श्रीकांत बंगाळे
बीबीसी मराठी प्नतिनिधी
"तू काय करणार चिमणे निवडणूक लढवून. तू थोडीच 5 वर्षं आमच्या गावात थांबणार आहे. लग्न करशील आणि नवऱ्याच्या घरी निघून जाशील. असं गावातले आजी-आजोबा मला म्हणायचे. तेव्हा, सध्या तरी माझा लग्नाचा विचार नाही, गावाच्या भल्यासाठी मला निवडून द्या, असं मी त्यांना पटवून देत होते," स्नेहल काळभोर सांगत होत्या.
21 वर्षांच्या स्नेहल काळभोर यांची खडकी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्रातल्या 14 हजार 234 इतक्या ग्रामपंचायतींची निवडणूक नुकतीच पार पडली.
या निवडणुकीत तरुणांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला आणि अनेक ठिकाणी तरुण उमेदवार जिंकूनही आले.
यापैकी एक आहेत स्नेहल काळभोर. 21 वर्षांच्या स्नेहल यांनी ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि आता त्यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
स्नेहल पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातल्या खडकी गावात राहतात.
आपल्या शिक्षणाचा वापर गावाचा विकास आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी करणार असल्याचं स्नेहल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. स्नेहल सध्या एमसीएच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे.
"ग्रामपंचायतमधल्या सगळ्या महिला सदस्यांना सांगितलंय की, तुम्ही स्वत: ग्रामपंचायतीत यायचं, ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं ते प्रत्यक्षात पाहायचं. फॅमिली मेंबर नॉड अलाऊडेड," स्नेहल सांगत होत्या.
राजकारणात नवीन आहात, मग निवडणुकीत तुमचा मुद्दा गावकऱ्यांना कसा पटवून सांगितला, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी सांगितलं, "माझ्या प्रतिस्पर्धी महिला उमेदवारांचं वय साठीदरम्यान होतं आणि त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं. मी सुशिक्षित आहे, त्यामुळे ज्या काही शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचत नाही, त्या कशाप्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवेन? महिला, तरुण आणि शिक्षण यासाठी मी काय करू शकते, हे मी लोकांना माझ्या प्रचारातून पटवून दिलं."
गावातील महिलांचं आरोग्य आणि तरुणांच्या शिक्षणासाठी प्राधान्यानं काम करण्याचा स्नेहल यांचा उद्देश आहे.
गावातल्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्या बदलायच्या आहेत, असा प्रश्न विचारल्यावर त्या सांगतात, "गावातील महिला त्यांच्या आरोग्याची अजिबात काळजी घेत नाही. मासिक पाळीत या महिलांना सॅनिटरी पॅड मुबलक दरात द्यायचा माझा प्रयत्न असणार आहे. आमच्या गावातून बारामतीला विद्यार्थी शिक्षणाला जातात. पण, बस नसते. एक बस नऊ वाजता आणि दुसरी बारा वाजता. त्यामुळे खूप गर्दी होते. त्यामुळे बसची व्यवस्था करायची आहे."
पण, बरेचदा महिला सरपंच असताना कारभार त्यांच्या घरातील पुरुष बघताना दिसतात. आता तुम्ही स्वत: कारभार बघणार का, या प्रश्नावर त्यांनी सांगितलं, "मला इतर गावांना दाखवून द्यायचंय की, राजकारणात यायला महिलांना आरक्षणाची गरज नाही. महिला स्वत:हून राजकारण शिकू शकतात. आपली ग्रामपंचायत, राज्य, देश कसा चालतो, हे शिकू शकतात. आमच्या ग्रामपंचायतीतल्या सगळ्या महिलांना मी सांगितलंय की तुम्ही स्वत: यायचंय ग्रामपंचायतीत. काम कसं चालतं ते स्वत: बघायचं. फॅमिली मेंबर नॉड अलाऊडेड."
बऱ्याच ठिकाणी महिला सरपंचांना गांभीर्यांन घेतलं जात नसल्याचं चित्र आहे, यावर स्नेहल यांनी सांगितलं, "लोकांचा हाच दृष्टीकोन, हीच परिस्थिती बदलण्यासाठी मी राजकारणात आलेय. महिलांनी स्वत:ला सक्षम करण्याची आता खरी गरज आहे."
"महिलांसाठी शिबिरं, व्याख्यानं यांचं आयोजन करणार आहे. स्किल इंडियाच्या मार्फत तरुणींना जीवनकौशल्याचं प्रशिक्षण देणार आहे. तसंच वेगेवगळ्या क्षेत्रातील महिलांना गावात बोलावून तरुणी आणि पालकांना मार्गदर्शन करण्याची विनंती करणार आहे," स्नेहल यांनी पुढे सांगितलं.
आता सरपंच झालात. तुम्हाला भविष्यात आमदारकी किंवा खासदारकी लढवायची इच्छा आहे का, असं विचारल्यावर स्नेहल यांनी म्हटलं, "संधी मिळाल्यास नक्की पुढे जाईल. पण, सध्या तरी सरपंचपदाची माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यातून माझं खडकी गाव आदर्श कसं बनेल, ते केंद्र स्तरावर कसं जाईल, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे."
आजही ग्रामीण भागात राजकारण म्हटलं की त्याकडे नकारात्मक नजरेनं पाहिलं जातं. काही कारणास्तव तरुणींचा सहभाग त्यात कमी दिसतो.
तुम्ही निवडणूक लढवायचं ठरवल्यावर तुमच्या मैत्रिणींनी काय म्हटलं, यावर स्नेहल यांनी सांगितलं, "माझ्या मैत्रिणी म्हणाल्या की, तुला एक चांगली संधी भेटलीय. आम्हाला ही संधी भेटत नाही. आमच्या गावातून आम्हाला सपोर्ट नाहीये किंवा घरातून आम्हाला सपोर्ट नाहीये. राजकारण म्हटलं की नको, मुली तर त्यात नकोच नको, असं म्हणतात.
"आता आपल्यातील एक पुढे जातीये, त्यामुळे सगळ्या खूश होत्या. इतकंच काय तर माझ्यामुळे त्यांच्या घरच्यांनाही प्रेरणा भेटली की मुली राजकारणात जाऊ शकतात."
सध्या स्नेहल यांचं सरपंचपदाचं प्रशिक्षण सुरू आहे. ते संपल्यानंतर गावात प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करण्याचा त्यांचा विचार आहे.