चर्चा सुरू राहिल्या तर पवारांशोबती संशयाचं वातावरण निर्माण होईल."
राष्ट्रीय राजकारणात शरद पवार गेली चार ते पाच दशकं सक्रीय आहेत. जम्मू-काश्मीरपासून केरळपर्यंत प्रादेशिक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी पवारांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. पवार राज्य आणि केंद्रातील राजकारणात एक मुसद्दी नेते म्हणून मानले जातात.
"शरद पवार केंद्रात भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशात, अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चेमुळे त्यांच्या वैचारिक कमिटमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. ममता बॅनर्जींनी बंगालचा गड राखला तर, भाजपविरोधी प्रादेशिक पक्ष ममता यांच्या अधिक जवळ जाऊ शकतात," असं सुधीर सूर्यवंशी पुढे म्हणतात.
वरिष्ठ राजकीय पत्रकार दीपक भातुसे सांगतात, "राज्यातील महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर पवारांची भाजपचे विरोधक म्हणून देशभरात ओखळ निर्माण झालीये. पण, अमित शाह यांच्यासोबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला नाही तर, त्यांच्या भाजपविरोधी इमेजला तडा जाईल."
पवार युपीएचे अध्यक्ष?
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गेल्याकाही दिवसांपासून शरद पवारांना यूपीए अध्यक्ष करा, अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेना युपीएचा घटक नाही. तरीही, राऊत दिल्लीत वारंवार पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं अशी भूमिका घेत आहेत.
अभय देशपांडे सांगतात, "पवार युपीएचे समन्वयक बनतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. आता फक्त शिवसेना सोडून पवार यांनी युपीएचं नेतृत्व करावं असं कोणीच फारसं बोलत नाही."
दुसरीकडे संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर, महाविकास आघाडीचा घटक असलेली कॉंग्रेसही नाराज झालीये. राऊत प्रवक्ते कोणाचे? असा सवाल कॉंग्रेसकडून विचारण्यात आलाय.